Skin cancer symptoms : त्वचा हा शरीरातील सर्वांत मोठा अवयव आहे. शरीरात काही समस्या निर्माण झाल्यास, त्याचे परिणाम त्वचेवरही दिसतात. त्वचेचा रंग बदलण्यापासून ते त्वचेवर पुरळ किंवा चामखीळ येणे आणि खाज सुटण्यापर्यंतच्या समस्या शरीरात एखादा आजार वाढत असल्याचे दर्शवितात. मात्र, त्वचेच्या समस्या कधी कधी त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. बहुतेक लोक त्वचेच्या समस्यांना गांभीर्याने घेत नाहीत आणि त्या सामान्य समस्या आहेत, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्वचेचा कर्करोग पसरतो. म्हणून त्वचेचा कर्करोग लवकर किंवा त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे त्वचेवरील सात धोक्याच्या चिन्हांबद्दल जाणून घेऊ, जे सूचित करतात की, शरीरात काहीतरी चुकीचे होत आहे आणि त्वचेचा कर्करोग विकसित होत आहे.

त्वचेच्या कर्करोगाची ७ धोक्याची चिन्हे

वेगळा दिसणारा नवीन तीळ किंवा चामखीळ

शरीरावरील बहुतेक तीळ लहान असतात आणि बालपणात किंवा पौगंडावस्थेपूर्वी नाहीसे होतात. मात्र, जर एखादा नवीन तीळ अचानक दिसला आणि तो इतर तिळांपेक्षा वेगळा दिसत असेल, तर त्याची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

अ. असममितता – तीळ किंवा चामखीळाचा एक अर्धा भाग दुसऱ्या अर्ध्या भागापेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो.

ब. कडा – तिळाच्या कडा अनियमित, झिजलेल्या किंवा अस्पष्ट असतात.

क. रंग – तीळ किंवा खवल्याचा रंग नेहमी सारखा नसतो. तो काळा, तपकिरी, लाल, पांढरा किंवा निळा दिसू शकतो.

ड. व्यास – त्वचेवरील दिसणारा डाग ६ मिमी पेक्षा मोठा आहे.

ई. उत्क्रांती – हा तीळ किंवा त्याची खूण काळानुसार वाढत राहते, त्याच्या रंग आणि आकारात बदल दिसून येतात.

तिळापासून पसरणारा लालसरपणा

तुमच्या तिळाची तपासणी करून, त्याच्या आजूबाजूची त्वचा कशी दिसते ते पाहा. जर त्वचा लालसर दिसत असेल आणि तिळाभोवती लाल वर्तुळ तयार झाले असेल, तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. लालसरपणा, सूज आणि जळजळ ही एक गंभीर समस्या आहे.

तिळाचा रंग बदलणे

प्रत्येक तीळ काळा किंवा तपकिरी रंगाचा नसतो. कर्करोगग्रस्त तीळ गुलाबी, लाल, पांढरा किंवा निळा दिसू शकतो. जर एखाद्या तिळाचा रंग बदलला किंवा तो बहुरंगी झाला, तर ते कर्करोगाचे एक मोठे लक्षण असू शकते. त्वचारोग तज्ज्ञाकडून ते तपासून घ्या.

न बरा होणारा फोड

त्वचेवर एक व्रण दिसतो, जो बरा होत नाही. हे त्वचेच्या कर्करोगाचे, जसे की बेझेल सेल कार्सिनोमा किंवा स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. हा व्रण काही आठवड्यांपर्यंतही बरा होत नाही. जर तुमच्या शरीरावर कुठेही लाल पुरळ, ओरखडा, उघडी जखम दिसली आणि ती आठवड्यांपर्यंत बरी होत नसेल, तर त्याबाबतची तपासणी करून घेण्यास उशीर करू नका.

खाज सुटणे, वेदना आणि त्वचेचा नाजूकपणा

त्वचेच्या कर्करोगातील बहुतेक बदल वेदनारहित असू शकतात; परंतु काही वेदनादायीही असू शकतात. त्वचेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये वेदना, खाज सुटणे किंवा त्वचेला सूज येणे यांचा समावेश होतो.

त्वचेच्या पोतातील बदल

त्वचेचा पोत हेदेखील त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. खवलेदार, खडबडीत, पुरळासारखी किंवा पापुद्रे निघणारी त्वचा हे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा किंवा इतर त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. काही कर्करोग त्वचेवर खडबडीत ठिपक्यांच्या स्वरूपात दिसू शकतात, जे बराच काळ बरे होत नाहीत. काही प्रकरणांमध्ये त्वचा तेलकट आणि मेणासारखी दिसू शकते.

त्वचेखाली गाठ तयार होणे

त्वचेखालील गाठ हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. जर गाठ मानेवर, काखेत किंवा जननेंद्रियाजवळ दिसली आणि ती एकापेक्षा जास्त असेल, तर तिची तपासणी करून घ्या. त्वचेच्या कर्करोगामुळे गाठी अचानक दिसू शकतात, त्यांना सूज येऊ शकते आणि त्या अनेक आठवडे टिकून राहू शकतात.

तुम्ही डॉक्टरांना कधी भेटायला पाहिजे?

कर्करोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांना कधी भेटावे यासाठी कोणताही निश्चित कालावधी नाही. जेव्हा कधी तुमच्या त्वचेवर एखादी नवीन गाठ, डाग, पुरळ, तीळ किंवा चामखीळ दिसेल, जी सामान्य दिसत नाही, तेव्हा त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या.