Throat Cancer Symptoms : जेव्हा घशातील मार्ग, स्वरयंत्र, टॉन्सिल्स किंवा घशाच्या इतर भागांमध्ये कर्करोगाच्या असामान्य पेशींची निर्मिती होऊ लागते, तेव्हा घशाचा कर्करोग होतो. या पेशींपासून गाठी (ट्युमर्स) तयार होतात आणि त्यांची वाढ होऊ लागते. त्यामुळे कर्करोगाचा प्रसार रोखण्यासाठी तो सुरुवातीच्या टप्प्यावरच ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते. घशाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती आणि कोणाला याचा धोका अधिक असतो ते जाणून घेऊया…
घशाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे
- घशाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर, रुग्णाला अनेकदा घसा दुखत असल्यासारखे वाटू शकते.
- घशात काहीतरी अडकल्याची भावना होऊ शकते.
- घसा दुखू शकतो.
- आजार बळावताना आवाजात बदल होणे किंवा आवाज घोगरा होणे, असे प्रकार दिसून येऊ शकतात.
- सुरुवातीच्या टप्प्यावर अन्न गिळताना त्रास होऊ शकतो.
- अन्न गिळण्यास त्रास होणे
- दीर्घकाळ टिकणारा अन् वारंवार येणारा खोकला
- रक्त पडणारा सततचा खोकला हे घशाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
- घशाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये अनेकदा कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणे दिसून येते.
- घशाच्या कर्करोगाशी संबंधित कानांच्या समस्या
घशाच्या कर्करोगामुळे कानातही वेदना होऊ शकतात. जरी कान सक्षम असले तरी ही वेदना उद्भवते. कारण- घसा आणि कान यांना संवेदना पुरवणाऱ्या मज्जातंतूंचे उगमस्थान एकच असते. परिणामी, घशाच्या कर्करोगामुळे कानात वेदना जाणवू शकते.
श्वास घेण्यास त्रास होणे
घशाचा कर्करोग जेव्हा बऱ्याच प्रमाणात बळावतो, तेव्हा श्वासमार्गात अडथळा निर्माण होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. श्वास अडकल्यासारखा वाटणे किंवा श्वास घेताना कष्ट पडणे यामुळे गुदमरल्यासारखी भावना निर्माण होऊ शकते. तथापि, श्वास घेण्यातील या अडचणी सहसा कर्करोगाच्या प्रगत टप्प्यावरच दिसून येतात.
दोन आठवड्यांपेक्षा दीर्घकालीन लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
जर एखाद्या व्यक्तीला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाजात बदल, घसा खवखवणे, वेदना किंवा अन्न गिळताना त्रास होणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील, तर त्यांकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी कान-नाक-घसा तज्ज्ञांचा (ENT सर्जन) सल्ला घ्यावा.
कोणाला जास्त धोका?
डॉक्टरांच्या मते, पुरुषांमध्ये घशाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. धूम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्यांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. कारण- या दोन्ही सवयींमुळे घशाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
