Risk Of High Dose Vitamin D Supplements: धावपळीची जीवनशैली आणि बदलत्या आहारपद्धतीमुळे सध्या ‘व्हिटॅमिन D’ ची कमतरता घरोघरी पाहायला मिळतेय. शरीरातील थकवा घालवण्यासाठी किंवा हाडांच्या मजबुतीसाठी अनेकजण स्वतःच्याच मनाने ‘व्हिटॅमिन D’ चे हाय डोस (Supplements) घेताना दिसतात. सोशल मीडियावर अर्धवट माहिती वाचून किंवा कोणाचे तरी ऐकून वर्षानुवर्षे गोळ्या सुरू ठेवणे हा प्रकार आता गंभीर वळणावर पोहोचला आहे.

अलीकडेच ‘कोरा’ (Quora) या व्यासपीठावर एका वापरकर्त्याने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, “दीर्घकाळ ‘व्हिटॅमिन डी’चे उच्च डोस घेण्याचे संभाव्य धोके काय आहेत? दुष्परिणाम सुरू होण्यापूर्वी एखादी व्यक्ती किती काळ सुरक्षितपणे हे डोस घेऊ शकते?” भारतासारख्या देशात, जिथे ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते आणि लोक स्वतःच्या मनाने औषधे (Self-supplementation) घेतात, तिथे हा प्रश्न अत्यंत कळीचा ठरतो.

या विषयावर अधिक स्पष्टता मिळवण्यासाठी दि इंडियन एक्सप्रेसने मुंबईतील दोन नामवंत तज्ज्ञांशी संवाद साधला. डॉ. व्यंकटेश शिवणे (कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट आणि मेटाबॉलिक फिजिशियन, जसलोक हॉस्पिटल) आणि डॉ. विमल पाहुजा (असोसिएट डायरेक्टर, इंटरनल मेडिसिन, डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई).

व्हिटॅमिन डीचा ‘हाय डोस’ म्हणजे नक्की काय?

डॉ. पाहुजा यांच्या मते, व्हिटॅमिन डीला ‘सनशाईन व्हिटॅमिन’ म्हटले जाते. कारण ते सूर्यप्रकाशातून मुबलक प्रमाणात मिळते. “भारत हा सूर्यप्रकाश असलेला देश असूनही, येथील बहुतांश लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून येते,” असे ते सांगतात.

पुरेशी पातळी: रक्तातील व्हिटॅमिन डीची पातळी 30 ng/mL पेक्षा जास्त असणे सुरक्षित मानले जाते.

धोकादायक पातळी: 100-150 ng/mL पेक्षा जास्त पातळी शरीरासाठी घातक ठरू शकते.

विषबाधा (Toxicity): जर कोणी अनेक आठवडे दररोज 50,000 IU पेक्षा जास्त डोस घेतला, तर शरीरात विषबाधा होण्याची शक्यता असते. यामुळे लघवीवाटे जास्त कॅल्शियम बाहेर पडते आणि किडनी स्टोनचा धोका वाढतो.

डॉ. शिवणे सांगतात की, “भारतात व्हिटॅमिन डीची कमतरता जितकी मोठी समस्या आहे, तितकीच आता अति-सेवनाची (Excess supplementation) समस्या नवीन चिंता बनली आहे.” ICMR आणि एन्डोक्रीन सोसायटी ऑफ इंडियाच्या मते, प्रौढांसाठी दररोज 600-800 IU डोस पुरेसा आहे, तर सुरक्षिततेची कमाल मर्यादा 4,000 IU/दिवस इतकी आहे.

दीर्घकाळ उच्च डोस घेण्याचे धोके

डॉ. शिवणे यांनी सावध केले आहे की, “दीर्घकाळ उच्च डोस घेतल्यास हायपरकॅल्सेमिया (रक्तातील कॅल्शियम वाढणे), किडनी स्टोन, रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम जमा होणे आणि हृदयाच्या ठोक्यांची लय बिघडणे यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.” व्हिटॅमिन डी हे चरबीत विरघळणारे (Fat-soluble) असल्याने त्याची विषबाधा हळूहळू होते. याची लक्षणे म्हणजे मळमळ, तहान लागणे, स्नायूंची कमकुवतपणा आणि गोंधळलेली अवस्था ही आहेत.

डॉ. पाहुजा यांच्या मते, अनेकदा रुग्ण साप्ताहिक डोस घेण्याऐवजी चुकून दररोज डोस घेतात किंवा बरे वाटतेय म्हणून डॉक्टरांनी सांगितलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ औषधे सुरू ठेवतात, ज्यामुळे विषबाधा होते.

उच्च डोस किती काळ सुरक्षित आहे?

“व्हिटॅमिन D चे डोस फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत,” असे डॉ. पाहुजा यांनी सांगितले. एकदा का व्हिटॅमिन डीची पातळी सामान्य झाली की, डॉक्टरांना ‘मेंटेनन्स डोस’बद्दल विचारावे. भारतात साधारणपणे दररोज 1000 IU ते 1500 IU इतका मेंटेनन्स डोस पुरेसा असतो.

सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावी?

जर शरीरात व्हिटॅमिन D चे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढले, तर खालील लक्षणे दिसू शकतात.

  • वारंवार लघवीला होणे.
  • अतिशय तहान लागणे.
  • पोटदुखी.
  • हाडे आणि शरीरात वेदना होणे.
  • अशा वेळी तातडीने रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरसची चाचणी करणे आवश्यक आहे.

चाचणी कधी करावी?

डॉ. शिवणे यांच्या मते, औषधे सुरू करण्यापूर्वी एकदा आणि त्यानंतर ८ ते १२ आठवड्यांनी चाचणी करावी. एकदा पातळी स्थिर झाली की, वर्षातून एकदा तपासणी पुरेशी आहे.

सूर्यप्रकाशाचे महत्त्व सांगताना डॉ. पाहुजा म्हणतात, “सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत किमान ४५ ते ६० मिनिटे उन्हात बसणे फायदेशीर ठरू शकते. जास्तीत जास्त त्वचेवर (हात, पाय, चेहरा) थेट ऊन पडू द्यावे आणि या काळात सनस्क्रीन लावणे टाळावे.”