Low BP Warning Signs : अनेकांना उच्च रक्तदाब (High BP) हीच आरोग्यासाठी मोठी समस्या वाटते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, रक्तदाब वाढणे जितके धोकादायक आहे, तितकेच रक्तदाब कमी होणेही धोकादायक ठरू शकते. ज्याप्रमाणे रक्तदाब वाढल्यावर शरीरात काही लक्षणे दिसतात, त्याचप्रमाणे रक्तदाब कमी झाल्यावरही काही त्रास जाणवू शकतात. उदाहरणार्थ, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा डोके हलके झाल्यासारखे वाटणे. मात्र, रक्तदाब कमी असताना हात-पाय सुन्न होणे किंवा त्यामध्ये मुंग्या येणे अशी लक्षणे दिसली, तर त्याचे कारण केवळ लो बीपी आहे असे समजू नये. या लक्षणांमागे इतर आरोग्यविषयक कारणेही असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे वारंवार जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

आयएसआयसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कार्डियाक सायन्सेस विभागातील कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जरी विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉक्टर सौरभ जुनेजा यांच्या मते, शरीर सुन्न होणे सहसा केवळ कमी रक्तदाबामुळे होत नाही. तर हात आणि पायांमधील सुन्नता इतर अनेक कारणांमुळे होऊ शकते. चला तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की, कमी रक्तदाबामुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि हात व पायांमधील सुन्नतेसाठी कोणती कारणे जबाबदार आहेत ते…

कमी रक्तदाबाची लक्षणे कोणती?

कमी रक्तदाबामुळे शरीरात काही लक्षणे दिसतात, जसे की चक्कर येणे, डोके हलके वाटणे, अशक्तपणा, अंधुक दिसणे आणि बेशुद्ध होणे. कमी रक्तदाबामुळे हात आणि पायांना येणारी सुन्नता ही एका वेगळ्या कारणामुळे असते. तज्ज्ञांच्या मते, रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे महत्त्वाच्या अवयवांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो, ज्यामुळे अशक्तपणा, गोंधळ आणि इतर लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे सुन्नतेला नेहमीच कमी रक्तदाबाशी जोडणे योग्य नाही.

हात आणि पाय सुन्न का होतात?

व्यक्तीचा रक्तदाब (BP) कमी असेल आणि त्याचवेळी हात-पाय सुन्न होत असतील, तर त्यामागे केवळ लो बीपी हे कारण असेलच असे नाही. हात-पाय सुन्न होण्यामागे काही इतर कारणेही असू शकतात. उदाहरणार्थ, नसांवर दबाव येणे, मधुमेह, व्हिटॅमिन B12 ची कमतरता, न्यूरोलॉजिकल समस्या इत्यादी.

रक्तदाब कमी झाल्यावर हात-पायांना मुंग्या कधी येऊ शकतात?

रक्तदाब कमी झाल्यावर काही वेळासाठी चक्कर येणे, डोके हलके वाटणे किंवा बेशुद्ध पडल्यासारखे जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांसोबत काही वेळा हात-पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येण्याचाही त्रास जाणवू शकतो. मात्र, शरीराचा एखादा भाग सतत सुन्न राहत असेल किंवा हात-पायांच्या ठरावीक भागातच मुंग्या येत असतील आणि त्यासोबत अशक्तपणाही जाणवत असेल, तर तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. समस्येचे नेमके कारण शोधण्यासाठी डॉक्टर रुग्णाचा रक्तदाब, सुरू असलेली औषधे, आधीपासून असलेले आजार आणि नसांशी संबंधित काही तपासण्या करू शकतात. त्यानंतर हात-पाय सुन्न होण्यामागचे योग्य कारण समजू शकते.

शरीरात अचानक दिसणारी ‘ही’ लक्षणे दुर्लक्षित करू नका

डॉक्टर जुनेजा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, चेहरा, हात किंवा पाय अचानक सुन्न होणे, विशेषतः शरीराच्या एका बाजूला सुन्नपणा जाणवणे, हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. अशा वेळी तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

याशिवाय खालील लक्षणे दिसल्यासही दुर्लक्ष करू नये…

चेहरा एका बाजूला वाकडा होणे – चेहऱ्याची एक बाजू अचानक लोंबकळल्यासारखी दिसणे.

हात-पायांमध्ये अचानक अशक्तपणा येणे – हात किंवा पायांमध्ये अचानक ताकद कमी होणे.

बोलण्यात अडचण येणे – बोलताना शब्द स्पष्ट न उच्चारता येणे किंवा इतरांचे बोलणे समजण्यास त्रास होणे.

बघण्यात अडचण येणे – अचानक डोळ्यांसमोर धूसर दिसणे किंवा बघण्यात अडचण येणे.

तीव्र डोकेदुखी – अचानक खूप तीव्र डोकेदुखी सुरू होणे.

चालताना अडचण येणे – चालताना तोल जाणे किंवा शरीराचा समतोल बिघडणे.

याशिवाय छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसल्यासही तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.