How to Make Tea Sweet Without Sugar : सवय लागणं जितकं सोपं असतं, तितकंच ती सवय सोडणं कठीण असतं. त्यामुळे चहा सोडणे, साखरेचे सेवन बंद करणे किंवा जंक फूड खाण्यावर नियंत्रण ठेवणे अनेकदा कठीण जाते. त्यातच सकाळ असो वा संध्याकाळ, काही लोकांना चहाचे सेवन केल्याशिवाय अजिबात जमत नाही. त्यामुळे काही जण साखरेशिवाय चहा पिण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करून पाहतात. पण, साखरेशिवाय चहा प्यायला पटकन जमतंच नाही.

पण, तुम्ही साखरेचे सेवन कमी करत असाल आणि साखर नसलेला बेचव चहा पिणे तुम्हाला जमत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. चहाला हलका नैसर्गिक गोडवा देण्यासाठी काही पदार्थांचा वापर करता येतो. मात्र, यापैकी प्रत्येक पर्यायाची चव साखरेसारखी असेलच असे नाही. तसेच, काही पदार्थांचा वापरही योग्य प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे. चला, असे कोणते पर्याय आहेत ते जाणून घेऊया.

स्टीविया (तुळशीसारखी दिसणारी वनस्पती)

साखर सोडायची इच्छा आहे. पण, एकदम साखर बंद करणे जमत नसेल. तर साखरेऐवजी कमी कॅलरी असलेला स्वीटनर वापरून पाहू शकता. स्टीविया हा त्यापैकी एक पर्याय आहे. स्टेविया चवीला खूप गोड असतो. त्यामुळे सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणातच वापरावा. जास्त प्रमाणात वापरल्यास त्याची चव कडवट लागू शकते.

ज्येष्ठमध

होय, तुम्ही ज्येष्ठमधाबरोबरही चहा बनवू शकता. त्याला नैसर्गिकरित्या गोड चव असते. चहा बनवताना तुम्ही ज्येष्ठमधाचा एक छोटा तुकडा घालून तो उकळू शकता. यामुळे चहाला हलका गोडवा आणि एक विशिष्ट सुगंध येईल. हे लक्षात ठेवा की, नियमित किंवा जास्त प्रमाणात सेवन करणे प्रत्येकासाठी योग्य नाही, म्हणून दररोज जास्त प्रमाणात वापरणे टाळा.

दालचिनी

दालचिनी साखरेइतकी गोड नसते. पण, तिचा सुगंध आणि हलकी गोड चव चहाला अधिक चवदार बनवू शकते. चहा उकळताना दालचिनीचा एक छोटा तुकडा घाला आणि नंतर तो काढून टाका.

वेलची किंवा बडीशेप

जर साखरेशिवाय चहा खूप कडू लागत असेल. तर वेलची मदत करू शकते. १ ते २ वेलची ठेचून चहामध्ये घाला. त्यांचा सुगंध आणि चव कडूपणा संतुलित करण्यास मदत करू शकतात. बडीशेपला हलकी गोड चव असते. चहामध्ये थोडी बडीशेप घालून उकळल्यास त्याची चव बदलू शकते.

मॉन्क फ्रूट स्वीटनर

बाजारात मिळणाऱ्या मॉन्क फ्रूट स्वीटनरचा वापर साखरेशिवाय चहाला गोडवा देण्यासाठी करता येतो. याची चव साखरेपेक्षा खूप गोड असू शकते, त्यामुळे सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात वापर करा. तसेच, पॅकेटवरील सूचनांनुसार योग्य प्रमाण ठेवणे महत्त्वाचे आहे.