Frequent-Acidity Can Cause Gastritis Disease: बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा आणि वाढता मानसिक ताण यामुळे सध्या ॲसिडिटीची (पित्त) समस्या वेगाने वाढत आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये उशिरा जेवणे, जंक फूडचे अतिसेवन आणि शारीरिक व्यायामाचा अभाव यामुळे हा त्रास बळावताना दिसतोय. जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होत असेल, तर हे एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.
ॲसिडिटी म्हणजे केवळ अपचन नव्हे!
जर तुम्हाला सतत छातीत जळजळणे, आंबट ढेकर येणे, घशात जळजळ किंवा पोटात जडपणा जाणवत असेल, तर याला सामान्य समस्या समजून सोडून देऊ नका. वारंवार होणारी ॲसिडिटी ही केवळ खाण्यापिण्यातील गडबड नसून खालील गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
- GERD (गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज): यात पोटातील ॲसिड वारंवार अन्ननलिकेत येते.
- हायटल हर्निया आणि पेप्टिक अल्सर: पोटातील जखमा किंवा अंतर्गत समस्या.
- गॅस्ट्रोपेरेसिस: पचनसंस्थेची मंदावलेली गती.
तज्ज्ञांच्या मते, जर आठवड्यातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा ॲसिडिटी होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
या सवयी ठरतात कारणीभूत
दैनंदिन जीवनातील काही चुकांमुळे शरीरात ॲसिडचे प्रमाण वाढते:
- तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाणे.
- रात्री उशिरा जेवणे किंवा जेवल्याबरोबर लगेच झोपणे.
- धूम्रपान आणि मद्यपानाचे अतिसेवन.
- चहा-कॉफीचे अतिप्रमाण आणि सततचा ताण.
गंभीर धोक्याचे संकेत: यांकडे दुर्लक्ष करू नका
जर ॲसिडिटीसोबत खालील लक्षणे दिसत असतील, तर ही धोक्याची घंटा असू शकते:
- अन्न गिळताना त्रास होणे.
- अचानक वजन कमी होणे.
- उलटीतून रक्त पडणे.
- शौचावाटे काळ्या रंगाची विष्ठा होणे.
ही लक्षणे पेप्टिक अल्सर, गॅस्ट्र्रायटिस किंवा पोटाच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात. अशा परिस्थितीत विलंब न करता उपचार करणे गरजेचे आहे.
घरगुती उपाय की डॉक्टरी सल्ला?
अनेकजण मेडिकलमधून स्वतःच्या मनाने गोळ्या घेऊन खातात, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. चुकीच्या औषधांमुळे दीर्घकाळात दुष्परिणाम होऊ शकतात. औषधांसोबतच जीवनशैलीत बदल करणे हाच यावर कायमस्वरूपी उपाय आहे.
बचावासाठी काय कराल?
- वेळेवर जेवण: दररोज जेवणाची एकच वेळ निश्चित करा.
- हलका आहार: एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी थोड्या थोड्या अंतराने थोडे थोडे खा.
- झोप आणि जेवण: झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी जेवा.
- व्यसनमुक्ती: सिगारेट आणि दारूपासून दूर राहा.
- मानसिक आरोग्य: ताण कमी करण्यासाठी योगासने, प्राणायाम आणि ध्यान (Meditation) करा.
कधीतरी ॲसिडिटी होणे सामान्य आहे, पण तिचा ‘रुटिन’ होणे शरीरासाठी धोक्याचे आहे. वेळीच सावध व्हा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा.
