What Causes High Blood Sugar : जगभरात मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे, आता तरुण वयातील लोकांमध्येही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची समस्या दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या (International Diabetes Federation) माहितीनुसार, जगभरातील ५८० दशलक्षांहून अधिक लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ नियंत्रणात न राहिल्यास हृदय, किडनी, डोळे आणि शरीरातील नसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञ ३० वर्षांवरील लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे रक्तातील साखरेची तपासणी करण्याचा सल्ला देतात. मधुमेह केवळ गोड पदार्थ खाण्यामुळेच होत नाही; तर त्याचा संबंध इन्सुलिन या संप्रेरकाच्या (hormone) कार्याशी देखील आहे.

चला, कोणत्या सवयींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि का याबद्दल जाणून घेऊया.

मधुमेहाचा धोका कसा वाढतो?

अन्न खाल्ल्यानंतर, त्यातील कर्बोदके (carbohydrates) पचतात आणि त्यांचे ग्लुकोजमध्ये (glucose) रूपांतर होते, जे नंतर रक्तप्रवाहाद्वारे संपूर्ण शरीरात वाहून नेले जाते. पेशी ऊर्जा निर्माण करण्यासाठी या ग्लुकोजचा वापर करतात. स्वादुपिंडातून स्रवणारे इन्सुलिन या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. इन्सुलिन हे एक संप्रेरक आहे, जे रक्तातील ग्लुकोज (साखर) शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. मात्र, शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार झाले नाही किंवा पेशींनी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद दिला नाही, तर ग्लुकोज पेशींमध्ये जाण्याऐवजी रक्तातच साचू लागते. परिणामी, रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो.

पुरेशी झोप न घेणे

डॉक्टरांच्या मते, दिवसातून सात तासांपेक्षा कमी झोपल्याने इन्सुलिन प्रतिरोध आणि रक्तातील साखरेच्या पातळीतील चढ-उतार यांचा धोका वाढू शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे शरीराच्या जैविक घड्याळावर परिणाम होतो आणि इन्सुलिन व कॉर्टिसोलसारख्या हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. यामुळे पेशींना ग्लुकोज वापरणे कठीण होते. गोड खाण्याची तीव्र इच्छा देखील वाढू शकते.

अति उपवास

काही लोकांसाठी अधूनमधून उपवास करणे फायदेशीर ठरू शकते. पण, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ उपवास करणे हानिकारक असू शकते. यामुळे तणाव निर्माण करणारे हार्मोन्स सक्रिय होऊ शकतात आणि रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोध असलेल्या लोकांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पुरेसे पाणी आणि संतुलित आहार देखील आवश्यक आहे.

ताण

दीर्घकालीन ताण देखील रक्तातील साखर वाढण्याचे कारण असू शकतो. तणावाच्या वेळी, शरीर कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईनसारखे हार्मोन्स स्रवते. या हार्मोन्सची पातळी सतत वाढलेली राहिल्यास इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम पेशींमधील ग्लुकोज शोषणावर होतो आणि साखरेची पातळी नियंत्रित करणे कठीण होते.

रात्री उशिरा जेवणे

रात्री उशिरा जेवण्याची आणि जेवणानंतर लगेच झोपण्याची सवय देखील रक्तातील साखरेवर परिणाम करू शकते. रात्रीच्या वेळी शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता कमी होऊ शकते. कर्बोदके आणि अस्वास्थ्यकर चरबी जास्त असलेले पदार्थ विशेषतः साखरेची पातळी वाढवू शकतात. तज्ञ रात्री लवकर जेवण्याची आणि आहारात फायबर, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीचा समावेश करण्याची शिफारस करतात.