Blood Donation Recovery Time: रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. कारण तुमच्या रक्तामुळे एखाद्या गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतात. मात्र, रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरात नेमके काय बदल होतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? रक्तदान करताना शरीरातून रक्तासोबत काही प्रमाणात प्लाझ्मा आणि लाल रक्तपेशीही बाहेर पडतात. त्यानंतर शरीर या घटकांची भरपाई करण्याची प्रक्रिया सुरू करते. विशेष म्हणजे, रक्तातील द्रवपदार्थांची कमतरता भरून निघण्यासाठी साधारण ३६ तास लागू शकतात; पण लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन पूर्ववत होण्यासाठी अनेक आठवडे लागू शकतात.
काही लोकांना रक्तदानानंतर चक्कर येणे, थकवा जाणवणे, मळमळ किंवा अशक्तपणा यांसारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे रक्तदान केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक सूचनांनुसार, रक्तदानानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे, काहीतरी खाणे आणि पुढील २४ तास पुरेसे द्रवपदार्थ पिणे महत्त्वाचे आहे. तर मग जाणून घेऊया, रक्तदानानंतर शरीरात काय बदल होतात आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात.
रक्तदान केल्यानंतर शरीरात सर्वात आधी काय बदल होतात?
सामान्य रक्तदान करताना साधारण ४५० मिली रक्त घेतले जाते. मात्र, रक्तदान केंद्र आणि देशानुसार हे प्रमाण वेगवेगळे असू शकते. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सरासरी ४.५ ते ५ लिटर रक्त असते. त्यामुळे रक्तदान केल्यानंतर शरीरातील एकूण रक्ताचे प्रमाण काही काळासाठी कमी होते.
रक्तामध्ये प्लाझ्मा नावाचा द्रवपदार्थ असतो. त्यात प्रामुख्याने पाणी, प्रथिने आणि इतर आवश्यक घटक असतात. रक्तदान केल्यानंतर शरीर पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या मदतीने या द्रवपदार्थांची कमतरता भरून काढू लागते. त्यामुळे रक्तदानानंतर पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे ठरते.
काही व्यक्तींना रक्तदानानंतर सुई टोचलेल्या जागी वेदना होणे, निळसर डाग पडणे किंवा थोडा अशक्तपणा जाणवू शकतो. या तक्रारी काही काळात कमी होतात. मात्र, रक्तस्राव थांबत नसेल, हाताला जास्त सूज येत असेल किंवा सतत चक्कर येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रक्तदानानंतर रक्ताचे प्रमाण पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागतो?
रक्तदान केल्यानंतर शरीर लगेचच रिकव्हरीची प्रक्रिया सुरू करते. या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे रक्तातील द्रवपदार्थांची भरपाई करणे.
WHO च्या माहितीनुसार, रक्तदानादरम्यान कमी झालेल्या द्रवपदार्थांची भरपाई होण्यासाठी साधारण ३६ तास लागू शकतात. मात्र, हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची स्थिती, पाण्याचे सेवन आणि आरोग्यावर अवलंबून असते.
एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. रक्तातील द्रवपदार्थांची कमतरता भरून निघाली म्हणजे लाल रक्तपेशींचीही भरपाई झाली असे नाही. प्लाझ्मा आणि लाल रक्तपेशी यांची रिकव्हरी वेगवेगळ्या गतीने होते. त्यामुळे रक्तदानानंतर बरे वाटू लागले तरी शरीराला पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो.
लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन पूर्ववत होण्यासाठी किती दिवस लागतात?
रक्तातील लाल रक्तपेशी म्हणजेच रेड ब्लड सेल्स (RBCs) शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करतात. या पेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचे प्रथिन असते. ते ऑक्सिजन स्वतःशी जोडून शरीराच्या विविध ऊतींपर्यंत पोहोचवते. रक्तदान करताना काही प्रमाणात लाल रक्तपेशीही शरीरातून बाहेर पडतात. त्यामुळे त्यांची भरपाई होण्यासाठी प्लाझ्माच्या तुलनेत अधिक वेळ लागतो.
NHS च्या माहितीनुसार, रक्तदानानंतर अस्थिमज्जा (Bone Marrow) नवीन लाल रक्तपेशी तयार करण्याचे काम सुरू करते. या पेशींची भरपाई होण्यासाठी अनेक आठवडे लागू शकतात. काही निरोगी व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिनची पातळी साधारण ६ ते १२ आठवड्यांत पूर्ववत होऊ शकते. मात्र, हे शरीरातील लोहाचे प्रमाण, आहार आणि रक्तदानापूर्वीची हिमोग्लोबिनची पातळी यावर अवलंबून असते.
विशेष म्हणजे, वारंवार रक्तदान करणाऱ्या व्यक्तींमध्ये शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे किंवा अशक्तपणा वाटणे अशा तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्या. स्वतःहून आयर्न सप्लिमेंट घेणे टाळा.
रक्तदानानंतर ‘या’ चुका अजिबात करू नका!
रक्तदान केल्यानंतर काही छोट्या चुका तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे शरीराची रिकव्हरी व्यवस्थित होण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.
१. लगेच जड व्यायाम करणे
रक्तदान केल्यानंतर लगेच जिममध्ये जाणे, धावणे किंवा वजन उचलणे टाळा. शरीराला रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ द्या. विशेषतः रक्तदान केल्याच्या दिवशी अतिश्रमाची कामे करू नका.
२. पुरेसे पाणी न पिणे
रक्तदानानंतर शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता भरून काढणे आवश्यक असते. त्यामुळे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करू नका. डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवण्याची शक्यता वाढू शकते.
३. उपाशी राहणे
रक्तदान केल्यानंतर काहीतरी पौष्टिक खा. हलका नाश्ता किंवा संतुलित आहार घेतल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळण्यास मदत होते. जेवण टाळू नका.
४. लगेच गरम पाण्याने अंघोळ करणे
रक्तदानानंतर लगेच खूप गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. कारण उष्णतेमुळे काही व्यक्तींना चक्कर येऊ शकते. विशेषतः अशक्तपणा जाणवत असल्यास काळजी घ्या.
५. मद्यपान करणे
रक्तदानानंतर किमान २४ तास मद्यपान टाळणे योग्य ठरते. मद्यपानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची आणि चक्कर येण्याची शक्यता वाढू शकते.
६. सुई टोचलेल्या जागेकडे दुर्लक्ष करणे
रक्तदानानंतर सुई टोचलेल्या जागेवर रक्तस्राव होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वच्छ कापडाने त्या जागेवर सतत दाब द्या आणि हात वरच्या दिशेने ठेवा. रक्तस्राव थांबत नसेल किंवा हाताला जास्त सूज येत असेल, तर वैद्यकीय मदत घ्या.
रक्तदानानंतर कोणती लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे?
रक्तदानानंतर थोडा थकवा किंवा चक्कर येणे काही व्यक्तींमध्ये सामान्य असू शकते. मात्र, काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
- सतत चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे.
- सुई टोचलेल्या जागेवरून रक्तस्राव थांबत नसणे.
- हाताला जास्त सूज येणे किंवा तीव्र वेदना होणे.
- श्वास घेण्यास त्रास होणे.
- छातीत दुखणे.
अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
रक्तदानानंतर स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे
रक्तदान केल्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जीवनदान मिळू शकते. मात्र, रक्तदानानंतर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुरेसे पाणी पिणे, पौष्टिक आहार घेणे, काही काळ विश्रांती घेणे आणि जड व्यायाम टाळणे या साध्या गोष्टी लक्षात ठेवा. योग्य काळजी घेतल्यास शरीराला रिकव्हरी होण्यास मदत होते आणि भविष्यातही सुरक्षितपणे रक्तदान करता येते.
