Breakfast: सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वांत महत्त्वाचा आहार मानला जातो. रात्रीच्या दीर्घ उपवासानंतर शरीराला ऊर्जा, मेंदूला आवश्यक पोषण आणि चयापचय (मेटाबॉलिझम) सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पौष्टिक नाश्ता उपयुक्त ठरतो. नाश्त्यामध्ये प्रथिने, संपूर्ण धान्ये, फळे, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आणि सुका मेवा यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. नियमित आणि संतुलित नाश्ता केल्याने दिवसभर उत्साह टिकून राहण्यास, एकाग्रता सुधारण्यास आणि अनारोग्यदायी खाण्याची सवय कमी होण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, अनेक जण दररोज एकाच प्रकारचा नाश्ता करतात. जसे की, चहा-चपाती, तूप-चपाती, पोहे, उपमा; पण रोज एकच नाश्ता करणं आरोग्यासाठी योग्य आहे का?

एकाच प्रकारचा नाश्ता करण्याचे फायदे काय आहेत?

दररोज तोच आरोग्यदायी नाश्ता करण्याचे काही फायदे असू शकतात. यामुळे सकाळी काय खावे हे ठरवण्यात लागणारा वेळ वाचतो. तुम्ही अस्वास्थ्यकर पदार्थ निवडण्याची शक्यता कमी होते. त्याशिवाय संतुलित नाश्त्यामुळे रक्तातील साखर आणि ऊर्जेची पातळी सुधारू शकते.

नेहमी एकच नाश्ता करण्याचे तोटे कोणते?

जर तुमच्या नाश्त्यामध्ये फक्त ब्रेड आणि बटर, गोड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ असतील, तर कालांतराने त्यामुळे पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्याशिवाय एकाच चवीचे पदार्थ खाल्ल्याने अनेक लोकांची खाण्यातील आवड कमी होते, ज्यामुळे ते आवश्यक प्रमाणात खात नाहीत.

नाश्त्यामध्ये काय समाविष्ट करावे?

  • आहारतज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये संतुलित पदार्थांचा समावेश केला पाहिजे, जसे की- आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. त्यामध्ये अंडी, चीज, दही, दूध, मुगाच्या डाळीचा चीला किंवा मोड आलेले धान्य इत्यादींचा समावेश होतो.
  • फायबरदेखील महत्त्वाचे आहे. त्यासाठी ओट्स, लापशी, पोहे, संपूर्ण धान्ये यांचा आहारात समावेश करा.
  • मोसमी फळे आणि बेरी यांचा समावेश करा.
  • तुमच्या आहारात बदाम, अक्रोड, जवस किंवा चिया सीड्स यांसारख्या आरोग्यदायी स्निग्ध पदार्थांचा समावेश करून पाहा.
  • तुमची इच्छा असल्यास मूळ पदार्थ तोच ठेवा; पण त्यात छोटे बदल करा. उदाहरणार्थ – एका दिवशी तुमच्या ओट्समध्ये एक केळे, दुसऱ्या दिवशी एक सफरचंद व तिसऱ्या दिवशी सुका मेवा व बिया घाला. त्याचप्रमाणे तुमचे दही, फळे आणि प्रथिनांचे स्रोत वेगवेगळे ठेवा.

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

दररोज एकच प्रकारचा नाश्ता करणे प्रत्येकासाठी योग्य असेलच, असे नाही. एकाच पदार्थातून सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि इतर पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळतीलच असे नाही. त्यामुळे नाश्त्यामध्ये वेळोवेळी विविधता ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ- एका दिवशी पोहे, दुसऱ्या दिवशी उपमा, इडली, थालीपीठ, ओट्स, मूग डाळीचे चिल्ले किंवा अंडी यांसारखे पौष्टिक पर्याय निवडता येतात. मात्र, जर एखादा नाश्ता संतुलित पोषण देत असेल आणि त्यामध्ये आवश्यक ते बदल करून विविध पोषक घटकांचा समावेश केला जात असेल, तर तो काही दिवस नियमित खाण्यात हरकत नाही. महत्त्वाचे म्हणजे नाश्ता संतुलित, पौष्टिक आणि आपल्या आरोग्याच्या गरजेनुसार असावा.