कुटुंबातील एखादी व्यक्ती कर्करोगाशी झुंज देत असताना अवयवदानाचा प्रश्न समोर आला, तर तो वरकरणी सोपा वाटू शकतो. मात्र, कर्करोग असलेली व्यक्ती अवयवदान करू शकते का? वैद्यकीय व्यवहारात या प्रश्नाचे उत्तर इतके सरळ नसते. कर्करोगाचा इतिहास असणे म्हणजे एखादी व्यक्ती अवयव किंवा ऊतींच्या दानासाठी आपोआप अपात्र ठरत नाही. त्याच वेळी सक्रिय कर्करोग असलेल्या व्यक्तीचे अवयव प्रत्यारोपणासाठी वापरण्यापूर्वी संभाव्य जोखमीचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक असते. प्रत्यारोपित अवयवाच्या माध्यमातून कर्करोगाच्या पेशी प्राप्तकर्त्याच्या शरीरात पोहोचण्याची शक्यता ही यामागील मुख्य चिंता असते. त्यामुळे केवळ पूर्वीच्या निदानाच्या आधारावर कुटुंबीयांनी निर्णय घेण्याऐवजी अवयवदान आणि प्रत्यारोपण करणाऱ्या वैद्यकीय पथकाने या संदर्भातील निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. डॉ. अरविंद बडिगर, टेक्निकल डायरेक्टर, बी.डी.आर. फार्मास्युटिकल्स इंटरनॅशनल प्रा. लि यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
सक्रिय कर्करोगाच्या बाबतीत विशेष काळजी आवश्यक
संभाव्य अवयवदात्याचे मूल्यांकन करताना सक्रिय कर्करोगाची उपस्थिती हा सर्वांत महत्त्वाचा विचार करण्याजोगा घटक असतो. कर्करोग त्याच्या मूळ ठिकाणापासून इतर ठिकाणी पसरला असल्यास, शरीराच्या इतर भागांमध्येही कर्करोगाच्या पेशी असण्याची शक्यता ही गंभीर बाब ठरते.
मात्र, सर्व प्रकारचे कर्करोग एकसारखे नसतात. अनेक वर्षांपूर्वी पूर्णपणे उपचार झालेला आणि मर्यादित स्वरूपाचा छोटा ट्यूमर आणि अलीकडे पुन्हा उद्भवलेला किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला आक्रमक कर्करोग यांची जोखीम वेगवेगळी असते. त्यामुळे कर्करोगाचा प्रकार, स्टेज, ग्रेड, उपचाराचा इतिहास आणि कर्करोग पुन्हा उद्भवला आहे की नाही, हे मूल्यांकनातील महत्त्वाचे घटक असतात. उपचारानंतरचा कालावधी आणि आजारमुक्त असल्याचे पुरावे यांचाही निर्णयावर परिणाम होऊ शकतो.
कर्करोगाचा प्रकार महत्त्वाचा
काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये प्रत्यारोपणाच्या माध्यमातून कर्करोग पसरण्याचा धोका इतर प्रकारांपेक्षा अधिक असतो. उदाहरणार्थ- ज्या कर्करोगांमध्ये शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याची किंवा पुन्हा उद्भवण्याची शक्यता अधिक असते, अशा कर्करोगांच्या बाबतीत विशेष काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक असते. कर्करोगावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर आणि योग्य कालावधीपर्यंत आजारमुक्त असल्याचे निरीक्षण झाल्यानंतर पूर्वी कर्करोग असलेल्या रुग्णांना अवयवदानासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरवले जाईलच, असे नाही. हा फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण कर्करोगाचे अनेक प्रकार असतात आणि ज्यांना आयुष्यात कधीतरी कर्करोग झाला होता अशा प्रत्येक व्यक्तीला अवयवदान करता येत नाही, असे सरसकट म्हणणे वैद्यकीयदृष्ट्या अचूक ठरणार नाही.
अवयवदान आणि ऊतींचे दान यांत फरक
कुटुंबीयांनी हेदेखील समजून घेणे आवश्यक आहे की, अवयवदान आणि ऊतींचे दान यांबाबतचे वैद्यकीय विचार वेगवेगळे असतात. एखाद्या व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास पाहता, ठोस अवयवांचे दान योग्य ठरत नसले तरी प्राप्त परिस्थिती आणि त्या वेळी लागू असलेली वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे यांनुसार काही ऊती दानासाठी विचारात घेतल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे काही वैद्यकीय परिस्थितींचा परिणाम अवयवदान आणि ऊतींच्या दानावर दोन्हीवर होऊ शकतो. दात्याचा वैद्यकीय इतिहास, केल्या गेलेल्या तपासण्यांचे अहवाल आणि ज्याच्यावर प्रत्यारोपण करावयाचे आहे त्या व्यक्तीच्या विशिष्ट गरजा यांची माहिती पडताळून पाहिल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जातो. केवळ निदानाच्या आधारावर हा निर्णय अचूकपणे घेता येत नाही.
संपूर्ण वैद्यकीय इतिहास देणे अत्यावश्यक
अवयवदानाचा विचार करणाऱ्या कुटुंबीयांसाठी पारदर्शकता विशेष महत्त्वाची आहे. व्यक्तीच्या कर्करोगाच्या निदानासंदर्भातील संपूर्ण माहिती अवयवदानाशी संबंधित पथकाला देणे आवश्यक आहे. त्यामध्ये कर्करोगाचा प्रकार, निदान कधी झाले, त्याचा टप्पा, कोणते उपचार घेण्यात आले, कर्करोग पुन्हा उद्भवला आहे का आणि सध्याची वैद्यकीय स्थिती यांचा समावेश होतो. कुटुंबीयांना क्षुल्लक वाटणारी माहितीही प्रत्यारोपण तज्ज्ञांसाठी जोखमीचे मूल्यांकन करताना महत्त्वाची ठरू शकते.दात्या व्यक्तीला अवयवदानापासून परावृत्त करणे हा या मूल्यांकनाचा उद्देश नाही. प्राप्तकर्त्याला संभाव्य जोखमीपासून सुरक्षित ठेवणे आणि त्याच वेळी वैद्यकीयदृष्ट्या योग्य असलेल्या अवयवदानाच्या प्रत्येक संधीचा विचार करणे, हा त्यामागील उद्देश आहे.
कुटुंबीयांनी स्वतःहून पात्रता ठरवू नये
कुटुंबीयांसाठी कदाचित सर्वांत महत्त्वाचा संदेश असा आहे की, स्वतःहून अवयवदान नाकारू नका; परंतु स्वतःहून पात्रताही गृहीत धरू नका. पूर्वी कर्करोग झालेली व्यक्ती काही परिस्थितींमध्ये अवयवदान करू शकते. त्याचप्रमाणे वरकरणी सारखे वाटणारे निदान असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला अवयवदानासाठी योग्य ठरविता येणार नाही. कारण- त्या व्यक्तीच्या कर्करोगाचा प्रकार किंवा त्याची प्रकृती वेगवेगळ्या पातळीची जोखीम निर्माण करू शकते. त्यामुळे योग्य मार्ग म्हणजे अवयवदानाची इच्छा व्यक्त करणे आणि अधिकृत अवयवदान व प्रत्यारोपण तज्ज्ञांना आवश्यक वैद्यकीय मूल्यांकन करण्याची संधी देणे.
करुणेसोबत वैद्यकीय जबाबदारीही महत्त्वाची
अवयवदान हे अत्यंत उदात्त आणि उदार कार्य आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा कुटुंबीय आधीच दुःख आणि कठीण वैद्यकीय निर्णयांचा सामना करीत असतात. मात्र, प्रत्यारोपणामध्ये दोन्ही बाजूंनी जबाबदारी असते. प्राप्तकर्त्याला टाळता येण्याजोग्या जोखमींपासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे आणि त्याच वेळी वैद्यकीयदृष्ट्या योग्य असलेल्या अवयवदानाच्या प्रत्येक संधीचा विचार केला गेला पाहिजे.
त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेणे, उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाशी अवयवदानाबाबत चर्चा करणे, वैद्यकीय इतिहासाची अचूक माहिती देणे आणि प्रत्यारोपण तज्ज्ञांवर अंतिम निर्णय सोपवणे या कर्करोगाचे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ठरतात.
