Quitting Sugar Benefits :आजकाल वजन कमी करणे आणि आरोग्य सुधारण्यासाठी अनेकजण “नो शुगर” किंवा साखरमुक्त आहाराचे चॅलेंज स्वीकारताना दिसतात. काहीजण काही आठवडे तर काहीजण काही महिने ‘ॲडेड शुगर’ टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, एखाद्याने जर पूर्ण एक वर्ष ‘ॲडेड शुगर’ पूर्णपणे बंद केली, तर शरीराच्या वजनावर आणि एकूण आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन अंशुल सिंह यांच्या मते, ‘ॲडेड शुगर’ पूर्णपणे बंद केल्याने वजन नियंत्रण आणि मेटाबॉलिक आरोग्यासाठी फायदे होऊ शकतात; मात्र त्याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे असतात. कारण आहार, शारीरिक हालचाल, झोपेची गुणवत्ता आणि तणाव यांसारखे घटक शरीराच्या प्रतिसादावर मोठा प्रभाव टाकतात.

वर्षभर साखर बंद केल्यास प्रत्यक्षात किती वजन कमी होऊ शकते? (How much weight can you realistically lose?)

वजन कमी करणे हे साखर कमी करण्यामागील सर्वात मोठे कारण मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने साखरयुक्त पेये, मिठाई आणि जास्त ‘ॲडेड शुगर’ असलेले प्रोसेस्ड पदार्थ पूर्णपणे बंद केले आणि त्याऐवजी संतुलित आहाराचा अवलंब केला, तर एका वर्षात साधारणपणे ४ ते १० किलो वजन कमी होऊ शकते.

Award Banner

मात्र, वजन कमी होण्याचा वेग आणि प्रमाण हे अनेक घटकांवर अवलंबून असते. दिवसातून घेतले जाणारे एकूण कॅलरीज, शारीरिक हालचालीचे प्रमाण, शरीराचा मेटाबॉलिक रेट, झोपेची गुणवत्ता आणि तणावाची पातळी या सर्व बाबी त्यावर परिणाम करतात. केवळ साखर बंद केली आणि इतर आहारातील सवयी बदलल्या नाहीत, तर वजनात मोठा फरक दिसेलच असे नाही. दीर्घकाळ टिकणारे वजन नियंत्रण हे सातत्यपूर्ण निरोगी सवयी आणि योग्य प्रमाणात अन्न सेवनावर अवलंबून असते.

साखर कमी केल्यावर शरीरात कोणते बदल होतात? (What changes happen in the body?)

साखरेचे सेवन कमी झाल्यानंतर शरीरात काही महत्त्वाचे बदल दिसू लागतात. रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर राहू लागते आणि इन्सुलिनचे अचानक वाढणारे स्पाइक्स कमी होतात. यामुळे शरीर ऊर्जा अधिक कार्यक्षमतेने वापरू लागते.

काळानुसार शरीरात जास्त साखरेमुळे साठणारी अतिरिक्त चरबी कमी प्रमाणात साठू लागते. अनेकांना दिवसभर ऊर्जा अधिक स्थिर राहिल्याचे जाणवते आणि मूडमध्ये होणारे चढ-उतार कमी होतात. यासोबतच पचनाशी संबंधित त्रासातही काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. अनेकांना साखर कमी केल्यानंतर शरीरातील ऊर्जा अधिक वाढल्याचे जाणवते आणि अचानक येणारा थकवा किंवा ऊर्जा कमी होण्याचे प्रमाण घटते.

साखर बंद केल्याने पोटाची चरबी कमी होते का? (Does quitting sugar reduce belly fat?)

पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी साखर कमी करणे उपयुक्त ठरू शकते. कारण साखरयुक्त पदार्थांमुळे शरीरात जास्त कॅलरीज जातात आणि चरबी साठण्याची प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळे साखर कमी केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.

मात्र, तज्ज्ञांच्या मते केवळ साखर बंद करणे पुरेसे नसते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी एकूण कॅलरी संतुलन, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि तणाव नियंत्रण या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. जर एखाद्याने साखर बंद केली, पण इतर पदार्थांमधून जास्त कॅलरीज घेत राहिला किंवा शारीरिक हालचाल कमी केली, तर अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता कमी असते. संपूर्ण धान्ये, प्रथिने आणि फायबरयुक्त आहारासोबत नियमित शारीरिक हालचाल केल्यास शरीररचना सुधारण्यास अधिक मदत होते.

साखरेची सवय खरोखर कमी होते का? (Do sugar cravings actually reset?)

साखर कमी करण्याच्या सुरुवातीच्या काळात अनेकांना गोड खाण्याची तीव्र इच्छा जाणवते. याचे कारण मेंदूला साखरेमुळे मिळणाऱ्या झटपट ऊर्जेची सवय झालेली असते. मात्र दोन ते चार आठवड्यांच्या कालावधीत चव ओळखणारे रिसेप्टर्स आणि मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम हळूहळू नव्या सवयींशी जुळवून घेऊ लागतात.

काही आठवड्यांनंतर नैसर्गिक अन्नपदार्थ अधिक गोड लागायला लागतात आणि खूप गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होऊ लागते. काही महिन्यांनंतर अनेकांना पूर्वीइतकी गोड चव आवश्यक वाटत नाही. नियमित वेळेवर जेवण करणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे या गोष्टी या बदलांना सुलभ बनवतात.

जीवनशैलीचा एकत्रित परिणाम महत्त्वाचा (Importance of overall lifestyle habits)

तज्ज्ञांच्या मते, ॲडेड शुगर’ बंद करणे हा आरोग्य सुधारण्याचा एक महत्त्वाचा टप्पा असू शकतो; मात्र त्यासोबत इतर जीवनशैलीतील सवयींचाही तितकाच प्रभाव असतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण या सर्व गोष्टी एकत्रितपणे पाळल्यास वजन नियंत्रण आणि एकूण आरोग्यात अधिक चांगले परिणाम दिसून येतात.

टीप -वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.