How Coffee Affect Your Liver, Brain And Digestion : कोणी चहाप्रेमी असतं, तर कोणी कॉफीप्रेमी असतं. पण, चहा पिण्याबद्दलची लोकांची वेगवेगळी मतं आहेत तशी कॉफी पिण्याबद्दलही आहेत. काहींसाठी, कॉफी एक दिलासा देणारे पेय तर इतरांसाठी, याचा संबंध खराब झोप, चिंता, जास्त प्यायल्यावर होणारी किंचित अस्वस्थता यांच्याशी जोडलेला आहे. या दोन्ही बाजू अस्तित्वात आहेत आणि कोणतीही बाजू पूर्णपणे चुकीची नाही.
पण, यामागे आणखीही काही कारणे आहेत. हार्वर्ड, स्टॅनफर्ड आणि एम्स येथे प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पचनसंस्थेचे तज्ञ) डॉक्टर सौरभ सेठी यांच्या मते, कॉफी म्हणजे केवळ दुष्परिणाम नव्हे. नुकत्याच एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, अगदी दोन आठवडे जरी नियमित कॉफीचे सेवन केले, तरी त्याचे आरोग्यासाठी काही लक्षणीय फायदे होऊ शकतात.
नियमित कॉफी प्यायल्याने काय होते?
यकृताचे आरोग्य सुधारते
नियमित कॉफी सेवनाचा संबंध फॅटी लिव्हर, फायब्रोसिस आणि सिरोसिसचा धोका कमी होण्याशी जोडला गेला आहे. याचा अर्थ असा की यकृताच्या कार्याला दीर्घकाळासाठी अधिक चांगला आधार मिळतो.
चयापचयाला मिळते चालना
कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिडसारखे घटक असतात जे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवू शकतात. यामुळे शरीराला ऊर्जेवर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्यास मदत होऊ शकते.
मेंदू सतर्क राहतो
कॉफीमध्ये कॅफिन असते. यामुळे सतर्कता, एकाग्रता, एकूणच मानसिक कामगिरीत सुधारणा होऊ शकते आणि ती नक्कीच जाणवते.
पचन सुलभ होते
अनेक लोकांमध्ये कॉफी आतड्यांची हालचाल आणि पचनसंस्थेची गती (gut motility) उत्तेजित करू शकते. काहींसाठी, याचा साधा अर्थ असा होतो की, शरीरातील पचनक्रिया अधिक नियमितपणे पार पडते.
कॉफीचा दैनंदिन जीवनात समावेश कसा करावा?
सोयीस्कर ठरेल अशा पद्धतीने कॉफी कशी प्यावी याबद्दल काही कल्पना…
- आयबीएस (IBS) असलेल्या लोकांनी कॉफीच्या सेवनाबाबत सावधगिरी बाळगावी.
- प्रौढांसाठी, दिवसातून एक ते तीन कप ब्लॅक कॉफी पिणे योग्य आहे.
- जर कॉफीमुळे हृदयाचे ठोके वाढणे, चिंता, ॲसिडिटी किंवा झोप न लागणे यांसारखे त्रास होत असतील, तर कॉफीचे सेवन मर्यादित करणे किंवा टाळणे चांगले. कॉफीमध्ये जास्त साखर किंवा अल्ट्रा-प्रोसेस्ड क्रीमर्स घालणे टाळा.
कॉफी पिताना होणाऱ्या सामान्य चुका…
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये डॉक्टरांनी अशा काही सवयींकडे लक्ष वेधले की, ज्यामुळे कॉफीचे फायदे कमी होऊ शकतात.
- कॉफीमध्ये अति प्रमाणात साखर घालणे
- सेंद्रिय (ऑरगॅनिक) कॉफीची निवड न करणे
- ‘डार्कर रोस्ट’ (गडद भाजलेली कॉफी) चाखून न पाहताच कॉफी पिणे सोडून देणे
तुमच्या कॉफीचा स्वाद सुधारण्यासाठी काही बदल
जर तुम्ही काही किरकोळ बदल करण्याच्या विचारात असाल, तर त्यांनी रिफाइंड साखरेला (शुद्ध साखरेला) काही पर्याय सुचवले आहेत. तुमची कॉफी थोडी गार झाल्यावर तुम्ही त्यात अगदी चिमूटभर मध घालू शकता; किंवा ‘मंक फ्रूट’ (Monk Fruit) अथवा ‘स्टीव्हिया’चा (Stevia) वापर करू शकता.
