राजगिरा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर धान्य मानले जाते. हे अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेले एक सुपरफूड आहे. हे केवळ उपवासाच्या वेळी खाण्याचे धान्य नाही, तर त्याचा आहारात समावेश केल्याने तुमच्या संपूर्ण आरोग्याला फायदा होऊ शकतो. ‘द योग इन्स्टिट्यूट’चे संचालक हंसाजी योगेंद्र म्हणतात की, १४ दिवस नियमितपणे राजगिऱ्याचे सेवन केल्याने लक्षणीय बदल घडून येऊ शकतात. चला, राजगिऱ्याचे फायदे आणि त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया…

राजगिरा पोषक तत्त्वांनी समृद्ध

राजगिरा हे एक पोषक तत्त्वांनी समृद्ध, असे धान्य मानले जाते. त्यात प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम व कॅल्शियम यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्त्वे असतात. संतुलित आहारात याचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळू शकतात.

१४ दिवस राजगिरा खाल्ल्यास काय होते?

उत्तम पचन : राजगिऱ्यामध्ये फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. नियमित राजगिऱ्याचे सेवन केल्याने शौचास नियमित होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते.

वजन घटवण्यासाठी उपयुक्त

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्या आहारात या धान्याचा समावेश करण्याचा विचार करा. त्यातील प्रथिने आणि फायबर तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतात, ज्यामुळे वारंवार लागणारी भूक टाळता येते. त्याशिवाय, हे धान्य ग्लुटेनमुक्त आहे, त्यामुळे ग्लुटेनची अॅलर्जी असलेल्यांसाठी ते एक उत्तम पर्याय आहे.

ऊर्जा वाढवण्यास मदत

जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर तुमच्या आहारात राजगिऱ्याचा समावेश करण्याचा विचार करा. त्यात कर्बोदकांसोबतच लोह आणि मॅग्नेशियमसारखी पोषक तत्त्वे असतात, जी तुमच्या शरीरातील एकूण ऊर्जा पातळी वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

हाडांसाठी फायदेशीर

राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे आढळतात, जी हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वे आहेत.

त्याचे सेवन कसे करावे?

तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाचा वापर रोटी किंवा चिला बनवण्यासाठी करू शकता. तुम्ही त्याचे सेवन खिचडी किंवा लापशीच्या स्वरूपातही करू शकता. राजगिऱ्याचे सेवन कमी प्रमाणात सुरू करणे उत्तम आहे आणि भरपूर पाणी पिणेही महत्त्वाचे आहे.