What Happens If You Quit Sugar For 30 Days: जर तुम्ही ३० दिवसांसाठी साखर सोडली तर त्याचे परिणाम केवळ वजनावरच नव्हे, तर शरीराच्या अनेक भागांवरही दिसून येतात. खरे तर जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह, हृदयरोग आणि फॅटी लिव्हर यांसारख्या अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो, म्हणूनच आजकाल अनेक लोक ‘नो शुगर चॅलेंज’ स्वीकारतात आणि ठराविक कालावधीसाठी आपल्या आहारातून अतिरिक्त साखर काढून टाकतात.

या आव्हानाचा अर्थ नैसर्गिकरित्या गोड असलेली फळे, भाज्या किंवा दूध सोडून देणे असा नाही. यात फक्त अतिरिक्त साखर असलेले पदार्थ, जसे की शीतपेये, मिठाई, कँडी, केक, कुकीज, गोड पेये, फ्लेवर्ड योगर्ट, पॅकेज केलेले ज्यूस आणि विविध सॉस टाळण्याची शिफारस केली आहे. त्याऐवजी, ताजी फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, अंडी, मासे, चिकन, सुकामेवा आणि संतुलित घरगुती आहार घेण्याची शिफारस केली आहे.

याचा फायदा काय आहे?

हेल्थलाइन या आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार, जर तुम्ही सलग ३० दिवस अतिरिक्त साखर टाळली तर त्याचा पहिला फायदा तुमच्या रक्तातील साखरेवर दिसून येईल. गोड पदार्थांच्या वारंवार सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते, ज्यामुळे कालांतराने इन्सुलिन प्रतिरोध आणि टाईप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे साखर कमी केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

कोणासाठी फायदेशीर?

जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठीही हा बदल फायदेशीर ठरू शकतो. साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त आणि फायबर व प्रथिने कमी असतात. हे पदार्थ कमी केल्याने अतिरिक्त कॅलरीचे सेवन कमी होऊ शकते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याचा दातांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तोंडातील जीवाणू साखरेचे विघटन करून आम्ल तयार करतात, ज्यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. साखरेचे सेवन कमी केल्याने दात किडण्याचा आणि दातांना कीड लागण्याचा धोकाही कमी होऊ शकतो.

यकृत आणि हृदयासाठीदेखील फायदेशीर

अतिरिक्त साखर कमी करणे हे यकृत आणि हृदयाच्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर मानले जाते. विशेषतः, फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो. साखरेच्या अतिसेवनाचा संबंध उच्च कोलेस्ट्रॉल, वाढलेले ट्रायग्लिसराइड्स आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांशीदेखील जोडला जातो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका आणखी वाढू शकतो. काही संशोधनानुसार, साखर कमी केल्याने ऊर्जेची पातळी अधिक स्थिर राखण्यास मदत होऊ शकते. गोड पदार्थ खाल्ल्याने मिळणारी तात्काळ ऊर्जा लवकरच नाहीशी होते, ज्यामुळे थकवा येतो. तथापि, संपूर्ण धान्य, फळे, भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थ दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात.

जर आपण साखर खाणे सोडले तर काय होईल?

एका अभ्यासात संशोधकांनी ८ ते १८ वयोगटातील ४० पेक्षा जास्त मुलांनी १० दिवस साखर आणि फ्रुक्टोज खाणे बंद केल्यावर नेमके काय घडले याचे तपशीलवार वर्णन केले आहे. यात सहभागींनी ब्रेड, हॉटडॉग किंवा स्नॅक्स खाणे थांबवले नाही, त्यांनी फ्रुक्टोज खाणे बंद केले. या गटामध्ये खालील गोष्टी कमी झाल्याचे अभ्यासकांना आढळून आले.

  • नव्याने तयार केलेले ट्रायग्लिसराइड्स (किंवा चरबी)
  • उपाशी पोटी असलेली रक्तातील ग्लुकोजची पातळी
  • रक्तदाब
  • यकृतासह अवयवांवर साठवलेली चरबी
  • इन्सुलिन संवेदनशीलता
  • बॉडी मास इंडेक्स.
  • जागतिक आरोग्य संघटनेने प्रौढ आणि मुलांसाठी दररोज किती प्रमाणात साखरेचे सेवन करावे हे सुद्धा सुचवले आहे. त्यानुसार ५८ ग्रॅम किंवा १४ चमचे किंवा उष्मांकाच्या ५ ते १० टक्क्यांच्यादरम्यान साखरेचे सेवन करता येऊ शकते. आपल्या आरोग्य स्थितीनुसार हे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.