Stop eating Roti for a Month: भारतात पोळी मोठ्या आवडीने खाल्ली जाते, विशेषतः गव्हाची पोळी. गव्हाच्या पोळीतून शरीराला कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन बी आणि इतर अनेक आवश्यक पोषक घटक मिळतात. मात्र, आजकाल वजन कमी करण्यासाठी किंवा लो-कार्ब डाएट पाळणारे अनेकजण पोळी पूर्णपणे खाणं बंद करतात. अशा वेळी प्रश्न पडतो की, एखाद्या व्यक्तीने सलग ३० दिवस पोळी खाल्ली नाही तर शरीरावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊया त्याचे काही संभाव्य फायदे आणि परिणाम.

वजन कमी होणे

पोळी खाणं बंद केल्यावर शरीरात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीर आधी ग्लायकोजनचा वापर करते. ग्लायकोजनसोबत शरीरातील पाणीही कमी होत असल्यामुळे सुरुवातीच्या २ आठवड्यांत वजन झपाट्याने कमी झाल्यासारखे दिसू शकते.

शरीरात अशक्तपणा जाणवणे

कार्बोहायड्रेट हे शरीराला ऊर्जा देतात. जर पोळी बंद करून त्याऐवजी कार्बोहायड्रेटयुक्त इतर पौष्टिक पदार्थ खाल्ले नाहीत, तर थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे किंवा सुस्ती जाणवू शकते.

बद्धकोष्ठतेची समस्या

पोळी सोडल्यानंतर आहारात फायबरचा समावेश केला नाही तर पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्या होऊ शकतात. म्हणून पोळी सोडल्यास आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

रक्तातील साखरेवर परिणाम

मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या तुलनेत गव्हाची पोळी हळूहळू पचते. जर पोळीच्या जागी जास्त प्रथिने आणि हेल्दी फॅट असलेले पदार्थ खाल्ले, तर काही लोकांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.

पोषक घटकांची कमतरता होण्याचा धोका

गव्हाच्या पोळीत फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि बी-व्हिटॅमिनसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे पोळी बंद केल्यानंतर आहारात हे पोषक घटक मिळतील असे इतर आरोग्यदायी पदार्थ समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोटही जास्त वेळ भरलेले राहते.

पोळी सोडणे योग्य आहे का?

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर फक्त पोळी सोडून उपयोग होणार नाही. त्यासाठी नियमित व्यायाम किंवा योग करणे आणि योग्य प्रमाणात कॅलरी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच, मर्यादित प्रमाणात पोळी खाण्यात कोणतीही अडचण नाही.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)