जेवणानंतरचे गोड पदार्थ, दुपारी घेतलेले शीतपेय किंवा पिष्टमय पदार्थांनी (Refined Carbs) भरलेली थाळी आपल्याला वरवर दिसायला सामान्य वाटते. मात्र, शरीराच्या आत याचे परिणाम अतिशय वेगाने होतात. साखर खाल्ल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत शरीरात अशा काही प्रक्रिया सुरू होतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या ऊर्जा, मनस्थिती आणि दीर्घकालीन आरोग्यावर होतो.

पहिली ३० मिनिटे: साखरेची अचानक वाढ (Sugar Surge)

साखर शरीरात जाताच पचन प्रक्रिया वेगाने सुरू होते. आतड्यांमधून ग्लुकोज रक्तामध्ये शोषले जाते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. तज्ज्ञ सांगतात की, “जेव्हा एखादी व्यक्ती साखरयुक्त पेये किंवा मिठाईचे सेवन करते, तेव्हा त्यातील साखरेमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते. या वाढलेल्या साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी स्वादुपिंडातून (Pancreas) इन्सुलिन बाहेर पडते.”

इन्सुलिनची प्रतिक्रिया आणि शरीरावर होणारा परिणाम

जेव्हा रक्तातील ग्लुकोज वाढते, तेव्हा इन्सुलिन हे एका चावीप्रमाणे काम करते, जे रक्तातील साखरेला पेशींपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. निरोगी शरीरात ही प्रक्रिया संतुलित असते. मात्र, वारंवार साखरेचे सेवन केल्यास शरीराला अतिरिक्त काम करावे लागते. यामुळे कालांतराने ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ निर्माण होतो, ज्यामुळे पेशी साखरेला योग्य प्रतिसाद देत नाहीत. भारतातील वाढता मधुमेह आणि प्री-डायबिटीजचा धोका याच आहारशैलीमुळे वाढत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

डोपामाइनचा परिणाम: साखरेचे व्यसन का लागते?

गोड खाल्ल्याने केवळ साखरच वाढत नाही, तर मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टम’ सक्रिय होते. तज्ज्ञांच्या मते, “रक्तातील ग्लुकोजच्या वाढीमुळे मेंदूत डोपामाइन स्रवते, त्यामुळे तात्पुरता आनंद मिळतो.” यामुळेच आपल्याला वारंवार गोड खाण्याची इच्छा (Cravings) होते.

एनर्जी क्रॅश: थकवा का जाणवतो?

हा आनंद जास्त काळ टिकत नाही. इन्सुलिनने साखरेला पेशींमध्ये ढकलल्यानंतर रक्तातील साखर वेगाने कमी होते. तज्ज्ञ सांगतात, “या टप्प्यावर ऊर्जेची पातळी अचानक खालावते, ज्याला ‘एनर्जी क्रॅश’ म्हटले जाते. यामुळे थकवा, अशक्तपणा आणि सुस्ती जाणवते. ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, त्यांच्यामध्ये हा त्रास अधिक जाणवतो.”

केवळ मिठाईच नाही, तर ‘या’ पदार्थांपासूनही धोका

रक्तातील साखर केवळ मिठाईनेच वाढते असे नाही, तर दैनंदिन आहारातील खालील पदार्थही तेवढेच कारणीभूत ठरतात.

  • पांढरा तांदूळ
  • मैद्याची पोळी किंवा ब्रेड
  • बटाटे आणि पॅकेज्ड स्नॅक्स

युनिसेफच्या (UNICEF) अहवालानुसार, तरुणांमध्ये लठ्ठपणा आणि रक्तातील साखरेचे वाढते प्रमाण हे कमी फायबर आणि जास्त पिष्टमय पदार्थांच्या आहारामुळे दिसून येत आहे.

तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांनी साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काही व्यावहारिक उपाय सुचवले आहेत:.

१. प्रमाण कमी करा: साखरयुक्त पेये आणि मिठाईचे सेवन शक्य तितके टाळा किंवा मर्यादित करा.

२. प्रथिने आणि फायबर वाढवा: आहारात कार्बोहायड्रेट्स जास्त असल्यास त्यासोबत डाळी, भाज्या किंवा सुका मेवा यांचा समावेश करा.

३. जेवणानंतर चालणे: गोड किंवा कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर १० ते १५ मिनिटे वेगाने चालावे. चालण्यामुळे स्नायू आकुंचन पावतात आणि रक्तातील ग्लुकोजचा वापर ऊर्जेसाठी प्रभावीपणे होतो.

तीस मिनिटांचा हा काळ छोटा वाटत असला तरी, दररोजची ही चक्रे तुमच्या आरोग्याला आकार देत असतात. साखरेची भीती न बाळगता तिचे शरीरावरील परिणाम समजून घेतल्यास, आपण अधिक चांगले आरोग्यदायी निर्णय घेऊ शकतो.