Benefits Of Chewing Cardamom After Meal: जेवणानंतर वेलची चघळण्याची सवय अनेक भारतीय घरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. तिचा सुगंध आणि गोड, किंचित पुदिन्यासारखा स्वाद तोंड ताजं ठेवतो. पण ही छोटी हिरवी वेलची फक्त दुर्गंधी दूर करत नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. वेलची पचन सुधारण्यास, पोटफुगी कमी करण्यास आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांवर मदत करते असं अनेकांचं मत आहे. काहींच्या मते वेलचीमध्ये जंतुनाशक (antimicrobial) गुणधर्मही असतात. जे जेवणानंतर तोंड स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. पण रोज जेवणानंतर वेलची चघळणं खरंच शरीरासाठी फायदेशीर आहे का?
Tone 30 Pilatesच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ अश्लेषा जोशी यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, “जेवणानंतर वेलची चघळणं पचनासाठी एक नैसर्गिक आणि सौम्य उपाय ठरू शकतो. वेलचीत असे घटक असतात जे पचनासाठी आवश्यक एन्झाइम्सच्या स्रावाला चालना देतात. त्यामुळे पोटाला अन्न पचवणं सोपं जातं. तसेच वेलचीमध्ये सौम्य कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात. म्हणजेच गॅसमुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.”
पचनाव्यतिरिक्त वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. ते मेटाबॉलिक आरोग्यास मदत करतात आणि पचनसंस्थेतील सूज कमी करू शकतात असेही जोशी यंनी सांगितले. वेलचीच्या खास सुगंधामुळे आणि आवश्यक तेलांमुळे मन प्रसन्न करणारा सौम्य परिणामही होतो. त्यामुळे जेवणाचा शेवट फ्रेश आणि शांत करणारा ठरतो.
पोटफुगी, अॅसिडिटी किंवा तोंडाच्या दुर्गंधीवर वेलची उपयोगी ठरते का?
याबाबत जोशी सांगतात की, “वेलची या तिन्ही समस्यांवर मदत करू शकते. पोटफुगी आणि अॅसिडिटीसाठी वेलची पोटाच्या स्नायूंना सैल करते आणि अन्न तसंच वायूंची हालचाल सुरळीत करते. तसंच ती पोटातील आम्लाचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे जेवणानंतर होणाऱ्या अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.”
तोंडाच्या दुर्गंधीबाबत त्या सांगतात की, वेलची एक नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे. तिच्या जंतुनाशक गुणधर्मांमुळे तोंडातील दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी होतात. वेलचीचा सुगंध आणि आवश्यक तेलं त्वरित ताजेपणा देतात आणि नियमित वापराने तोंडाचं आरोग्यही सुधारू शकतं.
वेलची जास्त प्रमाणात खाणं नुकसानकारक ठरू शकतं का? रोज किती वेलची सुरक्षित आहे?
वेलची योग्य प्रमाणात घेतल्यास ती सुरक्षित असते. “बहुतेक प्रौढांसाठी जेवणानंतर दिवसाला एक ते दोन वेलची पुरेशा असतात. यामुळे पचन आणि तोंडाच्या आरोग्याचे फायदे मिळतात. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास प्रामुख्याने संवेदनशील लोकांमध्ये, वेलचीत असलेल्या तीव्र आवश्यक तेलांमुळे सौम्य पोटदुखी किंवा अस्वस्थता जाणवू शकते,” असं जोशी सांगतात.
“वेलचीचा वापर हा संतुलित जीवनशैलीचा भाग म्हणून करावा, एखाद्या आजारावरचा एकमेव उपाय म्हणून नाही. जर एखादी व्यक्ती आधीच दीर्घकालीन अॅसिडिटी किंवा पचनाच्या समस्यांसाठी औषधं घेत असेल, तर कोणताही मसाला किंवा वेलचीसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”, असे जोशी सांगतात.

