What Happens If You Stop Eating Dal for 30 Days: भारतीय जेवणात डाळी हा अविभाज्य घटक मानला जातो. विशेषतः शाकाहारी आणि वनस्पतीजन्य आहार घेणाऱ्या लोकांसाठी डाळी म्हणजे पोषणाचा खजिनाच. पण जर एखाद्यानं संपूर्ण एक महिना डाळी खाणे बंद केले, तर शरीरावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. याच प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टरांनी काही महत्त्वाचे मुद्दे समोर ठेवले आहेत.
हैदराबादमधील यशोदा रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यक तज्ज्ञ व मधुमेह विशेषज्ञ डॉ. के. सोमनाथ गुप्ता सांगतात की, डाळी आहारातून काढून टाकल्यास शरीराला लागणारी प्रथिने मिळण्यात अडचण येऊ शकते. विशेषतः जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी हा बदल अधिक धोकादायक ठरू शकतो.
डॉ. गुप्ता यांच्या मते, डाळी शरीराला केवळ ऊर्जा देत नाही, तर स्नायू बळकट ठेवण्यास, पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवण्यासही मदत करते. त्यामुळे डाळी टाळल्यास शरीरात काही नकारात्मक बदल जाणवू शकतात.
डाळी खाण्याचे फायदे काय?
कोणत्याही प्रकारची डाळ हा वनस्पतीजन्य प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. स्नायू तयार होण्यासाठी आणि त्यांची दुरुस्ती होण्यासाठी प्रथिने अत्यावश्यक असतात. त्याशिवाय डाळींत भरपूर प्रमाणात तंतुमय घटक असतात, जे पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून संरक्षण करतात.
डाळींत लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ‘ब’ समूहातील जीवनसत्त्वे यांसारखी महत्त्वाची पोषक द्रव्ये आढळतात. ही पोषक द्रव्ये शरीराच्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. डाळींत असलेली गुंतागुंतीचे कर्बोदके हळूहळू पचतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
तसेच, डाळींचे नियमित सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते. कोलेस्ट्राॅलची पातळी कमी ठेवण्यासही डाळी उपयुक्त ठरतात. पोट भरल्यासारखं वाटल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही डाळी मदत करू शकतात. त्याशिवाय डाळींमध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत ठेवण्यास साह्य करतात.
महिनाभर कोणतीही डाळ न खाल्ल्यास काय होऊ शकते?
डॉ. गुप्ता सांगतात की, डाळी बंद केल्यास शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्नायू कमकुवत होणे, थकवा जाणवणे आणि शक्ती कमी होण्याची शक्यता असते. तंतुमय घटक कमी झाल्यामुळे पचनाच्या तक्रारी, पोट साफ न होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
डाळींतून मिळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे आहारात नसल्यास रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होऊ शकतो. काही लोकांमध्ये रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडण्याचीही शक्यता असते, विशेषतः जर आहार संतुलित नसेल तर.
डॉक्टरांचा सल्ला काय?
डॉ. गुप्ता यांच्या मते, दररोज अर्धा कप ते पाऊण कप शिजवलेली कोणतीही डाळ खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. जर कुणाला काही कारणास्तव डाळ टाळायची असेल, तर त्यांनी सोयाबीन, पनीर, कडधान्ये, सुकामेवा, बिया यांसारख्या इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. मात्र, आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः आधीपासून काही आजार असतील तर.
डाळी हा साधा, पण अत्यंत पोषक आहारघटक आहे. एक महिना कोणतीही डाळ न खाल्ल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे कोणताही अन्नघटक पूर्णपणे बंद करण्याऐवजी संतुलित आणि विविधतापूर्ण आहार घेणे हेच उत्तम आरोग्याचे गमक आहे.
