Black Coffee VS Milk Coffee: हिवाळ्यात सकाळी एक कप गरम कॉफी केवळ थंडीपासून आराम देत नाही तर आळस देखील दूर करते. लोक सहसा दुधासह कॉफीने दिवसाची सुरूवात करतात. कॉफी आणि चहामध्ये कॅफिन असते जे एकाग्रता वाढवते आणि थकवा दूर करते. दररोज एक कप कॉफी एकाग्रता सुधारण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करते. कॉफीचे सेवन केल्याने सहनशक्ती वाढते आणि चयापचय गतिमान होते. एक कप कॉफी वयानुसार होणाऱ्या अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या मानसिक आजारांना प्रतिबंधित करते. कॉफीचे सेवन केल्याने न्यूरोलॉजिकल आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

काही लोक दुधासोबत कॉफी पितात, तर काहींना दुधाशिवाय ब्लॅक कॉफी आवडते. अनेक अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, दुधाशिवाय कॉफी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर मग जाणून घेऊ ब्लॅक कॉफी पिण्याचे आरोग्य फायदे…

वजन नियंत्रणात राहते

ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. अमरीन शेख यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, जर दररोज दुधाशिवाय ब्लॅक कॉफी घेतली तर त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होते. तज्ज्ञांनी सांगितले की, दुधासह कॉफी आणि त्यात जेव्हा साखर असते, तेव्हा दुधाच्या फॅटसोबत साखरेच्या कॅलरीज वाढतात. यामुळे शरीराचे वजन वाढते. उलट ब्लॅक कॉफी जवळपास कॅलरीमुक्त असते. जर फक्त आठवडाभर ब्लॅक कॉफी घेतली तर तुम्हाला तुमच्या शरीरात हलकेपणा जाणवेल. दररोज ब्लॅक कॉफीचे सेवन केल्याने पोटाची सूज किंवा पोट फुगणे नियंत्रित होण्यास मदत होते.

ब्लड शुगर नियंत्रणात राहते

दूध आणि साखरेसह कॉफीऐवजी ब्लॅक कॉफी घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. इन्सुलिन प्रतिरोधकता किंवा प्रीडायबिटीज असलेल्या लोकांना ब्लॅक कॉफीचे शेव त्यांच्या रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. कालांतराने जेव्हा एकूण साखरेचे सेवन कमी होते, तेव्हा इन्सुलिन संवेदनशीलता देखील सुधारू शकते.

ब्लॅक कॉफीचा ऊर्जेच्या पातळीवर परिणाम

ब्लॅक कॉफी प्यायल्याने ऊर्जेवर सकारात्मक परिणाम होतो. या कॉफीमध्ये दूध आणि साखर नसल्यामुळे ऊर्जेची पातळी अधिक स्थिर होते आणि ऊर्जेमध्ये अचानक घट कमी होते. कारण ब्लॅक कॉफीमुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक चढ-उतार होत नाहीत.

ब्लॅक कॉफीमुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते का?

तज्ज्ञांनी सांगितले की, जर तुम्ही ब्लॅक कॉफीचे सेवन केले तर त्यात दूध आणि साखर नसते. दूध हे कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. म्हणून जेव्हा तुम्ही कॉफीमधून दूध वगळता तेव्हा शरीरातील काही पोषक तत्वे कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत शरीरातील पौष्टिकतेची कमतरता कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दही, चीज, काजू, सीड्स आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी खबप फायदेशीर आहे. कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. ते मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास हृदय आणि चयापचय सुधारतात.

ब्लॅक कॉफी सर्वांसाठी फायदेशीर आहे का?

ब्लॅक कॉफी पिण्याचा प्रत्येकावर सारखाच परिणाम होतो असं नाही. गॅस्ट्रिटिस, चिंता विकार किंवा झोपेच्या समस्या असलेल्या लोकांनी ब्लॅक कॉफीचे सेवन मर्यादित करावे. तज्ज्ञांच्या मते, कॉफी दिवसातून एक ते दोन कपपर्यंत मर्यादित ठेवा तसंच संध्याकाळी किंवा रात्री उशिरा पिणे टाळा.