Banana Benefits: भारतीय घरांमध्ये केळे हे फळ म्हणजे एक अत्यंत सामान्य व महत्त्वाचा घटक आहे. धार्मिक नैवेद्यापासून ते मुलांच्या डब्यापर्यंत सर्वत्र त्याचा वापर केला जातो. रुग्णालयातील रुग्णांनाही आहार स्वरूपात केळीही दिली जातात. कारण- ती खाण्यास सोपी असतात आणि त्यातून शरीराला ऊर्जा मिळून आजारातून बरे होण्यास मदत होते. भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक व टीव्ही व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्यानं आणि त्यानंतर मध्यम आकाराचं पिकलेलं केळं खाऊन करावी. दीड महिन्यापर्यंत दररोज केळं खाल्ल्यानं पचन सुधारते, ऊर्जा वाढते आणि मन:स्थितीत सकारात्मक बदल होतात. दररोज केळे खाणे का महत्त्वाचे आहे, हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
सकाळी केळे खाणे फायदेशीर का?
आजकाल अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात केवळ चहा किंवा कॉफीने करतात. त्यामुळे बऱ्याचदा सकाळी ११ वाजेपर्यंत थकवा, ॲसिडिटी आणि चिडचिड जाणवू लागते. कालांतराने या सवयीमुळे पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, एका प्रौढ व्यक्तीला दररोज साधारणपणे २५ ते ४० ग्रॅम तंतुमय पदार्थांची (फायबरची) गरज असते आणि तरीही बहुतेक लोक त्यापेक्षा कमी प्रमाणात या घटकाचे सेवन करतात. एका केळ्यामध्ये सुमारे तीन ग्रॅम तंतुमय पदार्थ हा घटक असतो. त्यातील पेक्टिनसारखे विरघळणारे तंतुमय घटक विष्ठा मऊ करतात आणि आतड्यांमधील फायदेशीर जीवाणूंना पोषण देतात. हे ‘प्री-बायोटिक’ म्हणून कार्य करते आणि आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत करते.
रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
एका केळ्यामध्ये साधारणपणे ३५० ते ४०० मिलिग्रॅम पोटॅशियम असते. पोटॅशियमचे पुरेसे सेवन रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि स्ट्रोकचा (मेंदूतील रक्तप्रवाह खंडित होण्याचा) धोका कमी करण्यास मदत करू शकते.
दिवसभर ऊर्जा पुरवतात
केळ्यांमध्ये नैसर्गिक कर्बोदके आणि तंतुमय पदार्थ असतात, ज्यामुळे शरीराला हळूहळू ग्लुकोज मिळते. त्यामुळे शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळते आणि थकवा किंवा अचानक ऊर्जा कमी होण्यासारख्या समस्या उद्भवत नाहीत. केळ्यांचे सेवन केल्याने विद्यार्थी, नोकरीनिमित्त बाहेर जाणारे लोक आणि गृहिणी यांना सकाळचा थकवा दूर करण्यास मदत होऊ शकते. तसेच, केळ्यांमध्ये ‘व्हिटॅमिन बी६’ असते; हे जीवनसत्व सेरोटोनिनसारख्या न्यूरोट्रान्समीटरच्या निर्मितीस मदत करते, ज्यामुळे मनःस्थिती आणि मज्जासंस्था संतुलित राहण्यास मदत होते.
केळी खाण्याची योग्य पद्धत
बहुतेक लोकांसाठी रिकाम्या पोटी केळी खाणे फायदेशीर मानले जाते. रात्रीच्या १२ तासांच्या उपवासानंतर (झोपेतून उठल्यावर) हे फळ शरीराला ऊर्जा पुरवते. मात्र, ज्यांना तीव्र ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे, त्यांनी केळ्यासोबत भिजवलेले काही बदाम किंवा अर्धा चमचा देशी तूप खावे.
कच्चे केळे विरुद्ध पिकलेले केळे : कोणते अधिक फायदेशीर?
कच्च्या केळ्यांमध्ये ‘रेझिस्टंट स्टार्च’चे प्रमाण जास्त असते. हे स्टार्च फायबरप्रमाणे कार्य करते; परंतु पचायला थोडे जड असू शकते. ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे, ते लोक मर्यादित प्रमाणात कच्चे केळे खाऊ शकतात.
कोणी काळजी घ्यावी?
जर तुमचा मधुमेह नियंत्रणात नसेल, तर केळी खाताना काळजी घ्या. एका पिकलेल्या केळ्यामध्ये साधारणपणे १२-१४ ग्रॅम नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. कच्च्या केळ्यांचे अतिप्रमाणात नियमित सेवन केल्यास गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. केळी हे परवडणारे आणि सहज उपलब्ध होणारे फळ असून, ते वर्षभर मिळते. त्यातून पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी फायबर, हृदयाच्या आरोग्यासाठी पोटॅशियम, मज्जासंस्थेसाठी पोषक घटक आणि दिवसभर टिकणारी नैसर्गिक ऊर्जा मिळते. योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात त्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
तज्ज्ञांचा सल्ला
तज्ज्ञांच्या मते, दूध आणि केळी एकत्र खाणे टाळणेच हिताचे आहे. ज्यांना सायनसचा त्रास आहे किंवा ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, अशा व्यक्तींनी दूध आणि केळी एकत्र खाऊ नयेत.
