What happens when you skip breakfast : नाश्ता हा तुमच्या दैनंदिन दिनचर्येतील एक महत्त्वाचा भाग आहे. कारण – दिवसभराची ऊर्जा, मूड आणि काम करण्याची क्षमता यावर नाश्त्याचा मोठा प्रभाव पडतो. पण, अनेकदा उशिरा उठल्यामुळे, आवडीचा नाश्ता न बनवल्यामुळे तर कधी कंटाळा आला म्हणून आपण नाश्ता करणे टाळतो. पण, असं जर तुम्ही एक-दोन दिवस नाही तर अगदी महिनाभर नाश्ता केला नाही तर पुरुष आणि स्त्रियांवर नक्की काय परिणाम होऊ शकतो याबद्दल जाणून घेऊयात.
याबद्दल दि इंडियन एक्स्प्रेसने वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पचनसंस्थेचे तज्ञ) डॉक्टर साईप्रसाद लाड यांच्याशी चर्चा केली. त्यांनी प्रत्येक व्यक्तीनुसार परिणाम वेगवेगळे असतील असे उत्तर देऊन. रात्रीच्या उपवासानंतर ऊर्जा पुन्हा मिळवण्याची नाश्ता ही पहिली संधी असेही म्हंटले. त्याचबरोबर दररोज नाश्ता टाळल्यास रक्तातील साखरेत चढ-उतार, दिवसभरात भूक वाढणे, अति खाणे, थकवा, चिडचिड आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. काही लोक इंटरमिटेंट फास्टिंग (आंतरायिक उपवास) करताना दिवसातील पहिले जेवण उशिरा घेतात. मात्र, संपूर्ण दिवसाच्या आहाराचे योग्य नियोजन न करता असे केल्यास त्याचे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात.
त्याचबरोबर स्त्रिया ऊर्जेचा समतोल आणि हार्मोनल बदलांबाबत अधिक संवेदनशील असतात. काही स्त्रियांसाठी, विशेषतः जर त्यांना पीसीओएस (PCOS) किंवा मधुमेहासारखे आजार असतील आणि तुम्ही नियमितपणे नाश्ता टाळल्याने मूड स्विंग (मनःस्थितीत बदल), खाण्याच्या अनियमित सवयी आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडू शकते.
मात्र, पुरुष अधूनमधून नाश्ता टाळणे तुलनेने अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. असे केल्यामुळे जास्त भूक लागणे, रात्री पोटभर जेवणे किंवा चुकीच्या अन्नपदार्थांची निवड होणे सुरू झाले, तर त्याचा चयापचय, ऊर्जेची पातळी आणि वजन व्यवस्थापनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र, डॉक्टरांच्या मते, नाश्ता केला जातो की नाही यापेक्षा संपूर्ण दिवसातील आहाराची गुणवत्ता अधिक महत्त्वाची असते.
जर कोणी संपूर्ण महिनाभर नाश्ता टाळला तर काय होते?
जर तुम्ही महिनाभर नाश्ता नाही केला तर याचे परिणाम व्यक्तीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींवर अवलंबून असतात. काहींना दिवसाच्या उत्तरार्धात कमी ऊर्जा, डोकेदुखी, कमी उत्पादकता किंवा गोड आणि उच्च-कॅलरीयुक्त पदार्थांची वाढलेली लालसा जाणवू शकते. इतरांना कदाचित स्पष्ट लक्षणे दिसणार नाहीत.पण, नाश्ता टाळल्यानंतर त्याऐवजी संतुलित आहार घेतला नाही, तर शरीराला आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता भासू शकते. मधुमेह, ॲसिड रिफ्लक्स किंवा पचनाशी संबंधित काही समस्या असलेल्या लोकांमध्ये नियमितपणे नाश्ता टाळल्याने लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.
नाश्ता कोणी टाळावा?
लहान मुले, किशोरवयीन, गर्भवती महिला, औषधोपचार घेत असलेले मधुमेही, ज्यांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो अशा व्यक्ती आणि शारीरिक श्रमाची कामे करणाऱ्यांनी नियमितपणे नाश्ता टाळू नये. जर तुम्ही या गटात बसत असाल आणि तुम्ही नाश्ता करण्याचा कंटाळा करत असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होणे, अशक्तपणा जाणवणे किंवा पचनसंस्थेची लक्षणे अधिक बिघडणे यांसारख्या नकारात्मक परिणामांना सामोरे जाण्याची शक्यता जास्त असते.
जर कोणी वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर नाश्ता न करणे ही एक चांगली सवय आहे का?
वजन कमी होणे हे केवळ एक वेळचे जेवण किंवा नाश्ता चुकवण्यावर अवलंबून नसून, वजन कमी करण्याची प्रक्रिया ही सातत्याने कॅलरीची तूट राखण्यासोबतच पौष्टिक आणि संतुलित आहाराचे पालन करण्यावर अवलंबून असते. जर नाश्ता न केल्यामुळे दिवसभरात नंतर जास्त खाण्याची किंवा वारंवार उच्च-कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन करण्याची सवय लागली, तर त्याचा वजन कमी करण्याच्या प्रयत्नांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
यापेक्षा एक चांगला उपाय म्हणजे प्रथिने, फायबर आणि आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश असलेली संतुलित नाश्ता निवडणे, कारण यामुळे पोट भरल्याची भावना टिकून राहण्यास आणि दिवसभर भूकेवर चांगले नियंत्रण ठेवण्यास मदत होते. जर कोणी अधूनमधून उपवास (इंटरमिटेंट फास्टिंग) करणे पसंत करत असेल. तर त्यांनी आपल्या पौष्टिक गरजा पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी त्याचे काळजीपूर्वक नियोजन केले पाहिजे.
