Sugar Free Diet Benefits : आजकाल खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये साखरेचा वापर खूप वाढला आहे. चहा, कॉफी, मिठाई, बिस्किट, केक आणि अनेक पॅकेज्ड फूडमध्ये साखर असते. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने एक महिना साखर न खाण्याचा निर्णय घेतला, तर शरीरात काय बदल होऊ शकतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. सुरुवातीला गोड खाण्याची इच्छा जास्त होऊ शकते आणि काही लोकांना थोडा त्रास जाणवू शकतो. परंतु, वेळेनुसार गोड खाण्याची सवय कमी होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया, एक महिना साखर आणि गोड पदार्थ खाणं बंद केल्याने शरीरात काय बदल दिसून येतात.
गोड खाण्याची इच्छा हळूहळू कमी होऊ शकते. जर तुम्ही रोज चहा, मिठाई, चॉकलेट, बिस्किट किंवा इतर पदार्थांद्वारे खूप साखर घेत असाल, तर अचानक ती बंद करणे थोडे कठीण वाटू शकते. सुरुवातीला वारंवार गोड खावेसे वाटू शकते. पण काही वेळानंतर शरीराला कमी गोडाची सवय होते. यानंतर फळांसारखे नैसर्गिकरीत्या गोड असलेले पदार्थही पूर्वीपेक्षा जास्त गोड वाटू लागतात.
१) वजन कमी होण्यास मदत
जास्त साखर असलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीज खूप असतात. विशेषतः कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, केक आणि गोड पॅकेज्ड फूड कमी केल्याने रोजच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होऊ शकते. जर तुम्ही एक महिना या गोष्टींपासून दूर राहिलात आणि बाकीचा आहार संतुलित ठेवला, तर वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. अर्थात, फक्त साखर सोडल्यानेच प्रत्येकाचे वजन कमी होईल असे नाही.
२) दिवसभर शरीरात टिकून राहते ऊर्जा(Energy)
खूप जास्त गोड खाल्ल्यानंतर काही काळासाठी शरीरात ऊर्जा जाणवू शकते, पण नंतर थकवा येऊ शकतो. जर तुम्ही जास्त साखर असलेले पदार्थ कमी केले तर खाण्याची पद्धत सुधारू शकते. यामुळे दिवसभरात ऊर्जीत होणारे चढ-उतार कमी जाणवू शकतात. यासाठी योग्य प्रमाणात अन्न खाणे आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणे देखील आवश्यक आहे.
३) दातांसाठी फायदेशीर
जास्त साखर खाल्ल्याने दातांमध्ये कॅव्हिटी (किड) होण्याचा धोका वाढू शकतो. तोंडातील बॅक्टेरिया साखरेचा वापर करतात, ज्यामुळे असे ॲसिड तयार होते जे दातांना नुकसान पोहोचवते. त्यामुळे एक महिना मिठाई, गोड पेये आणि जास्त साखर असलेले इतर पदार्थ कमी केल्याने दातांच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. यासह रोज ब्रश करणे आणि तोंडाची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
४) खाण्याच्या सवयींमध्ये सुधारणा
एक महिना साखर कमी केल्याने तुम्हाला हे समजण्यास मदत होते की तुम्ही दिवसभरात किती गोड पदार्थ खाता. सुरुवातीला कठीण वाटल्यानंतर हळूहळू गोड पदार्थांची गरज कमी होऊ शकते. यानंतर तुम्ही खाद्यपदार्थांचे लेबल्स पाहून त्यातील ‘ॲडेड शुगर’कडे (Added Sugar) लक्ष देऊ लागाल. यामुळे दीर्घकाळात खाण्याच्या सवयी चांगल्या होण्यास मदत मिळू शकते.
