Eating Avocados 14 days Health Benefits : चांगला आहार घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक लोकांसाठी ॲव्होकॅडो एक मुख्य पदार्थ ठरतो आहे, जो तुम्हाला टोस्ट, स्मूदी, सॅलडमध्ये दिसून येतो. एखाद्या पदार्थामध्ये वापरायला सोपा, पोट भरणारा आणि जास्त प्रयत्न न करताच एक ‘आरोग्यदायी’ पर्याय म्हणून तुमच्या आहारात जागा घेतो.

कारण- ॲव्होकॅडोमध्ये नैसर्गिकरीत्या साखर कमी आणि चांगली चरबी असते. त्याचा पोत मलईदार आणि गर फिकट हिरव्या ते पिवळ्या रंगाचा असतो, जो दिवसभरातील जेवणाबरोबर अगदी सहज खाता येतो. पण, जर तुम्ही काही आठवडे किंवा अगदी १४ दिवस सलग हे फळ खाल्लं, तर तुमच्या आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो ते जाणून घेऊयात…

सलग १४ दिवस दररोज ॲव्होकॅडो खाल्ल्यास काय होते?

हार्वर्ड, स्टॅनफोर्ड आणि एम्स (AIIMS) येथे प्रशिक्षण घेतलेले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांनी हा विषय अत्यंत सोप्या शब्दांत इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये समजावून सांगितला आहे. त्यांच्या मते, सलग १४ दिवस दररोजच्या आहारात ॲव्होकॅडोचा समावेश केल्यास, तुमच्या शरीराच्या प्रतिसादात काही लक्षणीय बदल दिसून येऊ शकतात.

१. हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉलची पातळी

तुमच्या हृदयाला फायदा होऊ शकतो. ॲव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, जे कोलेस्ट्रॉलचे संतुलन सुधारण्यास मदत करतात. विशेषतः ते एलडीएल (LDL) कमी करण्यास मदत करू शकतात, ज्याला अनेकदा ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल म्हटले जाते.

२. आतड्यांचे आरोग्य आणि पचन

तुमच्या आतड्यांना फायदा होऊ शकतो. ॲव्होकॅडोमध्ये फायबरबरोबरच अशी वनस्पतीजन्य संयुगे असतात, जी आतड्यातील फायदेशीर जीवाणूंच्या वाढीस मदत करतात. कालांतराने यामुळे पचनक्रिया अधिक स्थिर होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे त्रास असेल, तर तो कमी होतो आणि उत्तम संतुलन राखण्यास मदत होते.

३. रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्य

तुमचा रक्तदाब सुधारू शकतो. कारण- ॲव्होकॅडोमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. हे एक असे खनिज आहे, जे रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि हृदयाच्या एकूण कार्याला आधार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

डॉक्टर सेठी म्हणतात की, ॲव्होकॅडोचा भुकेवरसुद्धा परिणाम होतो. ॲव्होकॅडोमधील फायबर आणि आरोग्यदायी फॅट्सचे मिश्रण तृप्त राहण्यास आणि अति खाणे टाळण्यास मदत करतात. फायदे मिळविण्यासाठी दररोज अर्धा ते एक ॲव्होकॅडो सेवनासाठी पुरेसा आहे. त्यामुळे जास्त अन्न खाण्याऐवजी फक्त बदल करा. बटर, मेयोनीज किंवा क्रीमी ड्रेसिंगसारख्या स्प्रेड्सऐवजी ॲव्होकॅडो वापरा. त्यामुळे तुमच्या जेवणातील फॅटची गुणवत्ता सुधारते.

यकृताचे आरोग्य आणि दाह कमी करण्यासाठी अतिरिक्त फायदे

मागील एका पोस्टमध्ये डॉक्टरांनी चरबी आणि दाह कमी करण्यास मदत करणाऱ्या पदार्थांची यादी देताना ॲव्होकॅडोचाही समावेश केला होता. त्यांनी स्पष्ट केले की, ॲव्होकॅडो पोषक तत्त्वांनी परिपूर्ण, ग्लुटाथिओनसारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत, जे यकृताला हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. ॲव्होकॅडोमध्ये सी, बी९ व ई ही जीवनसत्त्वे असतात, जी सर्व अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. त्याबरोबर त्यातून यकृताच्या आरोग्यास मदत करणारी खनिजे मिळतात आणि त्यात ओलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते, जी एक प्रकारची आरोग्यदायी चरबी असून, एकूणच आरोग्यासाठी ती योगदान देते.