Common Signs You’re Not Getting Enough Protein : तुम्हाला अनेकदा विनाकारण थकवा जाणवतो का? स्नायूंमध्ये दुखणे किंवा अशक्तपणाही जाणवतोय का? शरीरात जाणवणाऱ्या या समस्या प्रथिनांच्या कमतरतेचे संकेत तर नाहीत ना? शरीराची वाढ, स्नायूंची पुनर्बांधणी आणि ऊर्जा यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक असतात. शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यास सुरुवातीला काही लक्षणे दिसू लागतात.

जागतिक स्तरावर, लोक दररोज अंदाजे ६८ ग्रॅम प्रथिनांचे सेवन करतात, तर भारतात हे प्रमाण दररोज केवळ ४७ ग्रॅम असल्याचे सांगितले जाते. पुरेशा प्रथिनांच्या कमतरतेमुळे केवळ आपल्या स्नायूंवरच परिणाम होत नाही, तर दीर्घकाळ प्रथिनांची कमतरता राहिल्यास आपल्या ऊर्जेवर, पुनर्प्राप्तीवर, सहनशक्ती कमी होते आणि एकूण आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. पण, योग्य आहार आणि पोषणाने ही कमतरता सहज भरून काढता येते.

भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक आणि टीव्ही व्यक्तिमत्व डॉक्टर हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, जर शरीराला दीर्घकाळ पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळत नाहीत. तर शरीर नेहमी थकलेले राहते आणि त्याचबरोबर इतर काही लक्षणेही शरीरात दिसतात. केस गळणे, स्नायू कमकुवत होणे, कमकुवतपणा, व्यायाम किंवा आजारातून बरे होण्यासाठी खूप वेळ लागणे आणि सहनशक्ती कमी होणे शरीरातील प्रथिनांची कमतरता दर्शवणारी लक्षणे आहेत.

त्यामुळे प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी प्रोटीन पावडरचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. कोरड्या फळांपासून तयार केलेली प्रथिनेयुक्त पावडर शरीराला ऊर्जा तर पुरवतेच पण शरीरातील कमजोरी आणि इतर लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासही मदत करते. शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी घरी प्रोटीन पावडर कशी बनवावी जाणून घेऊया.

प्रोटीन पावडर कशी तयार करावी?

घरी प्रोटीन पावडर बनवण्यासाठी, २५० ग्रॅम बदाम, २५० ग्रॅम पिस्ते, १०० ग्रॅम काजू, ५० ग्रॅम खडीसाखर, १०० ग्रॅम सुकामेवा आणि दोन मोठे चमचे बडीशेप घ्या. सर्व साहित्य एकत्र वाटून त्याची बारीक पूड बनवा. ही पूड काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यात साठवून ठेवा आणि दररोज सकाळी व संध्याकाळी दोन चमचे सेवन करा. ही घरगुती प्रोटीन पावडर अशक्तपणा दूर करते आणि ऊर्जा प्रदान करते.

बदाम, पिस्ता, बडीशेप आणि साखर यांच्या पावडरचे सेवन केल्याने प्रथिनांची कमतरता भरून काढण्यास कशी मदत होऊ शकते?

बदाम

बदाम एक पौष्टिक फळ आहे. ज्याच्या सेवनाने शरीराला प्रथिने, आरोग्यदायी चरबी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्वे मिळतात. ही पोषक तत्वे शरीराच्या सामान्य कार्यात, स्नायूंच्या वाढीत आणि ऊर्जा निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच बदामातील आरोग्यदायी चरबी आणि प्रथिने त्यांना निरोगी आहाराचा एक पौष्टिक भाग बनवतात.

पिस्ता आणि काजू

पिस्ता आणि काजू आवश्यक पोषक तत्वांचे स्रोत आहेत. पिस्त्यामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट संयुगे असतात. तर काजूमध्ये तांबे, मॅग्नेशियम आणि आरोग्यदायी चरबी असते. ही पोषक तत्वे शरीराच्या सामान्य कार्यात, ऊर्जा निर्मितीमध्ये आणि इतर महत्त्वाच्या जैविक प्रक्रियांमध्ये भूमिका बजावतात. पण, सुकामेव्यामध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे त्यांचे सेवन प्रमाणात करणे उत्तम राहील.

बडीशेप आणि साखरेची पूड चव

या प्रोटीन पावडरमध्ये चव वाढवण्यासाठी बडीशेप आणि साखरेच्या पूडचा वापर केला जातो. बडीशेप तिच्या सुगंध आणि चवीने या मिश्रणाची चव वाढवते, तर खडीसाखर हलका गोडवा देते. बडीशेप आणि खडीसाखर पारंपरिकरित्या जेवणानंतर खाल्ली जाते. खडीसाखर देखील साखरेचाच एक प्रकार आहे, त्यामुळे तिच्या प्रमाणाबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे, विशेषतः मधुमेहींसाठी.

या प्रोटीन पावडरचे कोण सेवन करू शकतो?

ही प्रोटीनयुक्त पावडर कमी वजन असलेल्या व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय मुले, वृद्ध व्यक्ती किंवा आजारातून बरे होत असलेले लोक घेऊ शकतात. याचे कारण म्हणजे ड्राय फ्रूट्सपासून तयार केलेले हे मिश्रण कॅलरींबरोबर अनेक पोषक तत्त्वेही पुरवते. मात्र, याचे सेवन किती प्रमाणात करावे, हे प्रत्येकाच्या गरजेनुसार ठरवले पाहिजे.

प्रोटीन पावडरचे केव्हा सेवन करावे?

जर तुम्हाला प्रोटीन पावडरचे सेवन करायचे असेल, तर दररोज सकाळी व्यायाम केल्यानंतर तुम्ही ती घेऊ शकता. योगा किंवा चालल्यानंतर २ चमचे प्रोटीन पावडर एका कप दह्यात आणि एका कप पाण्यात मिसळून घ्या. ही पावडर तुम्ही संध्याकाळीदेखील एका कप सोया दुधात आणि एका कप पाण्यात मिसळून घेऊ शकता.

शरीराला प्रोटीनची गरज का असते?

शरीरातील जवळजवळ प्रत्येक पेशीला प्रथिनांची गरज असते. स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिने अत्यावश्यक आहेत. याशिवाय हार्मोन्स, त्वचा, केस, एन्झाइम्स, न्यूरोट्रान्समीटर्स, रोगप्रतिकारक पेशी आणि शरीराच्या बरे होण्याच्या प्रक्रियेतही प्रथिनांची महत्त्वाची भूमिका असते. प्रथिने अमिनो ॲसिडपासून बनलेली असतात. हे अमिनो ॲसिड शरीरातील ऊतींची दुरुस्ती, स्नायूंचे वस्तुमान टिकवून ठेवणे, रोगप्रतिकारशक्ती आणि चयापचय यांसह अनेक महत्त्वाच्या जैविक प्रक्रियांना आधार देतात. दैनंदिन प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी आहारात सुकामेवा, बिया, कडधान्ये, चणे, सोया, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता.