Cervical cancer symptoms: कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे, ज्यावर केवळ काही प्रकरणांमध्येच उपचार करता येतात. उपचार न केल्यास कर्करोग पुन्हा होऊ शकतो आणि व्यक्तीला आपला जीव गमवावा लागू शकतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हादेखील महिलांना होणारा एक गंभीर आजार आहे, ज्याची सुरुवातीची लक्षणे सामान्य समजून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तथापि, सुरुवातीला त्याची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत आणि महिलांना अनेकदा याबद्दल खूप उशिरा कळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची जवळजवळ सर्व प्रकरणे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या (HPV) सततच्या उपस्थितीमुळे होतात. हे लक्षात घेतले पाहिजे की, ह्युमन पॅपिलोमा व्हायरसला एचपीव्ही (HPV) संसर्ग म्हणूनही ओळखले जाते. या काळात त्वचा आणि शरीरात अनेक बदल दिसून येतात.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे काय?

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या खालच्या भागात म्हणजेच ग्रीवेमध्ये होणारा कर्करोग आहे. ग्रीवा गर्भाशयाला योनीशी जोडते. हा कर्करोग उच्च जोखमीच्या HPV संसर्गामुळे होतो. बहुतेक HPV संसर्ग आपोआप बरे होतात; परंतु काही वेळा संसर्ग टिकून राहतो आणि विविध बदल घडवून आणतो. त्यामुळे ग्रीवेचा कर्करोग होऊ शकतो, जो महिलांसाठी अत्यंत गंभीर ठरू शकतो.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन यांच्या संशोधनानुसार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दाखवत नाही. तथापि, अशी काही चिन्हे आहेत, ज्याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये.

मासिक पाळीच्या दोन चक्रांदरम्यान रक्तस्राव – जर तुम्हाला दोन मासिक चक्रांदरम्यान अचानक रक्तस्राव किंवा थेंब थेंब रक्तस्राव होत असेल, तर तो सामान्य आहे, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा रक्तस्राव हार्मोन्समधील बदलांमुळे होऊ शकतो. मात्र, असे वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

संभोगानंतर रक्तस्राव होणे – हे सामान्य नसू शकते. जर तुमच्या बाबतीत असे होत असेल आणि तुम्हाला योनीतून रक्तस्राव होत असेल तर ते गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. याची इतर कारणेही असू शकतात, जी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून निश्चित करू शकता.

रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव – रजोनिवृत्तीनंतर किंवा मासिक पाळी पूर्णपणे थांबल्यानंतर योनीतून रक्तस्त्राव होत असल्यास ते सामान्य आहे असे समजू नका. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, परंतु त्याचे प्रमुख कारण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे.

महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष का करतात?

अनेक स्त्रिया रक्तस्रावाला हार्मोनल बदल किंवा मासिक पाळीतील अनियमितता समजतात. तसेच त्या या स्रावाला सामान्य संसर्ग समजून स्वतःच औषधोपचार सुरू करतात. काही स्त्रिया लाज, संकोच किंवा वेळेच्या अभावामुळे डॉक्टरांकडे जाणे टाळतात, म्हणूनच शरीरातील बदल समजून घेणे आणि वेळेवर उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.