मुंबईत सणासुदीच्या दिवसात डोळ्यांची साथ आली आहे. डोळे येण्याचा मूळ त्रास होतो तो वेगळाच पण आपला त्रास लोकांना सांगायचा कसा हाच मुख्य प्रश्न अनेकांना पडतो. ऑफिसमध्ये कॉल करून बॉसला डोळे आलेत असं सांगितलं तर कदाचित कळणार नाही पण मग या आजाराला नाव तरी काय? अनेकजण My eyes have come, My Eyes are Here अशा भन्नाट शब्दात स्पष्टीकरण द्यायला जातात पण मित्रांनो थांबा.. फजिती करून घेऊ नका आपण आज या आजाराविषयी सविस्तर जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोळे येणे म्हणजे नेमकं काय?

डोळे येण्याचा त्रास शक्यतो संसर्गामुळेच होत असतो म्हणजेच जर कोणाला अगोदरच डोळे आले असतील आणि आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला डोळे येण्याची शक्यता असते. तर काही वेळा सर्दीमुळे किंवा प्रवासात डोळ्यामध्ये काहीतरी कसूभर गेल्यामुळे डोळे चुरचुरतात व अशावेळी डोळे खूप चोळल्यास डोळे येण्याचा त्रास होऊ शकतो.

डोळे येण्याची लक्षणे

  • डोळ्यांमध्ये काही तरी गेल्यासारखे खुपते.
  • एक-दोन दिवसांत डोळा लाल दिसू लागतो.
  • डोळ्यांतून सुरुवातीला पाणी, नंतर चिकट घाण येऊ लागते.
  • सकाळी उठल्यावर पुवाने दोन्ही पापण्या चिकटल्या जातात.
  • डोळ्यांतून सतत पाणी येणे, जळजळ होणे व प्रकाश सहन न होणे.

डोळे येणे या आजारामागे एक ठोस कुठलेही कारण नाही त्यामुळे अमुकच एक उपाय करून त्यावर उपचार होईल असे सांगता येत नाही. पण पूर्वापार चालत आलेल्या काही सोप्या घरगुती उपायांनी आपण यावर आराम मिळू शकतो. चला तर असे उपाय जाणून घेऊयात..

१) डोळे आल्यावर आपण कापूर जाळून धूरी घ्यावी. यामुळे डोळ्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.
२) एरंडेल तेल काजळासारखे डोळ्याला लावल्याने डोळ्यातील पु बाहेर पडण्यास मदत होते.
३) चांदीच्या स्वच्छ दागिन्यांना काहीवेळ पाण्यात ठेवावे व मग ते पाणी डोळ्यात थेंबभर टाकल्याने आराम मिळतो.
४) डॉक्टरांकडून डोळे स्वच्छ होण्यासाठी ड्रॉप्स दिले जातात त्यांचा नीट व न चुकता वापर करावा.
५) ग्रीन टीच्या वापरलेल्या बॅग थोड्यावेळ फ्रीज मध्ये ठेवून नंतर त्या डोळ्यावर ठेवल्याने थंडावा मिळतो.
६) डोळे आल्यावर सूर्यप्रकाशच नव्हे तर घरातील ट्यूबलाईटचा प्रकाशही सहन होत नाही त्यामुळे स्वच्छ गॉगल घालावा.

डोळे येण्याला काय म्हणतात?

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा डोळे येणे याला इंग्रजीत काय म्हणावे. डोळे येण्याला शास्त्रीय नाव हे किरॅटोकंजायटिव्हिटिस असे आहे पण त्याचा अपभ्रंश होऊन आपण कंजेक्टीव्हायटीस असे म्हणू शकता. त्यामुळे जेव्हा तुम्ही बॉसला किंवा डॉक्टरांना याविषयी सांगाल तेव्हा मला डोळे आलेत यापेक्षा कंजेक्टीव्हायटीस झाला आहे असेही म्हणून बघा.

तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असायला हवे? Perfect बॉडी साठी पाहा सोप्पा तक्ता

(टीप: वरील लेख हा माहितीपर आहेत यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is dole yene in english know about conjunctivitis symptoms home treatment ayurvedic upchar svs
First published on: 10-10-2022 at 10:45 IST