Piles Reason: मूळव्याध ही अशी समस्या आहे ज्यामध्ये शौच करताना रक्त येते. जर मूळव्याध खूप वाढला तर तो पूर्णपणे बरा करण्यासाठी शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करावी लागू शकते. तर फिशर्स (गुदद्वाराला भेगा पडणे) झाल्यास गुदद्वाराच्या भागात जखम किंवा भेगा पडतात. त्यामुळे शौच करणे कठीण होते आणि शौचाच्या वेळी असह्य वेदना होतात. अशा परिस्थितीत, कोणत्या चुकीच्या सवयींमुळे मूळव्याध आणि फिशर्सचा धोका वाढू शकतो ते जाणून घ्या.

जास्त वेळ बसून राहणे

जर तुम्ही खूप वेळ एकाच जागी बसून राहत असाल, तर शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते आणि गुदद्वाराच्या भागावर जास्त दबाव येतो. यामुळे मूळव्याध आणि फिशर्स होण्याचा धोका वाढतो.

शौचालयात मोबाईल वापरणे

अनेक लोक वेस्टर्न टॉयलेट वापरताना शौच करताना मोबाईल वापरतात. मोबाईल वापरत असल्यामुळे ते गरजेपेक्षा जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसून राहतात. त्यामुळे गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दबाव येतो आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते.

शौच करताना चुकीची बसण्याची पद्धत

शौच करताना योग्य पद्धतीने न बसल्यास गुदद्वाराशी संबंधित समस्या वाढू शकतात. त्यामुळे शक्य असल्यास उकिडवे बसून शौच करावे. जर वेस्टर्न टॉयलेट वापरत असाल तर पायाखाली छोटा स्टूल ठेवून शौच करावे.

आहारात फायबरची कमतरता

आहारात प्रथिने जास्त आणि फायबर तसेच पाणी कमी असल्यास बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. दीर्घकाळ बद्धकोष्ठता राहिल्यास आणि शौच खूप कडक झाल्यास फिशर्स किंवा मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.

सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करणे

शौचाशी संबंधित त्रास सुरू झाल्यानंतर अनेक जण सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करतात. शौच करताना रक्त येणे, खाज येणे, गुदद्वाराजवळ गाठ किंवा फोडासारखे काही जाणवणे किंवा सतत बद्धकोष्ठता राहणे ही अशी काही लक्षणे आहेत, ज्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

वेळेवर उपचार करणे गरजेचे

गुदद्वाराच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची जीवनशैली आणि आहार योग्य नसेल तर अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जीवनशैलीत योग्य बदल करा. तसेच गुदद्वाराच्या आसपास कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात उशीर करू नका.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)