The Best Time To Weigh Yourself : वजन कमी करणे ही एक लांबलचक प्रक्रिया आहे असे म्हणायला हरकत नाही. वजन जर हळूहळू कमी झाले तर त्याचे सर्वोत्तम परिणाम तुम्हाला दिसून येतात. २०२६ हे वर्ष सुरू होऊन आता चार आठवडे झाले आहेत आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्यांनी फिट राहण्याची पूर्णपणे तयारी केली आहे; आज त्यांच्यासाठीच ही बातमी आहे.
वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आपण अनेकदा वजनकाट्यावर वजन करून बघत असतो. याचबरोबर जी मंडळी नियमितपणे व्यायाम करतात आणि आरोग्याबद्दल जागरूक असतात ते देखील सातत्याने वजनकाट्याचा वापर करतात. पण, समस्या सतत वजन तपासण्यात नाही. तर वजन कधी, कसे मोजले जाते यामध्ये आहे.
वेळ आणि दैनंदिन सवयींनुसार वजनात सहज चढ-उतार होऊ शकतो आणि त्यामुळे वजनकाट्यावरील आकडा उपयुक्त ठरण्याऐवजी दिशाभूल करणारा ठरू शकतो. इन्स्टाग्रामवर, NASM-प्रमाणित वैयक्तिक प्रशिक्षक ॲलेक्सने अशा सात चुकीच्या वेळांबद्दल सांगितले आहे; ज्यात वजन केल्यास चुकीची माहिती मिळू शकते…
कोणत्यावेळी चुकूनही वजन करू नये…
काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर
अन्न आणि पाणी लगेच वजन वाढवतात. पण, यामुळे शरीरातील चरबी (फॅट) नाही तर त्या क्षणी पोटात असलेले अन्न, पाणी आणि द्रव पदार्थ यामुळे वजन काट्यावरचा आकडा वाढलेला दिसतो.
मासिक पाळीच्या दरम्यान
हार्मोनल बदलांमुळे शरीरात पाणी साचते आणि पोट फुगते. यामुळे वजन दोन ते पाच पाउंडने वाढू शकते; जे मासिक पाळी संपल्यावर सामान्यतः पूर्ववत होते.
रात्रभर मद्यपान केल्यानंतर
मद्यपानामुळे शरीरातील पाण्याच्या पातळीत गडबड होते. काही लोकांच्या शरीरात पाणी साचते आणि वजन वाढते, तर काही लोकांच्या शरीरातील पाण्याची कमतरता होऊन त्यांचे वजन कमी होते. दोन्ही परिस्थितीत, हे वजन वास्तविक परिस्थिती दर्शवत नाही.
व्यायामानंतर
घाम आल्यामुळे शरीरातील तात्पुरते पाणी कमी होते; ज्यामुळे शरीर हलके वाटते. त्यामुळे ही घट चरबी कमी झाल्यामुळे नाही; तर फक्त पाणी, अन्न किंवा पोट रिकामं असल्यामुळे असू शकते.
कोणत्याही वेळी करू नका वजन
दिवसभरात शरीराचं वजन नैसर्गिकरित्या बदलत असते. अॅलेक्सने सांगितलं की सकाळपासून रात्रीपर्यंत वजनात २ ते ६ पाउंडपर्यंत फरक पडू शकतो.म्हणूनच कधीही, कुठेही वजन मोजल्यास वेगवेगळे आकडे दिसू शकतात.
खूप खारट जेवण खाल्ल्यानंतर
जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केल्याने शरीरात पाणी साचते. यामुळे, प्रत्यक्षात वजन वाढले नसले तरी, शरीराचे वजन दोन ते चार किलोने वाढू शकते.
चीट डे किंवा जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर
कार्बोहायड्रेट्स पाणी साठवून ठेवतात. ग्लायकोजेनचा प्रत्येक ग्रॅम सुमारे तीन ग्रॅम पाणी साठवतो; ज्यामुळे शरीराचे वजन नेहमीपेक्षा तीन ते सहा किलो जास्त दिसू शकते.
स्वतःचे वजन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?
ॲलेक्सच्या मते, सर्वात विश्वसनीय वेळ म्हणजे सकाळी, शौचास जाऊन आल्यानंतर आणि काहीही खाण्यापिण्यापूर्वीची वेळ. यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराचे योग्य वजन कळते. त्याचबरोबर जड कपडे घालून वजन करणे टाळा.जेणेकरून वजन तुमच्या शरीराचे दिसेल, तुम्ही घातलेल्या कपड्यांचे नाही.

