Black Coffee Benefits : आरोग्याच्या दृष्टीने अनेकजण सकाळी चहा आणि दुधाच्या कॉफीऐवजी ब्लॅक कॉफी पिणे पसंत करतात. कमी कॅलरी आणि जास्त अँटीऑक्सिडंट्स घटक असलेल्या ब्लॅक कॉफीचे अगणित फायदे आहेत. ही कॉफी माफक प्रमाणात प्यायल्याने टाइप २ मधुमेह, स्ट्रोक आण ह्रदयरोगाचा धोका कमी होतो. जे लोक नियमितपणे ब्लॅक कॉफी पितात त्यांना विविध आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय पार्किन्सन आणि लिवर कॅन्सरचा धोकाही कमी होतो. परंतु ब्लॅक कॉफीच्या अतिरिक्त सेवनामुळे छातीत जळजळ, अस्वस्थता किंवा निद्रानाश होण्याची शक्यता असते. म्हणून ब्लॅक कॉफीचा ओव्हर डोस घेणे टाळा. दिवसाची सुरुवात एक कप गरम पाण्यातून ब्लॅक कॉफी पिणे चांगले मानले जाते. यामुळे केवळ ऊर्जाच नाही तर सतर्कता वाढते शिवाय सकाळचा थकवा दूर करण्यातही मदत होते. आरोग्याच्या दृष्टीने ब्लॅक कॉफी जगात सर्वात लोकप्रिय आहे. या कॉफीचे आरोग्यविषयक अनेक फायदे आहेत. यात कमी कॅलरीस असल्याने ही डायबिटीसच्या रुग्णांसाठी ही उत्तम पेय आहे, असे स्टर्लिंग हॉस्पिटलच्या प्रमुख आहारतज्ज्ञ पूजा शेलट सांगतात. ब्लॅक कॉफी दिवसातून कधी आणि किती वेळा प्यावी? जर तुम्ही दिवसाची सुरुवात बेड टी किंवा कॉफीने करत असाल तर ब्लॅक कॉफी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन नाही. तज्ज्ञांच्या मते, ब्लॅक कॉफी पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी मध्यावर किंवा उशीरा ही आहे. यावेळी तुमच्या शरीरातील कोर्टिसोल पातळी सर्वात कमी असते. जर एखादी व्यक्ती साधारणपणे सकाळी ६.३० वाजता उठत असेल तर त्यांसाठी ब्लॅक कॉफी पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी ९.०० ते ११.०० च्या दरम्यान आहे. ब्लॅक कॉफीचे फायदे ब्लॅक कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला आरोग्यविषयक अनेक फायदे मिळतात. केवळ शारीरिक उर्जाच वाढत नाही तर तुम्हाला अनेक जुनाट आजारांपासून दूर राहता येते. याशिवाय ब्लॅक कॉफीने एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो. कारण त्यातील कॅफीन हे उत्तेजक, सतर्कता वाढवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी कार्य करते. शिवाय कॉफीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स हे एक फायदेशीर संयुग जे पेशींना नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करते. इतकेच नाही तर रक्तदाब कमी करण्यासाठी देखील ओळखले जाते, जे उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. याशिवाय स्मरणशक्ती सुधारण्यास आणि यकृताच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते, कारण ती विषारी पदार्थांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते, असेही डॉ. शेलट यांनी सांगितले.