Chia Seeds vs Basil Seeds Which Is Actually Healthier : बिया अनेकदा आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. काही पचनास तर काही वजन कमी करण्यास तर काही पोषणावर अधिक लक्ष केंद्रित करतात. या गोंधळाचे उत्तम उदाहरण म्हणजे सब्जा आणि चिया सीड्स. दोन्ही सारख्या दिसतात. अनेक जण चिया सीड्स आणि सब्जा हे दोन्ही एकच पदार्थ आहेत असे समजण्याची अगदी सामान्य चूक करतात. पण त्या एकमेकांच्या जागा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे दोघांमधील यातील फरक जाणून घेतल्यास, तुमच्या शरीराच्या गरजेनुसार अधिक चांगले पर्याय निवडण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. आहारतज्ज्ञ श्वेता जे. पांचाल यांनी १० एप्रिल रोजी एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये याबद्दल माहिती दिली आहे.

सब्जा आणि चिया सीड्स : फरक

सब्जा आणि चिया सीड्स अगदी एकसारख्या वाटू शकतात. पण, त्यांच्यात काही सूक्ष्म फरक दिसून येतात. सब्जाचा रंग गडद काळा (जेट ब्लॅक) असतो, तर चिया सीड्सचा रंग करड्या रंगाचा असून त्यावर काळे आणि पांढरे ठिपके असतात.

हंगामानुसार वापरताना सब्जा आणि चिया सीड्स काय फरक असतो?

प्रत्येक प्रकारच्या बिया सर्वच हंगामांमध्ये एकाच प्रकारे वापरण्यासाठी योग्य असतातच असे नाही.

सब्जा त्यांच्या थंडावा देणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत विशेषतः ॲसिडिटी (पित्त) आणि पोट फुगणे यांसारख्या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी या बियांचे सेवन करावे.

दुसरीकडे, चिया सीड्सचा गुणधर्म अधिक समतोल (तटस्थ) स्वरूपाचा असतो. कोणत्याही विशिष्ट हंगामी निर्बंधांशिवाय, वर्षभर कधीही या सीड्सचे सेवन करता येते.

भिजवण्याची पद्धत

सब्जा आणि चिया बिया पाणी किती वेगाने शोषून घेतात, यातील फरक तयारीच्या टप्प्यावर अधिक स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा तुम्ही सब्जा पाण्यात घालता, तेव्हा त्यांना फुगण्यासाठी अवघे ५ ते १० मिनिटे लागतात.
चिया सीड्सना मात्र यासाठी अधिक वेळ लागतो. त्या ‘जेल’सारखा (बुळबुळीत) पोत प्राप्त करण्यासाठी त्यांना साधारणपणे किमान ३० मिनिटे लागतात आणि काही वेळा तर त्यांना रात्रभर भिजत ठेवावे लागते.

आरोग्यदायी फायदे

जर तुम्ही आतड्यांचे आरोग्य सुधारणे, पोट फुगणे (bloating), ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर उपाय शोधत असाल, तर सब्जा हे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील. याउलट, जर तुम्हाला आहारात एकूणच अधिक तंतुमय पदार्थांचा (फायबरचा) समावेश करायचा असेल, वजन कमी करायचे असेल, ओमेगा-3 चे प्रमाण वाढवायचे असेल आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदा हवा असेल तर ‘चिया सीड्स’ हा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.

दैनंदिन आहारात सब्जा आणि चिया सीड्सचा समावेश कसा करावा?

सब्जा सहसा पेयांमध्ये (drinks) घातल्या जातात. उदाहरणार्थ – लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारची सरबते. हलक्या आणि ताजेतवाने करणाऱ्या पेयांमध्ये या बिया उत्तम जुळून शरीरासाठी काम करू शकतात.

चिया सीड्स मात्र अधिक बहुगुणी (flexible) असतात. त्या तुम्हाला प्रामुख्याने स्मूदीज, ब्रेकफास्ट किंवा पुडिंग्जमध्ये पाहायला मिळतात. जेवणाशी संबंधित पदार्थांमध्ये या सीड्स अधिक चांगल्या प्रकारे मिक्स होतात.

शेवटी सगळं तुमच्या स्वतःच्या गरजांवर अवलंबून असतं. दोन्ही बिया उपयोगी आहेत, पण त्यांचा वापर एकाच प्रकारे करता येत नाही एवढं मात्र लक्षात ठेवा…