Cucumber Benefits: उन्हाळा सुरू होताच बाजारात काकडीची मागणी वाढते. या कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी लोक आवर्जून काकडीचे सेवन करतात. त्यामुळे या दिवसांत काकडीला वरदानापेक्षा कमी मानले जात नाही. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीराला आतून थंडावा देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, काकडी खाण्याची योग्य वेळ तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते.
सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @drtarangkrishna या चॅनेलवर डॉ. तरंग कृष्णा यांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी काकडी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत सांगितली आहे. डॉ. तरंग कृष्णा यांच्या मते, उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काकडी केव्हा खावी आणि केव्हा टाळावी, हे या बातमीतून आपण जाणून घेऊ
काकडी म्हणजे सकाळचा हिरा
डॉ. तरंग कृष्णा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये सांगितले की, काकडी “सकाळी हिरा, दुपारी जिरे आणि रात्री किडा” असते. डॉक्टरांच्या मते, काकडीचे फायदे तुम्ही ती दिवसाच्या कोणत्या वेळी खाता यावर पूर्णपणे अवलंबून असतात. जर तुम्ही सकाळी ११ वाजण्यापूर्वी काकडी खाल्ली, तर ती तुमच्या शरीरासाठी हिऱ्यासारखी मौल्यवान ठरते. कारण- या वेळी काकडी खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
दुपारी काकडीला ‘जिरे’ म्हणतात
डॉक्टरांच्या मते, दुपारच्या जेवणात काकडी खाणे शरीरात जिऱ्याप्रमाणे काम करते. ज्याप्रमाणे आपण अन्न पचायला सोपे जावे म्हणून त्यात जिरे घालतो, त्याचप्रमाणे काकडी दुपारी नैसर्गिक पाचक म्हणून काम करते. दुपारी काकडी खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे. कारण- ती पोटातील उष्णता शांत करते आणि जड जेवण पचण्यास मदत करते. तसेच, ती पचनसंस्थेवरील ताण कमी करते आणि दुपारच्या तीव्र उन्हापासून संरक्षण करण्यास मदत करते.
रात्री खाल्लेली काकडी म्हणजे ‘किडा’
रात्री काकडी खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला ‘किड्याप्रमाणे’ हळूहळू हानी पोहोचू शकते. डॉ. तरंग कृष्णा यांच्या मते, रात्री काकडी खाणे अजिबात ‘योग्य’ नाही. कारण- त्याचा तुमच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. खरं तर, सूर्यास्तानंतर शरीराची चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे काकडीमुळे पोटात जडपणा, गॅस, आम्लपित्त किंवा कफ यांसारख्या समस्या उदभवू शकतात. तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याऐवजी ती कमकुवत होऊ शकते. म्हणून रात्रीच्या जेवणात काकडीचा समावेश करणे टाळा.
काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरास पुरेशा प्रमाणात पाणी मिळते. त्याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात. काकडीमध्ये भरपूर उष्मांक असतात. काकडी खाल्ल्याने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. दिवसातून एकदा तरी सकाळी किंवा दुपारी आपण काकडी खाल्ली पाहिजे.
काकडी खाण्याचे फायदे
त्वचा निरोगी आणि चमकदार
काकडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. कारण- त्यात पाणी, जीवनसत्त्वे आणि तंतुमयता हे घटक असतात, जे त्वचेला हायड्रेट ठेवतात, विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि चमक वाढवतात.
रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी
काकडीमध्ये तंतुमय घटक, पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम चांगल्या प्रकारे आढळते. हे पोषक घटक रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. पोटॅशियम आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढविणारे गुणधर्मदेखील रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
आतड्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी
काकडी सालीसह खाल्ल्यास, त्यात फायबर असते. हे केवळ निरोगी पचन आणि नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देत नाही, तर भूक नियंत्रित करण्यास मदत करते.
