White Powder On Grapes: बरेच लोक बाजारातून विकत आणलेली द्राक्षे न धुता लगेच खातात. पण तुमच्या कधी लक्षात आलंय का की, द्राक्षांवर एक हलका पांढरा थर किंवा पावडरसारखा पदार्थ चिकटलेला असतो. बहुतेक लोक धूळ समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मते, असे करणे चुकीचे आहे. द्राक्षांवरील हा थर कधी कधी नैसर्गिक असतो; परंतु कधी कधी त्यावर कीटकनाशके किंवा रसायने फवारलेली असू शकतात. त्यामुळे द्राक्षे खाण्यापूर्वी ती व्यवस्थित धुऊन, पूर्णपणे स्वच्छ करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
द्राक्षांवर तो पांढरा थर नेमका कसला असतो?
द्राक्षांवर दिसणारा पातळ पांढरा थर हा अनेकदा नैसर्गिक मेणाचा असतो. हा थर फळाला खराब होण्यापासून वाचवतो. पण, बाजारापर्यंतच्या प्रवासात द्राक्षे कीटकनाशके किंवा धुळीमुळे दूषित होऊ शकतात. त्यामुळे तो थर नैसर्गिक आहे की रासायनिक हे ठरवणे कठीण जाते.
द्राक्षे न धुता खाल्ल्यास त्रासाची शक्यता
द्राक्षे न धुता खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या उदभवू शकतात. काही लोकांना पोटदुखी, उलट्या, जुलाब किंवा ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. याचा लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर लवकर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाजारातून द्राक्षे आणल्यानंतर धुतल्याशिवायत ती खाऊ नका, असा सल्ला दिला जातो.
द्राक्षे स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
द्राक्षे स्वच्छ करण्यासाठी प्रथम ती देठांपासून वेगळी करा. त्यानंतर एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि द्राक्षे १० ते १५ मिनिटे भिजवत ठेवा.तुम्ही पाण्यात थोडे मीठ किंवा खाण्याचा सोडा घालू शकता. त्यामुळे कोणतीही घाण आणि कीटकनाशके काढून टाकण्यास मदत होते. भिजवल्यानंतर द्राक्षे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्या आणि त्यानंतरच त्यांचे सेवन करा. मुलांना द्राक्षे देताना ही खबरदारी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. स्वच्छ केलेली द्राक्षे अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी मानली जातात.
तज्ज्ञांच्या मते, केवळ द्राक्षेच नव्हे, तर कोणतीही फळे खाण्यापूर्वी पूर्णपणे धुणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यावरील माती, जीवाणू व रसायन काढून टाकण्यास मदत होते. थोडीशी खबरदारी घेतल्यास तुम्ही आणि तुमचे कुटुंब अनेक आरोग्य समस्यांपासून सुरक्षित राहू शकते.
