Heart Attack Symptoms : झारखंडचे मंत्री सुदीप्य कुमार यांच्या आकस्मिक निधनानंतर ह्रदयविकाराचा झटका कोणालाही कधीही येऊ शकतो हे पु्न्हा एकदा सिद्ध झाले. हल्ली धावपळीची जीवनशैली, तणाव, अनियमित खाण्या-पिण्याच्या सवयी यांमुळे हदयविकार झपाट्याने वाढत आहे. हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी पहिला तास, ज्याला ‘गोल्डन अवर’ (सुवर्ण तास) म्हटले जाते, तो रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तुमच्या उपस्थितीत एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यास, घाबरून जाण्याऐवजी तुम्ही तत्काळ काही आवश्यक पावले उचलून त्याचा जीव वाचवू शकता. चला तर मग, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे कशी ओळखावीत आणि काय करावे ते जाणून घेऊया.
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे कशी ओळखावीत?
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित बाबीची लक्षणे त्वरित ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला तीव्र वेदना, घट्टपणा आणि जडपणा जाणवणे. छातीपासून डाव्या हाताकडे, खांद्याकडे, मानेकडे, जबड्याकडे किंवा पाठीकडे वेदना पसरणे. कोणताही शारीरिक श्रम न करता अचानक खूप जास्त घाम येणे, विशेषतः थंड घाम. श्वास घेण्यास अत्यंत त्रास होणे किंवा अस्वस्थ वाटणे. चक्कर येणे, मळमळ होणे किंवा अचानक चक्कर येऊन पडणे.
हृदयविकाराचा झटका आल्यास तत्काळ करा ‘या’ गोष्टी
लक्षणे दिसू लागताच, विलंब न करता रुग्णवाहिकेला बोलवा. १०८ किंवा ११२ वर फोन करा. या काळात, स्वतः गाडी चालवून रुग्णालयात जाणे टाळा, कारण- रुग्णवाहिका ऑक्सिजन आणि जीवनरक्षक प्रणालींनी सुसज्ज असतात.
रुग्णाला ताबडतोब जमिनीवर किंवा सुरक्षित ठिकाणी झोपवा. हृदयावरील दाब कमी करण्यासाठी त्यांचे गुडघे वाकलेले ठेवा (W-स्थिती). रुग्णाला अजिबात हालचाल करू देऊ नका.
रुग्णाच्या शर्टाची बटणे काढा आणि त्यांचा पट्टा किंवा टाय ताबडतोब सैल करा, जेणेकरून त्यांना सहज ताजी हवा मिळेल आणि श्वास घेण्यास होणारा त्रास टाळता येईल. गर्दी टाळा.
जर रुग्ण शुद्धीवर असेल आणि त्याला ॲस्पिरिनची ॲलर्जी नसेल, तर त्याला ताबडतोब ३०० मिग्रॅची ॲस्पिरिनची गोळी चावून खायला द्या. पाण्यासह चावल्यास ते अधिक प्रभावी ठरते, कारण- त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध होतो.
रुग्ण बेशुद्ध झाल्यास काय करावे?
जर रुग्ण अचानक बेशुद्ध झाला आणि त्याचा श्वास किंवा नाडी बंद झाली, तर ताबडतोब सीपीआर (CPR) सुरू करा. दोन्ही हात छातीच्या मध्यभागी ठेवा आणि प्रति मिनीट अंदाजे १००-१२० वेळा वेगाने व खोलवर दाब द्या. वैद्यकीय मदत येईपर्यंत किंवा रुग्णाला शुद्ध येईपर्यंत सीपीआर थांबवू नका.
