Tooth Cavity In Children: दातांची कीड ही लहान मुले आणि प्रौढ अशा दोघांनाही होऊ शकणारी समस्या आहे. मुलांच्या बाबतीत दातांवर पांढरे किंवा काळे डाग दिसणे हे ‘कॅव्हिटीज’चे (दातांमधील पोकळीचे) लक्षण असू शकते. मुलांमधील दातांना कीड लागण्याची लक्षणे, त्याची कारणे आणि ती रोखण्याचे उपाय यांबद्दलची माहिती जाणून घेऊया…

मुलांच्या दातांना कीड का लागते?

जर तुमच्या मुलाच्या दातांवर पांढरे किंवा काळे डाग दिसत असतील, रात्रीच्या वेळी दातांमध्ये अन्न अडकत असेल किंवा काही खाल्ल्यानंतर दात दुखत असतील, तर ती ‘कॅव्हिटी’ (पोकळी) किंवा दातांची कीड असू शकते. वैद्यकीय भाषेत याला ‘अर्ली चाइल्डहूड कॅरीज’, असे म्हणतात. ही समस्या साधारणपणे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना होऊ शकते. दातांना कीड लागल्यास दातांवर पांढरे, तपकिरी किंवा काळे डाग दिसू शकतात.

दात खराब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात; उदाहरणार्थ- मुलांनी अति प्रमाणात गोड पदार्थ खाणे जसे की साखरयुक्त दूध, फॉर्म्युला दूध, पॅकबंद ज्यूस, मिठाई, चॉकलेट्स किंवा कँडी किंवा दातांना चिकटून राहणारे पदार्थ खाणे. तिखट-मीठ असलेले (नमकीन) स्नॅक्स खाणे हेदेखील याचे एक कारण असू शकते.

मुलांचे दात खराब होण्यास टूथपेस्टशिवाय वा दात नीट स्वच्छ न करणेही कारणीभूत

जर दातांवर साचलेला कचरा किंवा अन्नाचे कण साफ केले गेले नाहीत, तर दातांमध्ये जीवाणूंची वाढ वाढते. हे जीवाणू दातांच्या पृष्ठभागावर एक थर तयार करतात, ज्याला ‘प्लाक’, असे म्हणतात. या प्लाकमधील जंतू आम्ल तयार करतात, ज्यामुळे दातांचे इनॅमल (वरचा कठीण थर) खराब होते. जर हा प्लाक काढला गेला नाही, तर दात सडू लागतात. दातांची ही कीड किंवा सडण्यावर वेळीच उपचार न केल्यास मुलाला वेदना आणि सूज जाणवू शकते, तसेच तो संसर्ग मान किंवा चेहऱ्यापर्यंतही पसरू शकतो.

मुलांमधील दातांची कीड कशी टाळावी?

दात येण्यापूर्वी मुलांच्या हिरड्या ओल्या कापडाने स्वच्छ करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. एकदा दात यायला सुरुवात झाली की, मऊ ब्रिस्टल्स (केस) असलेल्या ब्रशने दिवसातून दोनदा ते स्वच्छ करावेत. दातांचे आतील, वरचे आणि बाहेरील भाग नीट स्वच्छ केले जातील याची खात्री करा.

मुलांचे दात कसे घासावेत?

मुलांचे दात घासण्यासाठी सर्वप्रथम ब्रशवर थोड्या प्रमाणात टूथपेस्ट घ्या, ब्रश ४५ अंशांच्या कोनात धरा आणि हलक्या हाताने व लहान हालचाली करीत दात स्वच्छ करा. प्रत्येक दाताचा बाहेरील आणि खालचा भाग स्वच्छ करण्यासाठी ब्रश गोलाकार फिरवा. याच पद्धतीने वरचे आणि खालचे दात स्वच्छ करा. दात स्वच्छ करण्यासाठी दोन मिनिटे नक्की द्या. डॉक्टर मुलांचे दात सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी स्वच्छ करण्याचा सल्ला देतात. तसेच, मुलांच्या हिरड्यांना मालिश करणे आणि त्यांची जीभ स्वच्छ करणेही आवश्यक असल्याचे ते सांगतात.