Summer Breakfast Ideas For Everyone : वाढत्या तापमानामुळे दिवस सुरू होण्यापूर्वीच अनेकदा थकवा किंवा आळस जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक जण हलका आहार किंवा अगदी सकाळचा नाश्ता टाळण्यातसुद्धा समाधान वाटते. पण, आहारतज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात सकाळचा नाश्ता विशेष महत्त्वाचा ठरतो. कारण- उष्णतेचा सामना करण्यासाठी शरीराला पोषण आणि पुरेसे पाणी (हायड्रेशन) या दोन्ही गोष्टींची गरज असते. नाश्त्यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील ऊर्जेची पातळी टिकून राहते आणि दिवसभर ताजेतवाने वाटण्यासही मदत मिळते.

उन्हाळ्यात नाश्ता का आवश्यक ठरतो?

गरम हवामानामुळे घामाद्वारे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे लोकांना थकवा आणि निर्जलीकरण जाणवू शकते. तर त्याबद्दल केलॉग इंडियाच्या असोसिएट डायरेक्टर, न्यूट्रिशन नादिया मर्चंट सांगतात की, चांगले आरोग्य आणि दिवसाची चांगली सुरुवात यांसाठी उन्हाळ्यातील नाश्त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे व द्रवपदार्थ यांचा संतुलित प्रमाणात समावेश असणे आवश्यक आहे.

निरोगी नाश्त्यासाठी सोपा फॉर्म्युला

पौष्टिक नाश्ता तयार करण्याचे अनेक मार्ग आहेत; पण त्यापैकी एक सर्वांत सोपा मार्ग म्हणजे धान्यांपासून बनवलेले सेरिअल, दूध आणि हंगामी फळे एकत्र खाणे. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि दिवसाची सुरुवात निरोगी पद्धतीने होते. सेरिअलमधील कर्बोदके शरीराला ऊर्जेचा प्राथमिक स्रोत पुरवतात, ज्यामुळे दिवसाची सुरुवात सक्रिय आणि उत्साही होते. दूध किंवा दही घातल्याने प्रथिने मिळतात, जी स्नायू आणि हाडांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात. फोर्टिफाईड सेरिअलमधून बी जीवनसत्त्वे, लोह व फोलेट यांसारखी पोषक तत्त्वेदेखील मिळू शकतात; तर दुधामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी१२ मिळते.

फायबरकडे करू नका दुर्लक्ष

पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी, विशेषतः उन्हाळ्यात फायबर महत्त्वाची भूमिका बजावते. संपूर्ण धान्य आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला पुरेसे फायबर मिळते, पचनक्रिया सुधारते, आतड्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तसेच, फायबरमुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे दिवसभरात अयोग्य किंवा अस्वास्थ्यकर (unhealthy) पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते.

अतिरिक्त पोषणासाठी फळे खाणे

नाश्ता अधिक रंगीबेरंगी आणि चविष्ट करण्यासाठी उन्हाळा हा उत्तम काळ आहे. आंबे, केळी, बेरी, पपई व खरबूज यांसारखी ताजी फळे नाश्त्याला जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर व नैसर्गिक गोडवा देतात. त्यांमधील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासही मदत होते, ज्यामुळे उन्हाळ्यातील नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. तुम्ही योगर्ट, ओव्हरनाईट ओट्स किंवा फळांपासून बनवलेले स्मूदीजदेखील खाऊन पाहू शकता.

शरीरात पाण्याचे प्रमाण राखणे

दिवसभर शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक असले तरी याची सुरुवात अगदी सकाळपासूनच व्हायला हवी. नाश्त्यामध्ये फळे, दूध व दही यांसारख्या पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास, रात्रीच्या वेळी शरीरातील कमी झालेले पाण्याचे प्रमाण भरून काढण्यास मदत होऊ शकते. दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी, ताक, नारळपाणी किंवा लिंबूपाणी पिऊन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण पूर्ववत होण्यास आणि दिवसाच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी शरीराला तयार करण्यास मदत मिळते.