Vitamin Deficiency : असे अनेक लोक आहेत, ज्यांना रात्रीची पूर्ण झोप घेऊनही दिवसभर सारखे झोपावेसे वाटते. कधी कधी एखादी व्यक्ती घरी असताना दिवसा अनेक तास झोपूनही थकवा अनुभवू शकते, तर काही वेळा कामाच्या ठिकाणी बसलेले असतानाच त्यांना डुलकी लागते. अशा परिस्थितीत या अति-झोपेचे कारण शरीरातील एखाद्या विशिष्ट जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH)च्या मते, ‘या’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अति-झोप येण्याची शक्यता फारच कमी असते. तरीही, ‘या’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे दिवसभर सतत झोपावेसे)??? वाटणे किंवा गुंगी येणे शक्य आहे. जर तुम्हाला गरजेपेक्षा जास्त झोप येण्याचा त्रास होत असेल, तर त्यामागे कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता कारणीभूत असू शकते, हे आपण येथे जाणून घेऊ…
बी१२ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जास्त झोप
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ (NIH)नुसार, बी१२ जीवनसत्त्वाची कमतरता सतत झोप येण्याचे कारण असू शकते. दिवसा जास्त झोप येण्याचे हे एक दुर्मीळ कारण असू शकते. त्याव्यतिरिक्त,ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया, झोपेची कमतरता, सर्केडियन ऱ्हिदम डिसऑर्डर, औषधांचे परिणाम आणि डिप्रेशन किंवा प्रायमरी हायपरसोम्निया यांसारख्या मानसिक स्थितींमुळेही दिवसा जास्त झोप येऊ शकते.
बी१२ जीवनसत्त्व म्हणजे काय?
बी१२ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, जे काही विशिष्ट पदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळते आणि आहारातील पूरक घटक (डाएटरी सप्लिमेंट) किंवा औषध म्हणूनही उपलब्ध असते. लाल रक्तपेशींची निर्मिती, कार्य आणि विकास यांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे, तसेच डीएनए (DNA) संश्लेषणासाठीही याची गरज असते.
शरीरात बी१२ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे काय होते?
जेव्हा शरीराला बी१२ जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळत नाही, तेव्हा त्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे रक्तक्षय (ॲनिमिया), मज्जासंस्थेशी संबंधित बदल, सततचा थकवा, जिभेला सूज येणे (ग्लोसायटिस), हृदयाचे ठोके वाढणे (छाती धडधडणे) आणि पांढऱ्या व लाल रक्तपेशींच्या संख्येत घट होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
कोणत्या पदार्थांमधून बी१२ जीवनसत्त्व मिळते?
बी१२ जीवनसत्त्व वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये आढळत नाही. ते मासे, मांस, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या प्राणीजन्य उत्पादनांमधून मिळते. त्याव्यतिरिक्त, ‘फोर्टिफाईड’ (पोषक घटकांनी समृद्ध केलेले) नाश्त्याचे तृणधान्य (cereals) आणि आहार पूरकांमधूनही बी१२ जीवनसत्त्व मिळते.
