What To Do After I Get First Tattoo : सध्या तरुणाईंमध्ये टॅटूची प्रचंड क्रेझ आहे. एक छोटासा तरी टॅटू आपल्या शरीरावर असावा, अशी आपल्यातील अनेकांची इच्छा असते. त्यामुळे बघायला गेलं, तर टॅटू हा फॅशनचा एक भाग झाला आहे. टॅटूच्या माध्यमातून अनेक आठवणी, काही खास व्यक्तींची नावे जसे की, आई-वडील, प्रियकर, मित्र-मैत्रिणींची नावे, प्रपोज केल्याची तारीख, विशिष्ट महत्त्व असणारी चित्रे कायमस्वरूपी जतन करून ठेवता येतात. पण, मनात कुठेतरी इन्फेक्शन होण्याची, आपल्याला दुखणार तर नाही ना याची भीती कुठे ना कुठे असतेच, जर तुम्ही पहिल्यांदा टॅटू काढायला जाणार असाल, तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…
इंडिया टीव्ही न्युजने दिलेल्या माहितीनुसार, एलियन्स (Aliens) टॅटूचे संस्थापक सनी भानुशाली यांनी टॅटू काढण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मार्गदर्शक पुस्तक तयार केले आहे; जे टॅटू काढण्यापूर्वी तुमच्या प्रश्नांची उत्तरे सोडवण्यात आणि तुमची चिंता कमी करण्यात मदत करू शकते.
१. टॅटू काढताना होणाऱ्या वेदना
टॅटू काढताना सगळ्यात पहिला “मला दुखणार तर नाही ना” हाच प्रश्न विचारला जातो. पण, तुम्ही शरीराच्या कोणत्या भागावर टॅटू काढणार आहात यावर ती गोष्ट अवलंबून असते. शरीराचा असा भाग जिथे जास्त स्नायू किंवा चरबी असते तिथे टॅटू काढल्यास जास्त वेदना होतात. पण, याउलट जसे की तुमचे हात कमी संवेदनशील असतात. त्यामुळे टॅटू काढताना खोल श्वास घेणे, हायड्रेशन राखणे आणि तुमच्या अपॉइंटमेंटला तुम्ही कोणतीही धावपळ न करता आरामात पोहोचला आहात याची खात्री करणे यांसारख्या साध्या गोष्टी तुम्हाला टॅटू काढताना वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.
२. योग्य स्टुडिओ निवडा
पहिल्यांदा टॅटू काढण्यासाठी स्टुडिओ शोधत असताना तो स्वच्छ आहे ना याची खात्री करून घ्या. खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात कोणत्याही स्टुडिओमध्ये जाऊ नका. टॅटू स्टुडिओतील सर्व उपकरणे निर्जंतुकीकरण केnsली आहेत ना, प्रत्येक नवीन क्लायंटसाठी नवीन हातमोजे, एकदा वापरल्या जाणाऱ्या सुया पुन्हा वापरल्या जात नाहीत ना याची खात्री एकदा करून घ्या आणि मग निर्णय घ्या. कारण- तुमची एक चूक तुम्हाला संसर्ग, दुखापत, डाग किंवा इतर धोकादायक आरोग्य परिणामांसह तुमच्यासमोर येऊन उभी राहू शकते.
३. मनात शंका आणू नका
टॅटू काढण्यापूर्वी नेहमी सल्ला घ्या, चर्चा करा आणि तुम्हाला कोणती डिझाईन काढायची आहे याचेसुद्धा नियोजन करा. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ नका. तुम्ही टॅटू म्हणून काढणार असलेली विशिष्ट डिझाइन तुमच्यासाठी का महत्त्वाची आहे याबद्दल स्वतःला अनेक प्रश्न विचारा. तसेच काही निवडक स्टुडिओ तुमच्या टॅटू डिझाइनचे डिजिटल मॉक अपदेखील प्रदान करू शकतात.
४. टॅटूची काळजी
टॅटू काढून झाल्यानंतर तुमचे काम संपत नाही. तर नियमित टॅटू आणि त्याच्या आसपासचा भाग स्वच्छ ठेवणे, योग्य क्रीम लावणे, थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळणे, त्वचा खाजवणे टाळणे आदी गोष्टी तुम्ही नियमित पाळल्या पाहिजेत.
५. अस्वस्थ वाटणे
पहिल्यांदा टॅटू काढणाऱ्यांना या प्रक्रियेबद्दल थोडीशी चिंता वाटणे स्वाभाविक आहे. कारण- हा टॅटू कायमस्वरूपी तुमच्या शरीरावर असतो. पण, याबद्दल एखादा प्रतिष्ठित स्टुडिओ आणि एक अनुभवी कलाकार तुम्हाला प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शन आणि संपूर्ण प्रक्रियेत तुम्हाला आरामदायी वाटण्यास मदतसुद्धा करेल.
त्यामुळे टॅटूची डिझाईन असो किंवा टॅटू स्टुडिओ निवडणे असो सगळ्या गोष्टींबाबत अभ्यास करा आणि तुमचे आणि तुमच्या शरीराचे नुकसान होणार नाही ना याची काळजी घ्या.