When Is It Safe to Have Sex After a Heart Attack: हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा कोणाच्याही आयुष्यात अचानक येणारा आणि शरीरावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम करणारा गंभीर आजार आहे. या झटक्यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे त्या स्नायूंचं नुकसान होतं. अशा परिस्थितीत जीव वाचवणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच त्यानंतरचं आयुष्य काळजीपूर्वक जगणंही आवश्यक ठरतं.

हृदयविकाराच्या झटक्यातून वाचलेल्या व्यक्तींनी त्यांच्या दैनंदिन सवयी, आहार, व्यायाम यांबरोबरच शारीरिक संबंध (Sex) याबाबतही विशेष खबरदारी घेणं गरजेचं असतं. कारण- हा एक असा विषय आहे, ज्याबद्दल लोक कमी बोलतात; पण त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात.

शारीरिक संबंध आणि हृदयावर होणारा परिणाम

तज्ज्ञांच्या मते, शारीरिक संबंध ठेवताना हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाबही वाढतो. त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. सामान्य प्रकृतिस्वास्थ्य असलेल्या व्यक्तींमध्ये हा ताण सुरक्षित मानला जातो. मात्र, हृदयविकाराच्या झटक्यातून सावरत असलेल्या रुग्णांसाठी ही बाब प्रसंगी पुन्हा जीवघेणा धोका ठरू शकते.

अहमदाबाद येथील तज्ज्ञ व हृदय शल्यचिकित्सक डॉ. धवल नाईक सांगतात, “शारीरिक संबंधांमुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयावरील ताण वाढू शकतो. पण स्थिर आणि नियंत्रणात असलेल्या हृदयविकाराच्या रुग्णांनी योग्य ती काळजी घेतल्यास ही बाब सामान्यतः सुरक्षित असू शकते.”

ते पुढे म्हणतात, “प्रत्येक रुग्णाची स्थिती वेगवेगळी असते. काहींसाठी शारीरिक संबंध सुरक्षित असतात; तर काहींसाठी ते धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.”

हृदयविकारानंतर शारीरिक संबंध कधी सुरक्षित?

हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं.

तज्ज्ञांच्या मते, सौम्य (माइल्ड) हृदयविकाराचा झटका आल्यास आणि तत्काळ स्टेंट बसवण्यात आला असल्यास, काही रुग्ण दोन ते तीन आठवड्यांनंतर शारीरिक संबंध ठेवू शकतात. मात्र, गंभीर झटका आला असल्यास किंवा हृदयाची कार्यक्षमता कमी असल्यास, किमान सहा आठवडे थांबण्याचा सल्ला दिला जातो.

गुरुग्राम येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित कुमार चौरसिया म्हणतात, “शारीरिक संबंध आरोग्यासाठी फायदेशीर असू शकतात; पण ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी असलेल्या रुग्णांमध्ये त्यामुळे हृदयगती वाढते आणि ती परिस्थिती त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.”

लक्षात ठेवा – तुमचं शरीर काय सांगतंय?

हृदयविकारानंतर शारीरिक संबंध सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची चाचणी घेणं महत्त्वाचं आहे. हलक्या व्यायामानं करा स्वतःची चाचणी जर तुम्ही वेगानं चालू शकत असाल जिने चढू शकत असाल आणि अशा वेळी छातीत दुखणं, दम लागणं किंवा थकवा, अशी लक्षणं जाणवत नसतील तर तुमचं शरीर हळूहळू तयार होत आहे, असं समजता येईल.

जेवणानंतर लगेच संबंध टाळा!

हृदयविकारातून सावरलेल्या रुग्णांनी जेवणानंतर लगेच शारीरिक संबंध ठेवू नयेत.किमान एक ते तीन तासांचा अवधी द्यावा त्यामुळे अन्न पचायला वेळ मिळतो आणि हृदयावरील ताण कमी येतो

शारीरिक संबंधादरम्यान त्रास झाला तर?

खालील लक्षणं दिसल्यास त्वरित सावध व्हा :

  • छातीत वेदना
  • श्वास घेण्यास त्रास
  • जास्त थकवा
  • हृदयाचे अनियमित ठोके

अशा वेळी लगेच थांबा. काही मिनिटांत त्रास कमी झाला नाही, तर तातडीने डॉक्टरांकडे जा.

हे लक्षात ठेवा

  • हृदयविकारानंतर शारीरिक संबंध घाईने सुरू करू नयेत
  • डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक आहे
  • सौम्य झटका असल्यास २–३ आठवड्यांनंतर शक्य
  • गंभीर स्थितीत ६ आठवडे थांबणं योग्य
  • हलका व्यायाम करून स्वतःची क्षमता तपासा
  • जेवणानंतर लगेच संबंध टाळा
  • त्रास झाल्यास त्वरित थांबा आणि वैद्यकीय मदत घ्या