How Often Should You Replace Innerwear: अंतर्वस्त्र ही अशी गोष्ट आहे जी आपल्या शरीराच्या सतत संपर्कात असतात. बाहेर दिसणाऱ्या कपड्यांपेक्षा अंतर्वस्त्र घाम, बॅक्टेरिया, शरीराच्या डेड स्कीन आणि शरीराच्या वासाच्या थेट संपर्कात येतात. दररोज सकाळी अंघोळ करताना किंवा दिवसातून किमान दोन वेळा तरी अंतर्वस्त्र बदलली जातात आणि नियमितपणे धुतली जातात. पण अंतर्वस्त्र धुवून काढणं हे एवढंच पुरेसं आहे का? असा प्रश्न तज्ज्ञ विचारतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही दर महिन्याला किंवा वर्षातून ठराविक वेळेस तुमची अंतर्वस्त्र बदलणं गरजेचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, अंतर्वस्त्रांनाही एक विशिष्ट आयुष्य असते. ते जरी स्वच्छ आणि चांगले दिसत असले तरी ते कायमचे वापरता येत नाहीत. साधारणपणे दर ६ ते १२ महिन्यांनी अंतर्वस्त्रे बदलण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. कालांतराने कापडाच्या तंतूंमध्ये बदल होतात, त्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते.
जुने किंवा अयोग्यरित्या स्वच्छ केलेली अंतर्वस्त्रे वापरल्याने त्वचेची जळजळ, खाज सुटणे, संसर्ग आणि इतर स्वच्छतेच्या समस्या उद्भवू शकतात. ते नियमितपणे बदलणे अत्यंत गरजेचे आहे. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि लिव्हर तज्ज्ञ डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक वापरानंतर अंतर्वस्त्र स्वच्छ करणे आवश्यक आहे.
अंतर्वस्त्र बदलणे का गरजेचे आहे?
खरं तर सतत वापर आणि धुण्यामुळे कपड्यांच्या तंतूंमध्ये लहान छिद्रे तयार होतात. हे लहान छिद्र बॅक्टेरिया, बुरशी, डेड स्कीन आणि शारीरिक द्रवपदार्थ अडकवू शकतात. ते सामान्य धुण्याने पूर्णपणे काढून टाकता येत नाहीत. या साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी आणि त्वचेचे संक्रमण होऊ शकते. काही ठराविक गोष्टी सूचित करतात की, तुमची अंतर्वस्त्र बदलण्याची वेळ आता आली आहे. जर अंतर्वस्त्रांचे एलॅस्टिक सैल झाले, कापड पातळ झाले किंवा लहान छिद्रे दिसू लागली तर समजून घ्या की ते बदलणे गरजेचे आहे. धुतल्यानंतरही टिकणारे डाग किंवा धुतल्यानंतरही वास येणे हीदेखील कापडाची गुणवत्ता गमावल्याचे संकेत आहेत. रंग फिकट झाल्यासही कापड खराब होत असल्याचे दर्शवते.
तज्ज्ञ काय सांगतात?
अमेरिकन अकादमी ऑफ डर्मेटोलॉजी दररोज अंतर्वस्त्रे बदलण्याचा सल्ला देतात. ज्यांना भरपूर घाम येतो किंवा उष्ण हवामानात ही सवय फायदेशीर ठरू शकते. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, उष्ण, दमट किंवा धुळीच्या वातावरणात दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा अंतर्वस्त्रे बदलण्याची आवश्यकता अशू शकते. शरीरातील उष्णता आणि घर्षण सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
कापडाची निवड देखील महत्त्वाची आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, कापसासारखे नैसर्गिक श्वास घेण्यायोग्य कापड त्वचेसाठी चांगले असतात. ते ओलावा शोषून घेतात आणि हवा फिरू देतात. त्यामुळे यीस्ट आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. याउलट कॉटनव्यतिरिक्त इतर कापड ओलावा अडकवू शकतात आणि चिडचिड किंवा अॅलर्जिक प्रतिक्रियांची शक्यता वाढवू शकतात.
