When to Change Toilet Brush: घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण दररोज झाडलोट, पुसणे, बाथरूम आणि स्वयंपाकघराची साफसफाई करतो. मात्र, घरातील अशी एक वस्तू आहे, जी आपण रोज वापरतो; पण तिच्याकडेच सर्वाधिक दुर्लक्ष करतो. ती म्हणजे टॉयलेट ब्रश.
अनेक घरांमध्ये एकच टॉयलेट ब्रश महिनोन महिने, तर कधी वर्षानुवर्षे वापरला जातो. तो अजून वापरण्यासारखा दिसतो म्हणून त्याचाच वापर सुरू राहतो. पण याच सवयीमुळे घरात नकळत जंतूंची वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
म्हणूनच टॉयलेट ब्रशची योग्य ती काळजी कशी घ्यावी आणि तो कधी बदलावा, हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
प्रत्येक वापरानंतर ही चूक करू नका
टॉयलेट साफ करताना ब्रश थेट घाण, जंतू आणि ओलसर पृष्ठभागाच्या संपर्कात येतो. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर त्यावर सूक्ष्मजीव चिकटून राहू शकतात.
अनेक जण टॉयलेट साफ केल्यानंतर ब्रश न धुता किंवा पूर्णपणे ओला असतानाच त्याच्या होल्डरमध्ये ठेवतात. अशा ओलसर वातावरणात जंतू आणि बुरशी वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ब्रश स्वतःच घाणीचा स्रोत बनू शकतो.
ब्रश स्वच्छ ठेवण्यासाठी काय कराल?
टॉयलेट ब्रश वापरल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने नीट धुवावा. त्यानंतर काही मिनिटे तो टॉयलेट सीट आणि कमोडच्या कडेमध्ये अशा प्रकारे ठेवावा, जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल.
ब्रश पूर्णपणे कोरडा झाल्यानंतरच तो होल्डरमध्ये ठेवावा. वेळोवेळी निर्जंतुकीकरण द्रावण किंवा ब्लीचच्या द्रावणात (सूचनांनुसार) काही वेळ ठेवून तो स्वच्छ करता येतो. त्यानंतर तो पूर्णपणे वाळू द्यावा.
‘हे’ संकेत दिसत असतील तर सावध व्हा
टॉयलेट ब्रशचे तंतू पसरलेले दिसू लागले, तुटू लागले किंवा त्यांचा आकार बदलला असेल, तर तो आधीसारखी स्वच्छता करू शकत नाही.
त्याशिवाय ब्रशमधून सतत दुर्गंधी येत असेल, त्यावर बुरशी दिसत असेल किंवा त्याचा रंग बदललेला दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे संकेत ब्रश बदलण्याची वेळ जवळ आल्याचं दर्शवू शकतात.
होल्डरची स्वच्छता तितकीच महत्त्वाची
केवळ टॉयलेट ब्रश स्वच्छ ठेवून उपयोग होत नाही. त्याचा होल्डरही नियमितपणे धुणे आवश्यक आहे. होल्डरमध्ये साचलेलं पाणी आणि घाण यांमुळे जंतूंची वाढ होऊ शकते.
आठवड्यातून किमान एकदा होल्डर स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडा करणे ही एक चांगली सवय मानली जाते.
मग टॉयलेट ब्रश नेमका कधी बदलावा?
घरातील टॉयलेटचा वापर सामान्य प्रमाणात होत असेल, तर साधारण सहा महिन्यांनी टॉयलेट ब्रश बदलणे योग्य मानले जाते. मात्र, कुटुंब मोठे असेल, टॉयलेटचा वापर जास्त होत असेल किंवा ब्रशचे तंतू झिजलेले, वाकलेले अथवा तुटलेले दिसत असतील, तर तीन ते चार महिन्यांतच नवीन ब्रश घेणे अधिक योग्य ठरू शकते.
वेळीच टॉयलेट ब्रश बदलल्यास स्वच्छता अधिक प्रभावी राहते आणि जंतूंचा प्रसार होण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
(टीप : ही माहिती स्वच्छता आणि आरोग्यविषयक सर्वसाधारण मार्गदर्शनावर आधारित आहे. वापराची वारंवारता, घरातील परिस्थिती आणि उत्पादनाची गुणवत्ता यांनुसार टॉयलेट ब्रश बदलण्याचा कालावधी बदलू शकतो.)
