Unsafe Atta for Diabetics : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अगदी खास आहे. आज हिंदू नववर्षाची सुरूवात असल्याने आज गुढीपाडव्याचा सण देखील आहे. तसेच चैत्र नवरात्रौत्सवाला देखील सुरूवात झाली आहे. यंदा गुढीपाडवा आणि घटस्थापना दोन्ही एकाच दिवशी, म्हणजेच १९ मार्च २०२६ रोजी आहेत. त्यामुळे चैत्र नवरात्री निमित्त अनेक जण उपवास करतात. उपवास करणे ही श्रद्धेची बाब आहे. पण, मधुमेही रुग्णांसाठी ते थोडे धोकादायक ठरू शकते.
उपवासादरम्यान आहारात आणि जेवणाच्या वेळांमध्ये होणारे बदल रक्तातील साखरेच्या पातळीवर थेट परिणाम करतात. दीर्घकाळ उपाशी राहिल्याने किंवा फक्त गोड फळे, तळलेले पदार्थ खाल्ल्याने साखरेची पातळी अचानक वाढू किंवा कमी होऊ शकते. मधुमेही अनेकदा खासकरून नवरात्रीच्या उपवासादरम्यान कुट्टूचे पीठ खातात. इंग्रजीमध्ये या पिठाला बकव्हिट असं म्हणतात. या कुट्टूच्या पिठात अनेक पोषक गुणधर्म असून ते शरीरासाठी लाभदायक असतात. पण, आता मधुमेही रुग्णांसाठी प्रश्न असा निर्माण होतो की, हे पीठ आरोग्यासाठी एक चांगला पर्याय आहे की नाही.
मधुमेह प्रशिक्षक डॉक्टर अनुपम घोष म्हणाले की, नवरात्रीदरम्यान बहुतेक लोक कुट्टूचे पीठ खातात, जे सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे फळांचे पीठ आहे. पण, मग हे मधुमेहींसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही, किती प्रमाणात आणि कोणत्या पद्धतीने खाता यावर अवलंबून असते. या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो. पण, बनवण्याची पद्धत आणि त्याचे प्रमाण तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. चला, तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की, कुट्टूचे पीठ मधुमेहींच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकते ते…
कुट्टूच्या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स काय असतो?
एका तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, कुट्टूच्या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) सुमारे ४५ ते ५५ असतो, जो कमी मानला जातो. याचा अर्थ असा की, रक्तातील साखर हळूहळू वाढवते. म्हणूनच अनेक डॉक्टर मर्यादित प्रमाणात खाण्याची शिफारस करतात. ग्लायसेमिक लोड (GL) खाल्लेल्या अन्नाच्या एकूण प्रमाणामुळे रक्तातील साखर किती वाढेल हे सांगतात. कुट्टूच्या पिठात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.
किती आणि कसे खावे?
- मधुमेही व्यक्तींनी उपवास करत असल्यास, एका वेळी फक्त २५ ग्रॅम कुट्टूच्या पिठाचे (सुमारे १ लहान पोळी) सेवन करावे.
- एकटे खाण्याऐवजी, चीज, दही किंवा शेंगदाण्यांसारख्या प्रथिने आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत.
- कुट्टूच्या पुऱ्या खाणे टाळावे.
- बटाट्याच्या किंवा उच्च-कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांबरोबर खाऊ नये.
काय करावे आणि काय करू नये?
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नवरात्रीत उपवास करत असल्यास, त्यांनी जास्त वेळ उपाशी राहणे टाळावे. थोडे थोडे जेवण घ्यावे आणि आपल्या रक्तातील साखरेची नियमितपणे तपासणी करावी.
तज्ज्ञांचा सल्ला
उपवासादरम्यान हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होणे) होण्याचा धोका देखील असतो. त्यामुळे, जर तुम्ही कुट्टूचे सेवन करत असाल. तर तुमच्या रक्तातील साखरेची नियमितपणे तपासणी करा. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुमच्या औषधांच्या मात्रेत बदल करा.
निष्कर्ष
मधुमेहींसाठी कुट्टूचे पीठ योग्य आहे. पण, अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
