Heart Damaging Foods:  आपल्यापैकी अनेकांचा समज असतो की, फ्रिजमध्ये ठेवलेले काही पदार्थ पूर्णपणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यावर हृदयरोग तज्ज्ञांचे मत आहे की, काही पदार्थ जे लोक आरोग्यासाठी फायदेशीर समजून दररोज खातात, पण ते दीर्घकाळ खाल्ल्यास त्यांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते याचा ते विचार करत नाहीत.

डॉक्टरांच्या मते, खाद्यपदार्थांच्या पॅकेजवर अनेकदा ‘नॅच्युरल’, ‘क्लीन’ किंवा ‘हेल्दी’ असे शब्द लिहिलेले असतात, ज्यामुळे ते हृदयासाठी चांगले आहेत असा लोकांचा समज होतो. पण त्यातील साखर, प्रक्रिया केलेले तेल आणि इतर घटक हळूहळू शरीरावर हानिकारक परिणाम करू शकतात. यामुळे ट्रायग्लिसराइड्स, रक्तातील साखर आणि दाह वाढू शकतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

दही साधारणपणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, कारण त्यात प्रथिने आणि प्रोबायोटिक्स असतात. पण, बाजारात मिळणाऱ्या अनेक फ्लेवर्ड दह्यामध्ये अतिरिक्त साखरेचे प्रमाण जास्त असते. एका सर्व्हिंगमध्ये अंदाजे २० ते २५ ग्रॅम अतिरिक्त साखर असू शकते. साखरेच्या या उच्च प्रमाणामुळे ते दही आरोग्यासाठी फायदेशीर तर नसतेच, पण त्याने शरीरात साखरेचे प्रमाणही वाढते. याचे दररोज सेवन केल्यास वजन वाढणे, ट्रायग्लिसराइड्स वाढणे आणि हृदयरोगाचा धोका वाढणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

बाटलीमधील स्मूदी आणि ग्रीन ज्यूस

आजकाल बरेच लोक स्मूदी किंवा ग्रीन ज्यूस हे डिटॉक्स ड्रिंक आहेत असे समजून पितात. पण डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पॅकेज केलेले स्मूदी आणि ज्यूस अनेक लोकांना वाटतात तितके आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. जेव्हा फळांचा रस काढला जातो, तेव्हा त्यातील बराचसा फायबर काढून टाकला जातो आणि फक्त नैसर्गिक साखर शिल्लक राहते, यामुळे शरीरातील साखरेमध्ये अचानक वाढ होते, ज्यामुळे रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होऊ शकते आणि इन्सुलिनवर दबाव येऊ शकतो. दीर्घकाळात हे हृदय आणि चयापचय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

सॅलेड ड्रेसिंग्ज

सॅलेड हृदयासाठी खूप चांगले मानले जाते, परंतु अनेकदा लोक त्यात जे पॅकेज ड्रेसिंग घालतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. अनेक तयार ड्रेसिंगमध्ये रिफाइंड ऑइल, अतिरिक्त साखर, प्रिझर्व्हेटिव्ह आणि इतर रसायने असतात. त्यांचे दररोज सेवन केल्यास शरीरातील दाह आणि अतिरिक्त कॅलरीज वाढू शकतात, ज्यांचा संबंध हृदयरोगाशी आहे.

रोजच्या ‘या’ सवयी घातक

डॉक्टरांच्या मते, हे पदार्थ अधूनमधून खाणे ही मोठी समस्या नाही. खरी समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा ती रोजची सवय बनते. उदाहरणार्थ, दररोज सकाळी फ्लेवर्ड योगर्ट खाणे किंवा रोज पॅकेज्ड स्मूदी पिणे, यामुळे शरीरातील चयापचयाचा ताण आणि दाह हळूहळू वाढू शकतो.

हृदयाचे आरोग्य कसे सुरक्षित ठेवावे?

हृदयाच्या आरोग्यासाठी केवळ पॅकेजिंगवर अवलंबून न राहणे महत्त्वाचे आहे. पोषणविषयक माहिती आणि घटक नेहमी काळजीपूर्वक वाचा. शक्य असेल तेव्हा ताजी फळे, साधे दही, घरी बनवलेले ज्यूस आणि हलके ड्रेसिंग यांचा पर्याय निवडा. आहारात छोटे बदल दीर्घकाळात हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.