Which foods are beneficial with Tea: चहा हे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. भारतात तर दिवसाची सुरुवात अनेकांच्या चहाच्या कपानेच होते. चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल्स आणि इतर उपयुक्त घटक असतात, जे शरीराला विविध प्रकारे फायदा पोहोचवू शकतात. योग्य प्रमाणात चहा प्यायल्याने ताजेतवाने वाटते, थकवा कमी होतो आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. चहामधील कॅफिन मेंदूला उत्तेजित करून सतर्कता वाढवण्याचे काम करते. त्यामुळे काम करताना किंवा अभ्यास करताना चहा प्यायल्याने ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते. त्याशिवाय चहामधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण देण्यास मदत करतात. मात्र, कोणतीही गोष्ट अति प्रमाणात सेवन करणे योग्य नसते. दरम्यान, अनेक जण चहा पिता पिता विविध पदार्थही खातात. पण तुम्हाला ठाऊक आहे का? चहा पिताना नक्की कोणत्या पदार्थाचे सेवन करायला हवे आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत?
चहाबरोबर काय खावे आणि काय खाऊ नये?
१. फायबरयुक्त स्नॅक्स
चहाबरोबर फायबरयुक्त पदार्थ खाणे चांगले मानले जाते. कारण- ते कॅफिनचे शोषण कमी करतात. चहाबरोबर मुरमुरे, भाजलेले मखाणे, गूळ-चणे यांसारखे पदार्थ खाणे फायदेशीर ठरू शकते.
२. हलके प्रथिनयुक्त स्नॅक्स
चहाबरोबर हलके आणि प्रथिनयुक्त पदार्थ खाणे फायदेशीर मानले जाते. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते. उकडलेली अंडी, भाजलेले चणे हे चहाबरोबर खाण्यासाठी चांगले पर्याय आहेत.
३. कमी लोह असलेले पदार्थ
चहामधील टॅनिन शरीरातील लोहाच्या शोषणावर परिणाम करू शकतात. त्यामुळे चहाबरोबर लोहाचे प्रमाण तुलनेने कमी असलेले पदार्थ खाणे उत्तम ठरते. बिस्किटे, टोस्ट, खाकरा, इडियप्पम आणि तांदळापासून बनवलेले हलके पदार्थ हे चहाबरोबर खाण्यासाठी चांगले पर्याय आहेत. हे पदार्थ हलके असतात, पचनावर जास्त ताण देत नाहीत आणि चहाच्या चवीला उत्तम पूरक ठरतात.
४. आम्लता कमी करणारे पदार्थ
जर तुम्ही कडक चहा पीत असाल, तर तो अशा पदार्थांसोबत घेणे उत्तम आहे, जे पोटाला आराम देतात आणि आम्लपित्ताची शक्यता कमी करतात. केळी, गुळाचे छोटे तुकडे, शेंगदाणे, पोहे आणि काकडीचे सलाड यांसारखे पदार्थ चहाबरोबर चांगले लागतात. हे पदार्थ पचायला हलके असतात, दीर्घकाळ ऊर्जा देतात आणि चहाच्या तीव्रतेमुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात.
५. पचनास मदत करणारे मसालेदार पदार्थ
चहाबरोबर सेवन केल्यास काही मसाले पचनसंस्था सुधारण्यास मदत करू शकतात. ???अजवाइनची मठरी (की- ओव्याच्या पुऱ्या), बडीशेपयुक्त पदार्थ आणि आल्यापासून बनवलेले हलके पदार्थ हे चहासाठी उत्तम पर्याय आहेत. या मसाल्यांमधील नैसर्गिक गुणधर्म पचनास चालना देतात आणि अपचन व पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करतात. तसेच ते चहाची चव अधिक संतुलित आणि आनंददायी बनवतात.
चहाबरोबर काय खाऊ नये?
१. लोह आणि प्रथिने भरपूर असलेले पदार्थ
तज्ज्ञांच्या मते, चहामधील टॅनिन आणि इतर संयुगे वनस्पतीजन्य लोहाच्या शोषणात अडथळा आणू शकतात. त्यामुळे मसूर, राजमा, हरभरा, हिरव्या पालेभाज्या व मोड आलेली कडधान्ये यांसारख्या लोहयुक्त पदार्थांसोबत चहा पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. शरीराला या पोषक तत्त्वांचा पूर्ण लाभ मिळावा यासाठी हे पदार्थ खाल्ल्यानंतर किमान एक ते दोन तासांनी चहा पिणे योग्य ठरते.
२. लिंबूवर्गीय फळे आणि फळांचे सलाड
चहाबरोबर संत्री, मोसंबी, लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने काही लोकांना आम्लपित्त, छातीत जळजळ व पचनाच्या समस्या उदभवू शकतात. चहामधील कॅफिन आणि टॅनिन हे या आम्लयुक्त फळांसोबत प्रतिक्रिया देऊन संवेदनशील व्यक्तींमध्ये अस्वस्थता वाढवू शकतात. त्यामुळे चहाबरोबर संत्री, मोसंबी, किवी यांसारखी फळे किंवा फ्रूट सॅलड खाणे टाळणे चांगले. विशेषतः जर तुम्हाला आधीपासून आम्लपित्त किंवा पचनाच्या समस्या असतील.
३. बेसन आणि तळलेले पदार्थ
समोसे, पकोडे आणि इतर तळलेले पदार्थ चहाबरोबर खाणे अत्यंत लोकप्रिय असले तरी ते पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण टाकू शकतात. पकोडे, समोसे, कचोरी आणि बेसनापासून बनवलेले पदार्थ यांमध्ये तेल आणि मसाल्यांचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ चहाबरोबर खाल्ल्यास गॅस, अपचन, पोट फुगणे वा जडपणा जाणवू शकतो. त्यामुळे चहाबरोबर हलके आणि कमी तेलकट पदार्थ निवडणे अधिक फायदेशीर ठरते.
४. दही आणि दुग्धजन्य पदार्थ
चहाबरोबर दही किंवा इतर जड दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने काही लोकांमध्ये पोट फुगणे किंवा जडपणा यांसारख्या पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, दुग्धजन्य पदार्थांमधील काही घटक चहामधील फायदेशीर अँटीऑक्सिडंट्सचा प्रभाव कमी करू शकतात, असे काही अभ्यासांमध्ये सुचवले गेले आहे. त्यामुळे चहाबरोबर दही, रायता आणि जास्त प्रमाणात दुग्धजन्यता असलेले पदार्थ टाळणे योग्य ठरते, विशेषतः ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत.
