Fruits For Diabetic Patients: उपवासात फळांचा रस पिण्याऐवजी शक्यतो संपूर्ण फळ खाणं अधिक फायदेशीर ठरतं. कारण- त्यामुळे तंतू मिळतात आणि पोट भरल्याची भावना अधिक काळ टिकण्यास मदत होते. मात्र, फळं खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी किती वाढेल हे फळाचा प्रकार, सेवनाचं प्रमाण आणि त्या व्यक्तीची आरोग्यस्थिती यांवर अवलंबून असतं.
उपवासात लोक फळं खाणं पसंत करतात. फळं आरोग्यासाठी चांगलीच असतात. त्यामध्ये जीवनसत्त्वं, खनिजं, तंतू व अँटिऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात. उपवासाच्या काळात शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी फळं खाणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, सर्वच फळं एकसारखी नसतात. काही फळांमध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं; तर काही फळांमध्ये तंतू आणि पाण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे फळांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर होणारा परिणामही वेगवेगळा असू शकतो.
विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या असलेल्या व्यक्तींनी फळांची निवड करताना आणि त्यांचं प्रमाण ठरवताना काळजी घेणं आवश्यक आहे.
मधुमेहींनी जास्त प्रमाणात खाऊ नयेत अशी फळं खालीलप्रमाणे :
१. चिकू
चिकू हे गोड चवीचं फळ असून, त्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदकांचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं. चिकूमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज व सुक्रोज यांसारख्या नैसर्गिक साखरेचा समावेश असतो. त्याशिवाय या फळातून तंतू, पोटॅशियम आणि काही प्रमाणात जीवनसत्त्वंही मिळतात. उपवासाच्या काळात चिकू खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळू शकते. मात्र, त्याची गोड चव लक्षात घेऊन प्रमाणाचं भान ठेवणं महत्त्वाचं आहे. चिकूमध्ये कर्बोदकं असल्यामुळे ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
२. सीताफळ
सीताफळ हे गोड, मऊ गर असलेलं फळ असून, त्यामध्ये नैसर्गिक साखरेसोबत कर्बोदकं आणि उष्मांकही असतात. त्यामध्ये काही प्रमाणात तंतू, पोटॅशियम व जीवनसत्त्वेही मिळतात. त्यामुळे सीताफळ हे पोषक फळ असलं तरी त्याची गोड चव आणि पोषणमूल्यं लक्षात घेऊन, ते योग्य प्रमाणात खाणं आवश्यक आहे. सीताफळातील कर्बोदकं पचनानंतर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
३. केळी
केळी हे सहज उपलब्ध होणारं आणि ऊर्जा देणारं फळ आहे. त्यामध्ये कर्बोदकं, नैसर्गिक साखर, पोटॅशियम व जीवनसत्त्व B6 असतं. केळ्यामधील तंतूंमुळे पचनक्रियेला मदत होते. उपवासात केळी खाल्ल्यानं भूक काही काळ नियंत्रणात ठेवण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते.
४. आंबा
आंबा हे उन्हाळ्यात आवडीनं खाल्लं जाणारं गोड फळ आहे. त्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदकं असतात. त्यासोबतच आंब्यात जीवनसत्त्व C, बीटा-कॅरोटीन, काही प्रमाणात तंतू आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे आंबा हा पोषक आहाराचा भाग होऊ शकतो. मात्र, आंब्याच्या गोड चवीमुळे तो मोठ्या प्रमाणात खाल्ला जाण्याची शक्यता असते. आंबा खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी किती वाढेल, हे खाल्लेल्या आंब्याचं प्रमाण, त्याचा पिकलेपणा आणि व्यक्तीची चयापचय क्षमता यांवर अवलंबून असतं.
५. द्राक्षे
द्राक्षांमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांसारखी नैसर्गिक साखर असते. त्यामधून पाणी, काही प्रमाणात तंतू, के जीवनसत्त्व आणि विविध अँटिऑक्सिडंट्सही मिळतात. विशेषतः लाल आणि जांभळ्या द्राक्षांमध्ये अँथोसायनिन्ससारखी वनस्पतीजन्य संयुगं असू शकतात. द्राक्षांचा आकार लहान असल्यामुळे अनेकदा नकळत मोठ्या प्रमाणात द्राक्षं खाल्ली जातात. त्यामुळे त्यातून मिळणारी एकूण साखर आणि कर्बोदकांचं प्रमाण वाढू शकतं.
मग कोणती फळं खावीत?
मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी पेरू, सफरचंद, नाशपाती, जांभूळ, स्ट्रॉबेरी व पपई यांसारखी फळं चांगले पर्याय मानले जातात. कारण- या फळांमध्ये तंतू चांगल्या प्रमाणात असतात आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स तुलनेनं कमी असतो. तरीही ही फळं योग्य प्रमाणातच खावीत.
तुम्हाला मधुमेह असल्यास उपवासाच्या काळात दीर्घकाळ उपाशी राहणं टाळा. एकाच वेळी भरपूर फळं खाण्याऐवजी थोड्या थोड्या प्रमाणात खा. फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणं अधिक फायदेशीर ठरतं.
