Facing gut issues on home cooked food : मी बाहेरचं खात नाही, मी घरचंच खातो, असे म्हणणारे अनेक जण असतात. पण, तुम्ही सेवन करताय ते अन्न खरोखरच आरोग्यदायी आहे का? आरोग्य तज्ज्ञ निकिता बर्दिया यांच्या मते, अगदी ‘संतुलित’ वाटणारे अन्नही तुमच्या पचनकार्यात अथवा आतड्यांच्या कार्यामध्ये बाधा निर्माण करू शकते. काही मंडळींना असे वाटते की, समस्या फक्त बाहेरचं खाल्ल्यामुळे उद्भवतात; पण, या समस्या आपल्याच काही दैनंदिन चुकीच्या सवयींमुळे उद्भवतात. बहुतेक लोक असे मानतात की, जंक फूडमुळेच पचन बिघडते. पण, तज्ज्ञ ज्या लोकांबरोबर काम करतात, त्यापैकी ८० टक्के लोक स्वतःच्या स्वयंपाकघरात होणाऱ्या चुकांमुळे अडचणीत येतात. या अडचणी कोणत्या त्याबद्दल बातमीतून जाणून घेऊयात….

अशा काही गोष्टी ज्या नकळत आपल्या पोटाचे आरोग्य बिघडवतात…

१. रात्री ३ वाट्या कच्चे सॅलड खाणे

रात्री कच्च्या भाज्या खाल्ल्याने पोटफुगी, गॅस आणि सकाळी पोट जड वाटणे अशा समस्या जाणवतात. कारण – सूर्यास्तानंतर तुमचे आतडे कमी सक्रिय असते. त्यामुळे सॅलड खात असाल, तर हलक्या भाजलेल्या किंवा शिजवलेल्या भाज्या खाणे फायदेशीर ठरेल.

२. डाळ, राजमा, छोले व्यवस्थित न भिजवता खाणे

घरी बनवलेली डाळ चुकीच्या पद्धतीने तयार केल्यास पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळे फायटिक ॲसिड + ऑलिगोसॅकराइड्स = गॅस + आम्लता उदभवते. त्यामुळे ८ ते १२ तास डाळ भिजवा, भिजवलेले पाणी टाकून देऊन ओवा, हिंग घालून शिजवा.

३. जेवणाबरोबर पाणी पिणे

पाण्यामुळे पाचक एंझाइम्स कमकुवत होतात, ज्यामुळे पचनक्रिया कमकुवत होऊन गॅस तयार होतो. त्यामुळे जेवणापूर्वी २० मिनिटे किंवा जेवल्यानंतर ३० ते ४५ मिनिटांनी पाणी प्या.

४. खूप जास्त आरोग्यदायी खाणे

ज्वारी, बाजरी, नाचणी ही धान्ये उत्तम आहेत; पण त्यांचे जास्त प्रमाणात खाल्ल्यास बद्धकोष्ठता, पोट फुगणे आदी समस्या उदभवू शकतात. कारण- ही धान्ये पोटात फुगतात आणि त्यामुळे पचनाची प्रक्रिया थोडी मंद होते. त्यामुळे आठवड्यात दोन ते तीन वेळा ज्वारी, बाजरी, नाचणीचे सेवन करणे योग्य ठरू शकते; पण दररोज खाणे टाळावे.

५. दही, ताक जास्त प्रमाणात खाणे

दही आणि ताकामध्ये प्रो-बायोटिक्स असतात, जे सामान्यतः पोटासाठी चांगले असतात. पण, जर पोटात आधीच सूज किंवा त्रास होत असेल, तर जास्त दही, ताक खाल्ल्याने ॲसिडिटी आणि पोट फुगणे अशा समस्या उदभवू शकतात. त्यामुळे सगळ्यात प्रथम पोट शांत आणि ठीक होऊ द्या. त्यानंतरच हळूहळू दही किंवा ताकाचा आहारात वापर करा.

६. रिकाम्या पोटी फळे किंवा ओट्स खाणे

फक्त फळे, ओट्स खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, पचन बिघडते आणि सूजसुद्धा येते. त्यामुळे अशा समस्यांना दूर ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी फक्त फळे किंवा ओट्स खाण्यापेक्षा प्रथिने किंवा फॅट्स ( दही, बिया, काजू) सह खा.

७. सकाळी उठल्यावर सर्वांत आधी चहा, कॉफी पिणे

सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमच्या आतड्यांचे अस्तर नाजूक असते. अशा वेळी रिकाम्या पोटी कॉफी, चहा घेतल्यास ॲसिडिटी, जुलाब व मळमळ होऊ शकते. त्यामुळे सकाळी उठल्यावर चहा, कॉफी पिण्याऐवजी काजू, मनुका खा किंवा चिमूटभर मीठ घालून कोमट पाणी प्या.

८. खूप कमी चरबीयुक्त आहार

तुमच्या आतड्यांना पोषक तत्त्वे शोषण्यासाठी चरबीची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी चरबी असणारा आहार घेत असाल, तर पचन मंद होऊन हार्मोनल संतुलन बिघडू शकते. त्यामुळे तुमच्या आहारात दररोज एक चमचा तूप, काजू आणि बिया घाला.

याबद्दल आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डीटी. गुलनाज शेख यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी सांगितले की, फक्त स्वच्छ आणि आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्याने पचन चांगले होईल, असे नाही. तर अन्न कशाबरोबर खाल्ले जाते, शिजवले जाते आणि कधी खाल्ले जाते हेसुद्धा महत्त्वाचे असते. रात्री जास्त प्रमाणात कच्च सॅलड खाणे, योग्यरीत्या भिजवल्याशिवाय जड डाळ किंवा बाजरी खाणे या सर्वांमुळे आतड्यांवर ताण येऊ शकतो. संध्याकाळी पचन नैसर्गिकरीत्या मंदावते. म्हणून रात्री उशिरा कच्चे किंवा खूप तंतुमय पदार्थ पोटफुगीचे कारण बनू शकतात.

भिजवण्याच्या आणि शिजवण्याच्या पद्धतीमुळे खरोखरच काही फरक पडतो का?

राजमा आणि छोले यांमध्ये संयुगे असतात, जे व्यवस्थित भिजवले नाहीत, तर पोटात गॅस होऊ शकतो. त्यामुळे काही तास भिजवून, भिजवलेले पाणी टाकून देऊन आणि हिंग किंवा ओवा यांसारख्या मसाल्यांचा वापर करून ते शिजवल्याने पचनाचा त्रास कमी होतो. अन्न तयार करताना आवश्यक ते छोटे छोटे लहान बदल केल्याने शरीर अन्न कसे हाताळते या बाबतीत खूप चांगला परिणाम घडून येऊ शकतो.

आता जेवणाबरोबर पाणी न पिण्याचं कारण काय?

जेवणादरम्यान थोडेसे पाणी पिणे ठीक आहे; पण जेवणादरम्यान जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने काही लोकांना पोट जड झाल्यासारखे वाटू शकते. ज्यांना पचन संवेदनशीलता आहे, त्यांच्यासाठी जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर २० ते ३० मिनिटांचा फरक ठेवून पाणी पिणे अधिक सोईस्कर ठरू शकते.

आरोग्यदायी पदार्थ कधी समस्या निर्माण करतात?

दररोज जास्त प्रमाणात बाजरी खाल्ल्याने काही मंडळींना बद्धकोष्ठता होऊ शकते. आतडे आधीच सुजलेले असताना जास्त दही खाल्ल्याने पोटफुगी वाढू शकते. रिकाम्या पोटी फळे किंवा ओट्स खाल्ल्याने नंतर जास्त भूक लागू शकते. म्हणून कार्बोहायड्रेट्ससोबत प्रोटीन किंवा चांगली चरबी (उदा. सुका मेवा, तूप, दही) घेतल्यास पचन अधिक संतुलित आणि स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा- पचनसंस्था व्यवस्थित आणि आरामात काम करण्यासाठी अन्नाचे प्रमाण, खाण्याची वेळ, आहारातील संतुलन आणि अन्न कसे तयार केले जाते या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात