What Are The 6 Bad Habits For Your Body : सवयी लागल्या की, त्या लवकर सुटत नाहीत; मग त्या चांगल्या असो किंवा वाईट. Quora वरील अलीकडच्या एका पोस्टमध्ये ‘सायलेंट सवयी’बाबतची एक यादी तयार करण्यात आलीय, ज्या आपल्या शरीराला आतून हळूहळू नष्ट करतात. बोटे मोडणे, लघवी रोखून धरणे, बड्स वापरणे, जेवताना पाणी पिणे, खूप गरम अन्न खाणे आणि पोटावर झोपणे आदी अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.
अशा प्रकारच्या दाव्यांमुळे लोकांमध्ये अनेकदा चिंता किंवा भीती निर्माण होते. पण, रोजच्या आयुष्यातील प्रत्येक सवय निर्माण केल्या गेलेल्या भीतीइतकी धोकादायक असतेच, असे नाही, जशी ती ऐकायला वाटते. तर प्रत्येक वाईट सवयीमागील वैद्यकीय कारणे समजून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या इंटर्नल मेडिसिन कन्सल्टंट डॉक्टर हनी सावला यांच्याशी चर्चा केली. त्यांनी यादीमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक सवयीमागच्या कारणांबद्दलची सविस्तर माहिती दिली, जी आपल्या एकूण आरोग्यासाठी कधी हानिकारक ठरू शकते, तर कधी नाही.
१) बोटे मोडणे
बोटे मोडल्यामुळे येणाऱ्या कटकट आवाजामुळे (knuckles) संधिवात होतो, अशी भीती अनेक दशकांपासून लोकांमध्ये आहे. पण, डॉक्टरांच्या मते, ही भीती बहुतांश वेळा चुकीची ठरते. बोटे मोडल्यावर येणारा आवाज सांध्यांमधील द्रवात असलेल्या गॅसच्या बुडबुड्यांच्या हालचालीमुळे येतो. पण, ही गोष्ट तुम्ही बोटे कशा प्रकारे मोडता यावरसुद्धा अवलंबून असते. जोरात बोटे मोडल्यामुळे आजूबाजूच्या अस्थिबंधनांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे तात्पुरती सूज येऊ शकते किंवा पकड कमी होऊ शकते. अधूनमधून बोटे मोडणे सहसा निरुपद्रवी असते. पण, सतत किंवा जबरदस्ती करून बोटे मोडणे टाळले पाहिजे.
२) वारंवार लघवी रोखून ठेवणे
नियमितपणे लघवी थांबवून किंवा रोखून ठेवल्याने मूत्राशयावर ताण येऊ शकतो. कालांतराने, त्यामुळे मूत्रसंसर्ग, मूत्राशय जास्त ताणणे, मूत्राशय किंवा पोट साफ करताना पूर्णपणे रिकामे झाल्यासारखे न वाटणे असे धोके उद्भवतात. मूत्राशय नैसर्गिक लयीत उत्तम प्रकारे कार्य करते. त्यासाठी मूत्राशय नियमित अंतराने रिकामे केले पाहिजे आणि त्या दृष्टीने निसर्गाने त्याची रचना केलेली असते किंवा ते तसे बनलेले असते. त्यामुळे वारंवार लघवीकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या कार्यात व्यत्यय येऊ शकतो.
३) इअरबड्स वापरणे
बरेच लोक दररोज कानातील मळ काढण्यासाठी इअरबड्स वापरतात. पण, डॉक्टर इअरबड्स वापरण्यास नकार देतात. इअरबड्स बहुतेकदा कानातील मळ काढून टाकण्याऐवजी आणखीन आतमध्ये किंवा खोलवर ढकलतात. त्यामुळे कानाच्या मार्गात (ear canal) अडथळा निर्माण होऊ शकतो, जळजळ किंवा सूज येऊ शकते आणि कधी कधी कानाच्या पडद्यालाही दुखापत होऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे कान नैसर्गिकरीत्या स्वतःच स्वच्छ होत असतो. फक्त बाहेरून कान कापडाने स्वच्छ केला पाहिजे. पण, असे करण्यात अडथळा किंवा ऐकण्यात अडचण येत असेल, तर वैद्यकीय स्वच्छता हा एकच सुरक्षित पर्याय आहे.
४) खूप गरम अन्न खाणे
अन्नाचे तापमान खूप महत्त्वाचे असते. अत्यंत गरम अन्नामुळे तोंड, घसा, अन्ननलिका यांच्या अस्तरांचे नुकसान होऊ शकते. वारंवार खूप गरम अन्न सेवन केल्याने ते प्रत्येक वेळी निरुपद्रवी ठरेलच, असे नाही. अनेक वर्षे सतत खूप गरम अन्न खाल्ल्याने उष्णतेमुळे ऊतींना (tissues) नुकसान होण्याचा धोका वाढू शकतो. अन्न गरम असावे; पण अगदी प्रमाणात.
५) जेवणादरम्यान पाणी पिणे
पाणी पिण्याबाबत पचनाशी संबंधित हा सर्वांत सामान्य गैरसमज आहे. पण, डॉक्टर म्हणतात की, जेवताना पाण्याचा लहान घोट घेणे पूर्णपणे सामान्य आहे आणि त्यामुळे अन्न गिळायला मदत होते. पाणी प्यायल्यामुळे पचन थांबते किंवा मंद होते, असा समज वैद्यकीयदृष्ट्या चुकीचा आहे. खूप जास्त पाणी प्यायल्यास काही लोकांना पोट फुगल्याची भावना (bloating) होऊ शकते. पण, त्यामुळे पचन करणारे एंझाइम्स काम करणे थांबवत नाहीत.
६) पोटावर झोपणे
पोटावर झोपल्याने मान आणि मणक्यावर ताण येऊ शकतो. कालांतराने, हे शारीरिकदृष्ट्या दिसून येऊ शकते. काळाच्या ओघात याचे शारीरिक परिणाम दिसू शकतात. सतत पोटावर झोपण्याची सवय असल्यास शरीरात कडकपणा, पोश्चरच्या समस्या व झोपेची गुणवत्ता कमी होणे या बाबी घडू शकतात. एका बाजूला तोंड करून किंवा पाठीवर झोपल्यास मणक्याची योग्य रचना (alignment) टिकून राहण्यास मदत होते.
