Vegetables to Avoid and Enjoy in rainy season : पावसाळा उष्णतेपासून आपल्याला आणि निसर्गाला दिलासा मिळतो. मात्र, या ऋतूमध्ये वाढलेला ओलावा आणि दमट वातावरणामुळे जीवाणू, बुरशी तसेच इतर सूक्ष्मजीव वेगाने वाढू लागतात. त्यामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. याच कारणामुळे आरोग्यतज्ज्ञ पावसाळ्यात अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात.
‘नटी ओव्हर न्यूट्रिशन’ (Nutty Over Nutrition) या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये, आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी अशा चार भाज्यांची माहिती दिली आहे ज्या पावसाळ्यात खाणे टाळले पाहिजे. कारण – या भाज्या दूषित होण्याची शक्यता अधिक असते. तसेच, त्यांनी पावसाळ्यासाठी योग्य अशा आहाराचा भाग बनवता येतील, अशा काही सुरक्षित पर्यायांचीही शिफारस त्यांनी केली आहे.
पालक
किरण कुकरेजा यांच्या मते, पावसाळ्यात पालकसारख्या पालेभाज्या खाणे टाळले पाहिजे. या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असली, तरी दमट हवामानामुळे त्यांवर जीवाणू आणि इतर दूषित घटक असू शकतात. त्या स्पष्ट करतात की, या भाज्या नीट धुतल्या तरी त्यावरील सर्व सूक्ष्मजीव नेहमीच निघून जातील असे नाही; त्यामुळे पोटाचे संसर्ग, अन्नातून विषबाधा (फूड पॉयझनिंग) होण्याचा धोका वाढू शकतो.
कोबी व फ्लॉवर
कोबी व फ्लॉवरसारख्या ‘क्रूसिफेरस’ (कोबीवर्गीय) भाज्यांबाबतही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. त्यांच्या पानांमध्ये आणि घट्ट तुऱ्यांमध्ये (florets) ओलावा, धूळ, जीवाणू अडकून राहू शकतात, ज्यामुळे त्या पूर्णपणे स्वच्छ करणे कठीण जाते. पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असल्याने या भाज्या दूषित होण्याची शक्यता अधिक असते; त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास पचनाच्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो.
मशरूम
अनेक पदार्थांमध्ये मशरूमचा वापर केला जातो. पण, पावसाळ्यात त्याच्या स्वच्छ करून घेण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे तज्ज्ञ सांगतात. मशरूम नैसर्गिकरित्या दमट वातावरणात वाढत असल्याने, त्यांमध्ये दूषित घटक येण्याची शक्यता अधिक असते. जर ते योग्यरित्या साफ केले, साठवले किंवा शिजवले नाहीत. तर अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे, ग्राहकांनी विश्वसनीय ठिकाणांहूनच ताजी मशरूम खरेदी करावीत आणि शिजवण्यापूर्वी ती नीट स्वच्छ करून घ्यावीत, असा सल्ला देतात.
बटाटे
तज्ज्ञांनी सांगितलेल्या पदार्थांच्या यादीत मोड आलेले बटाटे देखील आहेत. बटाट्यांना मोड येऊ लागल्यावर त्यात ‘सोलॅनिन’ (solanine) या नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या विषारी घटकाचे प्रमाण वाढते. मोड आलेले बटाटे खाल्ल्याने मळमळ, डोकेदुखी, पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, त्या मोड आलेले बटाटे फेकून देण्याचा आणि त्याऐवजी ताजे बटाटे वापरण्याचा सल्ला देतात.
त्याऐवजी काय खावे?
अशा विशिष्ट भाज्यांबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत तज्ज्ञ म्हणतात पावसाळ्यात खाण्यासाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. त्या पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या भाज्या खाण्याची शिफारस करतात. उदाहरणार्थ – दुधी भोपळा, दोडका, पडवळ, मका आणि गवार. पावसाळ्यात या भाज्या खाणे तुलनेने अधिक सुरक्षित मानले जाते आणि त्यांचा समावेश संतुलित आहारात केला जाऊ शकतो.
