Monsoon Vegetables To Eat : पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते आणि हंगामी आजारांचा धोका वाढल्यामुळे पचनाशी संबंधित समस्यांमध्येही वाढ होते. त्याशिवाय पावसामुळे निर्माण होणाऱ्या दमट वातावरणामुळे बाजारात मिळणाऱ्या अनेक भाज्यांना बुरशी किंवा कीड लागण्याची शक्यता असते; अशा भाज्यांचे सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, अशा भाज्यांबद्दल जाणून घेऊ, ज्या पावसाळ्यात उत्तम आरोग्य राखण्यास मदत करतात आणि विशेषतः पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरतात.
भोपळा
पावसाळ्यात भोपळ्याचे सेवन करता येते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यात ‘अ जीवनसत्त्व’ भरपूर प्रमाणात असते. तुम्ही सूप किंवा भाजीच्या स्वरूपात याचा आस्वाद घेऊ शकता.
दुधी भोपळा
पावसाळ्याच्या दिवसांत दुधी भोपळा ही एक उत्तम भाजी ठरते. पचनसंस्थेसाठी याचे अनेक फायदे आहेत आणि दुधी आतडी स्वच्छ करण्यासही मदत करतो.
दोडका
‘तोराई’ असेही दुसरे नाव असलेली दोडका ही भाजी केवळ शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासच मदत करीत नाही, तर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही (डिटॉक्स) मदत करते. त्यामुळे आपल्या आहारात दोडक्याचा जास्तीत जास्त समावेश करण्याचा प्रयत्न करा. दोडक्याचा वापर करून भाजी, सूप किंवा चटणी असे विविध पदार्थ बनवता येतात.
सुरण
तंतुमय पदार्थाने (फायबर) समृद्ध असलेल्या सुरणाच्या भाजीमध्ये खनिजांचे प्रमाणही चांगले असते. सुरणापासून बनवलेले पदार्थही अत्यंत फायदेशीर असतात.सुरणाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास आणि मलविसर्जन नियमित होण्यास मदत होते.
पडवळ (परवल)
याची भाजी किंवा त्याचे भरीत (चोखा) करून, त्याचा आस्वाद घेता येतो. पावसाळ्यात या भाजीचे सेवन केल्याने ॲसिडिटी आणि पोट फुगणे यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते.
हंगामी भाज्या फायदेशीर असतात
कोणत्याही ऋतूत पचनसंस्था सक्षम ठेवण्यासाठी आणि एकूणच आपले आरोग्य राहावे यासाठी आपल्या आहारात त्या त्या ऋतूतील भाज्यांचा समावेश करा. हंगामी भाज्या पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
