Side Effects Of Eat Banana : केळं हे सर्व ऋतूंमध्ये सहज मिळणारं फळ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण केळं आवडीनं खातात. भूक भागवण्यासाठी आणि शरीराला झटपट ऊर्जा (एनर्जी) देण्यासाठी हे एक उत्तम फळ आहे. जे खाताच शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते. पण, केळं खरंच सर्व जण खाऊ शकतात का? यावर एम्स (AIIMS) ट्रेंड जनरल फिजिशियन व न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका शेहरावत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉ. प्रियंका शेहरावत यांच्या मते, तुम्ही केळं कधीही खाऊ शकता. रोज एक ते दोन केळी खाल्ल्यानं शरीराला चांगलं पोषण मिळतं. केळ्यातून शरीराला तंतुमय पदार्थ आणि पोटॅशियम मिळते. एका केळ्यात साधारण ४०० मिग्रॅ (mg) पोटॅशियम असते. पोटॅशियम आपल्या स्नायू (मसल्स) आणि मज्जासंस्थेच्या (नर्व्हज्) आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
केळं कोणी खाऊ नये?
मूत्रपिंडाच्या आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांनी केळं खाणं टाळले पाहिजे. कारण- त्यांच्या शरीरात आधीच पोटॅशियमची पातळी जास्त असते आणि त्यांची मूत्रपिंडं हे पोटॅशियम योग्य रीत्या फिल्टर करू शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांनी केळं खाणं आणि शहाळ्याचं पाणी पिणं टाळावं. तसेच अशा रुग्णांनी त्यांच्या शरीरातील पोटॅशियमच्या पातळीवर सतत लक्ष ठेवणं गरजेचं असतं. मात्र, ज्यांना मूत्रपिंडांसंबंधीचा कोणताही त्रास नाही, ते लोक निवांतपणे केळं खाऊ शकतात.
डायबिटीज असलेले लोक केळं खाऊ शकतात का?
जर तुम्हाला मधुमेह (डायबिटीज) असेल तरीही तुम्ही एक लहान केळ खाऊ शकता. केळ्याचा ग्लायसेमिक लोड कमी असतो; पण ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे काही काळासाठी रक्तातील साखर वाढते; परंतु साखरेचं हे प्रमाण सतत वाढलेलं राहत नाही. जर तुमची रक्तशर्करा खूप जास्त असेल आणि नियंत्रणात नसेल, तर डॉक्टरांनी दिलेल्या डाएटचं पालन करावं आणि केळं खाणं टाळावं. परंतु, जर तुमची रक्तशर्करा नियंत्रणात असेल, तर तुम्ही एक लहान केळं नक्कीच खाऊ शकता.
केळं खाण्याचे दुष्परिणाम
तुम्हाला वारंवार खूप सर्दी-खोकला किंवा कफाचा त्रास होत असेल, तर केळं खाणं टाळा. दम्याचा (अस्थमा) त्रास असलेल्या रुग्णांनी हिवाळ्यात आणि पावसाळ्यात केळं खाऊ नये. त्याशिवाय जास्त प्रमाणात केळी खाल्ल्यानं काही लोकांना पोटात गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तसेच, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनीही जास्त केळी खाणं टाळावं.
