Health Tips : काही वर्षांपूर्वी सांधेदुखीचा त्रास फक्त वयोवृद्धांना जाणवत होता. परंतु आता २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्येही गुडघे, पाठ, मान आणि खांदेदुखी सामान्य झाली आहे. आजकाल अनेक तरुणांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर जडपणा जाणवतो, थोडा वेळ बसल्यानंतर उभे राहण्यास त्रास होतो किंवा हलक्या व्यायामानंतरही सांधेदुखी जाणवते. पण हा त्रास अचानक सुरु झालेला नाही. यामागे बदलती जीवनशैली हे एक प्रमुख कारण आहे.पण सांधेदुखीमागे नेमकी काय कारणं आहेत आणि ती कशी टाळली पाहिजेत जाणून घेऊ…

सांधेदुखीची मुख्य कारणे (Joint Pain Causes & Treatment)

१) जास्त वेळ बसून राहणे – वर्किंग लाइफस्टाइलमुळे मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. यावेळी जास्त वेळ बसून राहिल्याने आणि कमी हालचालींमुळे स्नायू कमकुवत होतात. जेव्हा स्नायू कमकुवत होतात तेव्हा सांध्यांवर त्याचा जास्त दबाव येतो.

२) चुकीची शारीरिक स्थिती – वाकून बसणे, मान खाली घालून मोबाईलकडे पाहणे किंवा बराच वेळ त्याच स्थितीत राहणे यामुळे मान,खांदे आणि पाठीवर गंभीर परिणाम होतोय.

३) चुकीचा किंवा जास्त व्यायाम – व्यायाम हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने दुखापत होऊ शकते.वॉर्म अप न करता जड वजन उचलणे किंवा ट्रेनरशिवाय हेवी वर्कआउट केल्याने सांध्यांना त्रास होतो.

४) कोअर मसल्स कमकुवत होणे – पोटाचे आणि पाठीचे स्नायू शरीराला आधार देतात.जर हे स्नायू कमकुवत असतील तर गुडघे आणि कंबरेवर जास्त दबाव येतो.

कोणती लक्षणे हलक्यात घेऊ नयेत?

सकाळी उठल्यावर जर तुम्हाला जडपणा जाणवत असेल, पायऱ्या चढताना किंवा उतरताना गुडघ्यांमध्ये वेदना होत असतील, खांदा वळवताना आवाज येत असेल, बराच वेळ बसल्यानंतर पाठदुखी होत असेल किंवा हलक्या व्यायामानंतरही सूज आणि वेदना होत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.